शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (08:14 IST)

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचे कारागृहात असभ्य वर्तन, कर्मचाऱ्यांनाही दिली धमकी

sachin waze
मुंबई – बडतर्फ पोलिस अधिकारी आणि संशयित आरोपी सचिन वाझे हे कारागृहात कैद असताना आपण आजारी असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात यावे असे वारंवार सांगत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांशी ते कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाहीत, या उलट त्यांच्याशी उद्धटपणे वागणूक करत असल्याने तुरुंग प्रशासन त्रस्त झाले आहे. आता तर त्यांनी कारागृहातील सुरक्षा रक्षकांसोबत असभ्य वर्तन करत धमकीही दिली, असा आरोप करीत तळोजा तुरुंग प्रशासनाने वाझेविरोधात मुंबईतील सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे वाझे यांना न्यायालयाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीमुळे आपल्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते, यापुर्वी एका प्रकरणात वाझेने सत्र न्यायालयात माफी मागितली आहे.
 
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने भ्रष्टाचार प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी सचिन वाझे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण देशमुख यांच्या आदेशानुसारच मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेने तपासा दरम्यान सांगितले होते. त्यानंतर अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेनंतर निलंबित असलेले वाझे यांना लवकरच मुंबई पोलिस दलातून बडतर्फ केले होते. सध्या वाजे हे तळोजा कारागृहात आहेत. चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला दिली होती. मात्र त्यानंतरही वाझे यांची चौकशी झालेली नाही.
 
अँटीलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तर माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये वाझे माफीचे साक्षीदार बनले होते. याच प्रकरणी वाझे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती तुरूंग प्रशासनाने न्यायालयाला दिली होती. पण आता वाजे यांच्या त्रासाने तुरुंग प्रशासन कंटाळले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor