बुधवार, 18 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

मदत

- नीता श्रीवास्तव

मदत
ND
झोपडीत बिचारी एकटीच रहात होती. त्या तिच्या झोपडीत पुराचं पाणी शिरले होते. मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात घरातलं काहीही वाचवू शकली नाही. अगदी धान्यापासून भांड्यांपर्यंत सगळं काही पाण्यात वाहून गेलं.

पण ती मेहनती होती. कंबर कसून कामाला लागली. दोन वेळच्या जेवणासाठी तिने कुणापुढेही हात पसरले नाहीत. त्याचवेळी वस्तीत बातमी आली. सरकार पूरग्रस्तांना मदत देणार आहे. मदतीविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तिने आलेल्या कॉन्स्टेबललाच विचारलं, 'सायेब, माझ्या झोपडीत बी पानी शिरलं व्हतं. मला सरकारची मदत मिळंल का?'

कॉन्स्टेबल उद्गारला, 'का नाही? तू तर एकटीच आहेस. मग सरकारच का? सगळ्यांनीच तुला मदत केली पाहिजे. मी करील तुला मदत. काहीही लागलं तर मला सांग'

तिला भरून आलं. आभाळ कोसळलेल्या प्रसंगात कुणी तरी तिला प्रेमाच्या चार शब्दांचा आधार दिला. हात जोडून ती आभारच मानत होती, तेवढ्यात कॉन्स्टेबल पुन्हा म्हणाला, 'अगं काय सांगतो ते पूर्णपणे ऐक. चालली 'फ्रंटियर मेल'सारखी धाड धाड. हे बघ, तू जशी एकटी आहेस, तसा मी पण इथे एकटाच आहे. बायको-मुलं दुसर्‍या गावात आहेत. मग कधी तरी येत जा माझ्याकडे.'

तिच्या पायाखालची जमिनच सरकली. 'त्याच दिवशी पुरानेच गिळंकृत केलं असतं तर बरं झालं असतं,' तिच्या मनात विचारांची आंदोलनं सुरू झाली.