गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (07:30 IST)

जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळी सारखंच अल्पजीवी

chhoti diwali rangoli design
आजे सासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या.
 
अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटां मधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळ पिठाची ओळ. 
 
बघता बघता माझ्या डोळ्यां समोर अनेक पाकळ्यांचं सुन्दर कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.
 
थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली.
 
अजून तांदूळ पीठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या, त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजीने इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटे सुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.
 
मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आली, तिने भाजी घेतली, पैसे दिले आणि ती परत आत निघून गेली.
 
विस्कटलेल्या रांगोळी कडे तिने पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते. 
 
नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटं सुद्धा टिकली नाही, तुम्हाला वाईट नाही वाटलं ?
 
त्या हसल्या, म्हणाल्या, रांगोळी काढीत होते तोवर ती माझी होती, ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली.
 
रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !
 
इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने आजींनी सोडवून घेतल्या होत्या.
 
कशातही अडकून राहू नये , सोडून द्यावे, संयमाने, आनंदाने, क्षमाशील व्रताने जीवन जगावे...
 
रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळी सारखंच अल्पजीवी आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.   
 
- सोशल मीडिया