सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (20:19 IST)

काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती

food
काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती
धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले, आणि लिंबू रसरसलेले
किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले
 
खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले
चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले
मिरची खोबरे ती सह ओले, तीळ भाजूनी त्यात वाटले
कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले
 
वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले!
भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या
काही वाटुन सुरेख तळल्या, कोशिंबिरी च्या ओळी जमल्या
शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या 
 
केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या
एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी
रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी
चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी
 
फणस कोवळा हिरवी केळी, काजुगरांची गोडी निराळी
दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी
फेण्या, पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या
 
शेवयांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या
सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे
कणीदार बहू तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी.........
 
कवी : ग. दि. माडगुळकर