रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (17:41 IST)

व्यायामाची सुरुवात करताना

हिवाळ्याचा काळ हा पोषक असतो, त्या काळात भूकही जास्त लागते. पण हाच काळ तंदुरूस्ती राखण्यासाठीही उत्तम असतो. त्यामुळे अनेक जण हिवाळ्यात व्यायामाची सुरुवात करतात. कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपल्याला तंदुरूस्त राहाण्यासाठी, शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच स्थूलता वाढू न देण्यासाठी उपयुक्त असतो. अनेकदा काही जुनाट शारीरिक तक्रारीही व्यायाम सुरू केल्यानंतर कमी होतात. एक नियमित व्यायाम सुरू ठेवल्यास त्याचे अनेक फायदे होतात. जसे मानसिक आरोग्य चांगले राहाते, नियमित झोप येण्यास मदत होते.
 
कोणाही व्यक्तीला तंदुरूस्त, आरोग्यपूर्ण राहायचे असेल तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याला दुसरा काही पर्याय असू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम जर नियमितपणे करायला सुरूवात केली तरच त्याचे फायदे दिसू लागतात. पण काही लोक आरंभशूर असतात, ते उत्साहाने
सुरुवात करतात पण नियमितपणा ठेवत नाहीत. तर काहींना सुरुवात करणेच खूप कठीण जाते. अर्थात व्यायाम करून तंदुरूस्त राहायचेच, असा दृढ संकल्प केला असेल तर ही गोष्ट कठीण नाही. काहींना मात्र नियमित व्यायाम करणे शक्य होत नाही कारण त्यांच्या मार्गात काही ना काही अडथळे येतच राहातात. काही वेळा आळशीपणामुळेही व्यायाम टाळत असाल तर व्यायाम सुरू करण्यासाठी काही उपाय सांगतो, त्यामुळे व्यायाम सुरू करण्यासाठी मदत होईल.
 
व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा : व्यायाम करायला खूप उत्साहाच्या भरात सुरुवात करतो मात्र नंतर व्यायाम करणे सोडून देतो. त्यासाठी अशा व्यायाम प्रकाराची निवड करा, जो आपण सातत्याने करू शकतो. त्याव्यतिरिक्त व्यायामाने जे लक्ष्य साध्य करायचे आहे ते देखील वास्तववादी असणेही महत्त्वाचे आहे. त्याशिवाय व्यायाम करण्यापूर्वी आपल्याला काही आरोग्य समस्या, शारीरिक समस्या भेडसावत असतील तर व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायामाला सुरुवात केल्यास प्राथमिक मार्गदर्शन मिळाल्याने व्यायाम योग्य पद्धतीने सुरू करता येईल. व्यायाम करताना सुरूवातीला उत्साह असतो. उत्साहाच्या भरात खूप व्यायाम करण्यापेक्षा हळूहळू सुरुवात करावी. सरावानुसार हळूहळू व्यायामाची तीव्रतावाढवावी. हल्ली प्रत्येक व्यक्ती घड्याळापाठी धावत असते. त्यामुळे सगळ्यांचेच आयुष्य व्यग्र झाले आहे. परंतु व्यायामाला सुरुवात कराल तेव्हा एकच वेळ निश्चित करा. ती वेळ शक्यतो बदलू नका. एक तासाचा वेळ काढू शकत नसाल तर किमान अर्धा तास किंवा 15 मिनिटांचा वेळ जरूर काढावा. मात्र व्यायामात नियमितता असली पाहिजे.
 
व्यायाम सुरू करणार्‍या नव्या व्यक्ती एक चूक करतात की पहिल्या दिवसापासूनच खूप जास्त प्रमाणात व्यायाम करायला सुरूवात करतात. मात्र असे करणे हितावह नाही कारण अचानक तीव्र हालचाली केल्याने इजा होण्याची शक्यताच अधिक असते. एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी ती म्हणजे अति तेथे माती. व्यायामातही अति उत्साह, अति तीव्रता, अतिप्रमाण हे योग्य नाही. आठवड्यातून एक दिवस व्यायामाला सुट्टी देखील देऊ शकतो. त्यामुळे तंदुरूस्ती राखण्यासाठी जी दिनचर्या आपण सुरू करतो आहोत, ती उत्साहाने कायम ठेवू शकतो.
 
नव्या दमाच्या लोकांसाठी काही तंदुरूस्ती राखण्यासाठी टिप्स
दिवसभरात खूप पाणी प्यावे. व्यायामाने शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी मदत मिळते.
 
सुपाच्य, योग्य आहार सेवनकरा. त्यामुळे व्यायामाला आहाराची जोड मिळून तंदुरूस्तीचे लक्ष्य साध्य करता येईल. भाज्या, फळे आदींचा समावेश असलेला संतुलित आहार सेवन करावा. आहारात चांगले पौष्टिक कार्ब्सअसावेत. त्यामुळे स्नायूंची ताकद भरून निघण्यास मदत होते. तसेच शरीराची ऊर्जा पातळीही वाढते.
 
प्रथिनांचे सेवन जरूर करावे. स्नायूंची ताकद वाढतेच पण उती निरोगी राखण्यासही मदत होते. स्नायूंच्या निर्मितीची सुविधाही मिळते. मेद किंवा चरबी आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे खरे असले तरी सर्वच प्रकारची चरबी घातक नसते. चांगले मेद वास्तविक वेगाने चरबीचे ज्वलन करण्यास मदत करतात. ऊर्जेची पातळी वाढवण्यासही मदत करतात. त्यामुळे आपण खूप जास्त वेळ उत्साहाने कार्यरतही राहू शकतो. रोजच व्यायामाला सुरूवात करण्यापूर्वी वॉर्मअप करणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठून एकदम व्यायामाला सुरुवात करणे योग्य नाही. त्यासाठी वॉर्मअप करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला इजा होण्यापासून बचाव होतो. वॉर्मअपमुळे शरीराला लवचिकताही प्राप्त होते.
थोडक्यात व्यायाम सुरू करताय ही न्रकीच चांगली गोष्ट आहे, मात्र व्यायाम हा थोडे दिवसांची हौस न ठरता नियमितपणे सुरू ठेवणे हेअधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी दृढ संकल्प करणे गरजेचे आहेच, परंतु व्यायाम सुरू करण्यापूर्वी योग्य तो सल्ला घेऊन हळूहळू सुरुवात करणे अधिक फायाचे आहे.