1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (09:02 IST)

अमरनाथ गुहेत शांतता झोन केलेला नाही…

दक्षिण काश्‍मीरमधील अमरनाथ गुहेमध्ये शांतता झोन जाहीर करण्यात आलेला नाही, असे राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट केले आहे. बर्फाच्या शिवलिंगाच्या समोर शांतता अबाधित राखली जायला पाहिजे, असे लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी म्हटले आहे.
 
हरित लवादाने अमरनाथ गुहेमध्ये शांतता झोन जाहीर केला आणि गुहेच्या मुख्य प्रवेशापासून धार्मिक विधींना प्रतिबंध जाहीर केल्याचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. अमरनाथ गुहेच्या परिसरामध्ये शांतता झोन निर्माण केल्याने हिमप्रपातासारख्या दुर्घटना टाळता येऊ शकतील, आणि निसर्गाचा समतोल सांभाळण्यास मदतच होईल, असेही पूर्वी हरित लवादाने म्हटले होते. मात्र त्यावर विश्‍व हिंदू परिषदेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. हरित लवादाच्या पूर्वीच्या आदेशांना “तुघलकी फतवा’ असे संबोधून पर्यावरणाशी संबंधित प्रत्येक समस्येला हिंदूच जबाबदार असत नाहीत, असेही विश्‍व हिंदू परिषदेने म्हटले होते.
 
पर्यावरणवादी कार्यकर्त्या गौरी मौलेखी यांनी अमरनाथ परिसर शांतता झोन करण्यासाठी हरित लवादाकडे अर्ज केला होता. मौलेखी यांनी मात्र हरित लवादाच्या या सूचनांचे स्वागत केले होते. शांतता झोन प्रस्थापित केल्यामुळे अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित आणि सोयीची होईल, असे त्यांनी म्हटले आहे. शांतता झोनमुळे या परिसरातील देवस्थानाचा परिसर आगामी पिढ्यांसाठी जतन करणे शक्‍य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
अमरनाथाची गुहा ही हिंदूंसाठी अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. संपूर्ण वर्षभर ही गुहा बर्फाखाली गाडलेली असते. केवळ उन्हाळ्यातील काही महिनेच ही गुहा यात्रेकरूंना दर्शनासाठी खुली असते.