पारंपरिक भविष्यवाणी : अगस्त्य नाडी चन्नई
विंग कमांडर शशिकांत ओक हे अध्यात्म व ज्योतिष या विषयात रस असणारे गृहस्थ आहेत. त्यांची नेमणूक चन्नई जवळच्या तंबारम येथील हवाई दलाच्या स्टेशनवर झाली. त्यांना समजले की त्यांच्या घरापासून 3-4 कि. मी. अंतरावरच अगस्त्य नाडी निलयम हे भविष्य वर्तविणारे केंद्र आहे. त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग केला व आपल्या अनुभवावर आधारित अनेक ग्रंथ लिहिले व अनेकांना ते देऊन त्यावर अधिक चर्चा केली. (Mind boggling miraclesss Naadi Bhaavishya) या नावाचे त्यांचे एक पुस्तक आहे. विशेष म्हणजे त्यांना या नाडी ज्योतिषाचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी त्यांच्याकडून नाडी ग्रंथातील काही पानांचे झेरॉक्सदेखील मिळवले. त्यांच्या अनुभवावरून असे दिसते की हे नाडीशास्त्र केवळ भृगुऋषींच्या नावाने नसून अगस्त्य ऋषी, अरुण ऋषी, सूर्य, रावण, शुक्र इत्यादि अनेक ऋषींच्या व देवतांच्या नावाने संहिता आहेत व त्यांचा वापर भविष्य वर्तविण्यासाठी होतो. चेन्नई येथील मुक्कामात त्यांनी तेथील इराताई नाडी संहितेचा लाभ घेतल्याचा उल्लेख आहे. त्यांनी इंटरनेटवर दिलेली माहिती मी वाचली आहे. ओक यांच्या अनुभवांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी अत्यंत बारकाईने तपशील लिहिला आहे. आपल्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. त्यांचा अगस्त्य नाडी निलयम येथील अनुभव त्यांच्याच शब्दात देतो.
एके दिवशी सकाळीच मी त्या केंद्रात पोहोचलो. तेथील एका तरुणाने माझ्या आंगठय़ाचा ठसा एका कोर्या कागदावर घेतला. व मला एका तासानंतर येण्यास सांगितले. पुन्हा गेलो तेव्हा एक ज्योतिषी 50-60 पानांची (ताडाची पाने) एक संहिता घेऊन बसला. व सफाईदारपणे तमिळ भाषेत बोलू लागला. मी लगबगीने सांगितले की मला तमिळ भाषेतील अ कीं ठ कळत नाही. तेव्हा त्यांनी मला दुपारनंतर यायला सांगितले. मी व माझी पत्नी दुपारी गेलो तेव्हा कांही लोकांचे भविष्य वर्तविणे चालू होते. त्यामुळे मला 2-3 तास बसावे लागले. माझा नंबर लागला तेव्हा मी तेथेच असलेल्या इतर जातकांना दुभाषाचे काम करण्याची विनंती केली व माझे भविष्य मार्गी लागले. नाडी संहितेची पाने सुमारे 10-11 इच लांब व सुमारे 1-11/2 इंच रुंद मापाची ताडाच्या पानाची काहीशी लवचिक असतात. अशी पाने हातपंख्यासाठी वापरली जात यावरून त्यांचा अंदाज येईल. सुमारे 50-60 पाने दोन्ही बाजूनी भोकातून दोरी ओवून खाली एक व वर एक लाकडी पट्टी ठेऊन बांधलेली असतात. एकेका पानावर 6-8 ओळी मजकूर दोन्ही बाजूला काही समास सोडून लिहिलेला असतो. हा मजकूर एक जाड नख मुठीत धरून पानावर दाबून लिहिलेला असतो. मजकूर पूर्वीच्या रनिंग तमिळ लिपीत म्हणजे आपल्या मोडीवळणाच्या धर्तीवर लिहिलेला असतो.
अगस्त्य ऋषींना नमस्कार करून त्यांच्या आशीर्वादाची याचना करून ज्योतिषांनी सुरुवात केली. माझी अचूक कुंडली शोधण्यासाठी त्यांनी प्रश्न विचारले, माझ्या नावाचे आद्याक्षर प, फ, ब भ आहे काय? माझ्या आईचे नाव चार अक्षरी आहे काय? माझे वडील हयात आहेत काय? इ.इ. प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आली की ते पान बाजूला केले. अशा रीतीने सुमारे 200 पाने बाजूला झाली. माझी बरोबर जुळणारी कुंडली सापडत नसल्याने त्यांनी मला एक महिन्यानंतर यायला सांगितले. अर्थात हा महिना इतरांच्या कुंडल्या कशा वाचतात याचे निरीक्षण करण्यासाठी मी वापरला. महिन्यानंतर गेलो तेव्हा समजले की माझ्या कुंडलीची पाने श्रीलंकेहून आलेली आहेत. त्यातील पहिल्या गठ्ठय़ात माझी कुंडली सापडली नाहीच. पण दुसर्या गठ्ठय़ातील 5-6 पाने काढताच माझी कुंडली गवसली. त्यांनी प्रथम माझ्या आईचे नाव मंगला असे बरोबर सांगितले. त्यानंतर माझ्या वडिलांचे नाव जनार्दन व माझे नाव शशिकांत व माझ्या पत्नीचे नाव अलका व मला एक मुलगा व एक मुलगी आहे असे त्यांनी बरोबर सांगितले. हा जातक वयाच्या 45 व्या वर्षी आपले भविष्य जाणण्यासाठी येथे येईल असेही तेथे लिहिलेले होते. विरोधी नाम संवत्सर, आदि मास(आषाढ मास) 16 वा दिवस रविवार चित्रा नक्षत्र, धनु लग्नम, कन्या राशी अशी प्राथमिक परिमाणे तंतोतंत जुळल्यामुळे या पानात माझेच भविष्य आहे याची सांगणार्याला खात्री झाली.
