बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (23:25 IST)

मोहन यादव : ज्यांच्या नावाची साधी चर्चाही नव्हती, तेच बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

Mohan Yadav
भाजपनं पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत, मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा केली. मोहन यादव यांची भाजपनं मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदी निवड केलीय.
आज (11 डिसेंबर) मोहन यादव यांची मध्य प्रदेश भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.
 
त्याचसोबत, मध्य प्रदेशात जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला हे दोघं उपमुख्यमंत्री असतील, तर नरेंद्रसिंह तोमर विधानसभेचे अध्यक्ष असतील.
 
मोहन यादव तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत. ते शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये उच्चशिक्षण मंत्री होते.
 
मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानं आता शिवराज सिंह चौहान यांना कुठलं पद दिलं जाणार, याची उत्सुकता अनेकांना आहे.
 
मात्र, कुठेही नावाची चर्चा सुद्धा नसलेले मोहन यादव अचानक मुख्यमंत्री कसे बनले आणि त्यांचा आजवरचा प्रवास कसा आहे, हे आपण या बातमीतून जाणून घेऊया.
 
भारतीय जनता पार्टीनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात विधानसभेच्या 230 जागांपैकी 163 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून कुणाचंही नाव जाहीर केलेलं नव्हतं.
 
मोहन यादव 2013 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते.
 
मोहन यादव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशीही संलग्न राहिलेले आहेत. ते मध्य प्रदेश कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
 
'माझ्या भावाला कष्टाचं फळ मिळालं'
या बैठकीच्या आधी राष्ट्रीय पातळीवर मोहन यादव यांचं नाव भावी मुख्यमंत्री म्हणून क्वचितच कुणी ऐकलं असेल. पण त्यांच्या बहिणीनं केलेल्या दाव्यानुसार, स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाची चर्चा होती.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार मोहन यादव यांच्या बहिणीनं म्हटलं की, "नावाची चर्चा होती, पण नक्की काही माहिती नव्हतं."
 
मोहन यादव यांच्या बहिणीनं म्हटलं की त्यांच्या भावाला कष्टाचं फळ मिळालं आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांच्या नावाचा अंदाज वर्तवला जात होता.
 
त्यात मोहन यादव यांचं नाव नव्हतं. पण विधिमंडळ नेतेपदी निवड होताच मोहन यादव यांचं नाव टीव्ही स्क्रीनवर झळकायला लागलं. त्यामुळं मोहन यादव हेच मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील, हेही स्पष्ट झालं होतं.
 
मोहन यादव यांचा राजकीय प्रवास :
 
1982- सह-सचिव, विद्यार्थी संघ, माधव विज्ञान महाविद्यालय
1984- अध्यक्ष, विद्यार्थी संघ, माधव विज्ञान महाविद्यालय
1984- नगरमंत्री, उज्जैन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
1986- विभाग प्रमुख
1988- राज्य सहमंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अभाविप
1989- राज्याचे प्रदेशाध्यक्ष
1991 - राष्ट्रीय मंत्री, अभाविप
1993- सहखंड कार्यवाह, उज्जैन नगर, आरएसएस
1996- खंड कार्यवाह आणि नगर कार्यवाह
1999- उज्जैन विभाग प्रभारी, भा.ज.यु.मो.
2000- नगर-जिल्हा महामंत्री, भाजप
2004- उज्जैन विकास प्राधिकरण अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)
2011- भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य (कॅबिनेट मंत्री दर्जा)
2013- पहिल्यांदा आमदार, उज्जैन दक्षिण
2018- दूसऱ्यांदा आमदार, उज्जैन दक्षिण
2020- मंत्री, उच्च शिक्षण विभाग, मध्य प्रदेश
मोहन यादव दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. ते खूप पूर्वीपासूनच संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्धार्थी परिषदेशी जोडले गेले होते.
 
