बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:33 IST)

बाबरी मशिद प्रकरण : पुढील सुनावणी पाच डिसेंबरला

अयोध्येतील राम जन्मभूमी  आणि बाबरी मशिदीच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवजांचे भाषांतर येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मूळ कागदपत्रे, दस्तऐवज संस्कृत, पारशी, उर्दू आणि अरबी भाषांमध्ये आहेत. त्यांच्या भाषांतराचे काम पूर्ण झाले नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाने सुनावणीवेळी सांगितले. त्यानंतर  न्यायालयाने दस्तऐवजाच्या भाषांतरासाठी अवधी दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच डिसेंबरला होणार आहे.

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची तब्बल सात वर्षांनंतर सुनावणी झाली. सर्वात आधी सात भाषांमधील दस्तऐवजांचे भाषांतर करण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणावरील सुनावणीसाठी आणखी तारीख वाढवून दिली जाणार नाही, असेही  न्यायालयाने  निक्षून सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित नऊ हजार पानांचे दस्तऐवज आणि साक्षीदारांच्या साक्षी असलेली 90 हजार पाने पाली, फार्सी, संस्कृत, अरबीसह विविध भाषांमध्ये आहेत. त्यांचे  भाषांतर करण्याची मागणी सुन्नी वक्फ बोर्डाने न्यायालयाकडे केली.