तेथेच ठेवलेल्या मागील 40 वर्षांच्या पंचांगातून हे सर्व ताडून पाहिले गेले. माझी जन्मतारीख 31 जुलै 1949 ही देखील बरोबर जुळली. या गोष्टीसाठी बराच वेळ गेल्यामुळे मला पुन्हा दोन दिवसांनी भविष्य कथनासाठी यायला लागले. दोन दिवसांनी माझे भविष्य सांगितले गेले. मी माझ्या मातापित्याचा वडील मुलगा, माझ्या मुलांचे शिक्षण, माझी हवाई दलातली नोकरी इत्यादी गोष्टी बरोबर सांगितल्या. इतके होत असताना राजेंद्रन नावाचे इंग्रजी जाणणारे गृहस्थ तेथे आले. मग भविष्यकथनाचा वेग वाढला. त्यांनी संहिता वाचायची व त्याचा अर्थ सध्याच्या तमिळ भाषेत सांगायचा तो राजेंद्रन यांनी इंग्रजीत भाषांतरीत करायचा व त्याचे टेप रेकॉर्डिग करायचे, असे चालले. शेवटी त्यांनी ती टेप मला देऊन नमस्कार केला. त्यासाठी मला भविष्य सांगायचे रु. 100 व टेपचे रु. 25 असे एकूण रु. 125/- द्यावे लागले. अर्थात यात अगस्त्य ऋषींनी इतर खंडात अधिक तपशीलवार माहिती असल्याचा उल्लेख केला होता. याने माझी उत्सुकता आणखी वाढली. प्रत्येक खंडात 15-18 लोक(सुमारे 60-70 ओळी) होते त्यात माझ्या आयुष्यातील अनेक घटना अचूक लिहिलेल्या होत्या. माझ्या बढतीत होणारा विलंब, मुलांच्या शिक्षणात आलेला व्यत्यय, माझ्या पत्नीला झालेला आजार, (स्किन अँलर्जी), माझ्या दुचाकीला झालेला अपघात इ. अनेक घटना तंतोतंत बरोबर होत्या. त्याबरोबरच माझ्या मागील जन्मातील ग्रहदशा तसेच त्यांच्या परिणामस्वरूप होणार्या पाप व पुण्यकर्माचे वर्णन होते. या संहितेत एका कोर्ट केसचादेखील उल्लेख होता. मला कळेना की माझ्या हवाई दलातील नोकरीत कोर्ट केस आलीच कशी? पण विचाराअंती मी एका केसमध्ये साक्षीदार म्हणून कोर्टात गेलो हे आठवले.
माझ्या या यशस्वी अनुभवानंतर मी माझ्या अनेक सहकार्यांना सांगितले व त्या सर्वानी असाच अचंबित करणारा अनुभव घेतला हे मी येथे नमूद करतो.
पापक्षालनासाठी तीर्थयात्रा अथवा पूजाअर्चा या गोष्टीचा खरोखरच उपयोग होतो की नाही हे मला माहीत नाही. मात्र व्यावहारिक दृष्टीने त्या सांगितल्या जातात की काय हेही मी सांगू शकत नाही.
श्री ओक यांनी उत्तरेतदेखील अनेक ठिकाणी अशा संहितांचा अनुभव घेतला व त्यावर लिहिले. आपली संहिता तेवढी खरी व इतरांची खोटी असे सांगणारे व्यावसायिक देखील त्यांच्या अनुभवास आलेले आहेत.
त्यांनी आपल्या अनुभवाविषयी अनेकांना सांगितले. खासकरून त्यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ आपल्या साईटवर दिला आहे. 100% शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणार्या डॉ. जयंत नारळीकरांची मते वेगळी आहेत हे त्यांना दिसले. एखाद्या दुसर्या जातकाच्या अनुभवावरून हे शास्त्रशुद्ध भविष्यकथन आहे असे म्हणता येणार नाही असा डॉ. नारळीकरांचा मुद्दा विचारणीय आहे यात शंका नाही. मोठय़ा प्रमाणात(1000-2000) कुंडल्या दाखवून त्यांची भविष्ये तपासून काय ते ठरवावे लागेल. अर्थात हे करताना लागणारी पारदर्शकता अशा व्यावसायिकांकडून मिळणे दुरापास्त आहे हेही तितकेच खरे होय. शास्त्रीय दृष्टिकोनातून ही बनवाबनवी आहे असे म्हटले तरी ती कशी करता येईल हे मोठेच गूढ आहे. व्यावहारिक दृष्टया ते अवघड वाटते. तरीदेखील विंग कमांडर शशिकांत ओक यांनी घेतलेले स्पष्ट आश्चर्यकारक अनुभव व त्यांची सत्य शोधण्याची धडपड या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत हे नक्कीच!