शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (08:29 IST)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट पाहता प्रशासन सज्ज

मुंबईत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मात्र तरी करोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट पाहता प्रशासन सज्ज झालं आहे.रुग्णवाढ पाहता महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड व आरोग्य विषयक बाबींची आढावा बैठक  आयोजित करण्यात आली होती.
 
एखाद्या इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील केली जाणार आहे.सील केलेल्या इमारतीच्या गेटवर पोलीसही तैनात केले जाणार आहेत.तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचं ठरवण्यात आलं आहे.
 
- ज्या इमारतींमध्ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येते.या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व अधिक कठोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बैठकी दरम्यान दिले आहेत.
 
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या इमारती सील करण्यात येतील, अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. तसेच इमारतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही.
 
- इमारत सील करण्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले आहेत.
 
- कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ३ बाबींचे परिपूर्ण पालन सर्व ठिकाणी योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा व जनजागृती नियमितपणे करण्याचे निर्देश दिले आहेत.यामध्ये योग्यप्रकारे मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार योग्यप्रकारे साबणाने हात धुणे या बाबींचा समावेश आहे.
 
- अनेक ठिकाणी योग्यप्रकारे मास्क परिधान न करता नागरिक आढळून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सामाजिक अंतर राखले जात नसल्याच्या तक्रारी देखील प्राप्त होत आहेत.याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यास पुन्हा एकदा आपल्याला निर्बंध अधिक कडक लागू शकतात.
 
- मास्क न लावणाऱ्यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी सर्व २४ प्रशासकीय विभागांना दिले.या अनुषंगाने आवश्यक तेवढ्या संख्येतील ‘क्लीन-अप मार्शल’ ची तात्पुरती नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
- मुंबई पोलीसांद्वारे करण्यात येत असलेली ‘विना मास्क’ विषयक कारवाई देखील अधिक तीव्र करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी मुंबई पोलीस दलास दिल्या आहेत.या अनुषंगाने मनपा क्षेत्रात दररोज अधिकाधिक व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याची सूचना मनपा आयुक्तांनी सर्व संबंधितांना दिली.
 
- कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्रकारच्या कोविड विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
 
- ज्या रुग्णालयांमध्ये व जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, त्यांच्या क्षमतेची चाचणी घेण्याचे व रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे व योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
- कोविड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने तसेच कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे.ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात २६६ कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
 
- तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
- महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ५ वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याच पद्धतीने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये असणाऱ्या शौचालयांचे देखील निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
- महानगरपालिका क्षेत्रातील १८ वर्षे व अधिक वय असणाऱ्या सुमारे ७४ टक्के नागरिकांचे एक लसीकरण झालेले आहे. ही निश्चितच एक सकारात्मक बाब असल्याचे नमूद करत, महापालिका आयुक्तांनी उर्वरित २६ टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टीने सर्वस्तरीय प्रयत्न करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.
 
- कोविड व्यतिरिक्त हिवताप (मलेरिया), डेंग्यू या आजारांबाबत देखील सजग व सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या दृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक व्यापकतेने राबविण्याचे महापालिकेच्या कीटकनाशक विभागाला आदेश दिले आहेत.