1982 मध्ये ते माधव विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे सहसचिव आणि 1984 मध्ये त्याचे अध्यक्ष बनले. ते 1984 मध्ये उज्जैनच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नगर मंत्री बनले आणि 1986 मध्ये त्याचे विभागप्रमुख बनले.
 
2002-2003 मध्ये भाजपचे नगर-जिल्हा महामंत्री बनले आणि 2004 मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बनले.
 
2004 मध्ये त्यांना सिंहस्थ मध्य प्रदेशच्या केंद्रीय समितीचं अध्यक्ष बनवण्यात आलं.
 
समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा होता. त्यांना 2011 मध्ये मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास या संस्थेचं अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यावेळी या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा होता.
 
2018 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार बनले. 2020 मध्ये त्यांना राज्याचे शिक्षणमंत्री बनवण्यात आलं.
 
मोहन यादव बीएसएसी, एलएलबी असून त्यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. केलं आहे. त्याशिवाय त्यांनी एमबीए आणि पीएचडीही केलं आहे.
 
पूनम चंद यादव यांचे पुत्र मोहन यादव यांचा जन्म 1965 मध्ये झाला होता.
 
मोहन यादव यांच्या पत्नीचं नाव सीमा यादव असून त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.
 
शिवराज सिंह यांनी मांडला प्रस्ताव
माध्यमांतील वृत्तांनुसार आमदारांच्या बैठकीत मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि नंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं.
 
माध्यमांनी शिवराज सिंह चौहान यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्नही केला.
 
पण त्यांनी काहीही स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. या घोषणेच्या पूर्वीपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत शिवराज सिंह यांच्या बरोबरच नरेंद्र तोमर आणि प्रह्लाद पटेल अशा भाजप नेत्यांची नावं आघाडीवर असल्याची चर्चा होती.
मध्य प्रदेशात तीन डिसेंबरला निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर सोमवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह तीन पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत नवीन आमदारांची बैठक झाली. त्यात मोहन यादव यांची नेतेपदी निवड करण्यात आली.
 
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. बैठकीत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वात तीन केंद्रीय पर्यवेक्षकांचीही उपस्थिती होती.
 
'मी लहान कार्यकर्ता, मोदींची स्वप्नं पूर्ण करणार'
सर्व राजकीय विश्लेषकांना धक्का देत मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणारे उज्जैनचे आमदार डॉ.मोहन यादव यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा सादर केला.
 
त्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपालांना राजीनामा सादर केला.
 
नेतेपदी निवड झाल्यानंतर मोहन यादव म्हणाले की, "माझ्यासारख्या छोट्या नेत्याला अशा प्रकारची जबाबदारी देण्यासाठी केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाचा मी आभारी आहे. ही आहे भारतीय जनता पार्टी. मी या पदासाठी योग्य नाही, तरीही तुम्हा सर्वांचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळालं तर मी नक्कीच प्रयत्न करेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद."
 
ते म्हणाले, "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे स्वप्न घेऊन पुढं वाटचाल करू."
 
मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा करताना मध्य प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष बीडी शर्मा म्हणाले की, विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. चर्चेमध्ये नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय आणि प्रल्हाद पटेल असे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.
 
मोहन यादव यांच्या निवडीचा फायदा?
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपनं मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदी निवडून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
 
बिहारमध्ये जातीय जनगणनेचे आकडे समोर आल्यानंतर विरोधी पक्षांची आघाडी 'INDIA'आणि काँग्रेस पक्ष इतर मागासवर्गीय (ओबीसी) जातींच्या भागीदाराचा मुद्दा उपस्थित करत आहेत.
 
शिवराज सिंह चौहान ओबीसी आहेत आणि त्यांची जागा घेणारे मोहन यादव हेही ओबीसी प्रवर्गातील आहेत. तज्ज्ञांच्या मते, त्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून भाजपची नजर बिहार आणि उत्तर प्रदेशवरही आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, शिवराज सिंह चौहान सलग मुख्यमंत्रिपदी राहिल्यानं सरकारच्या विरोधात जी सत्ताविरोधी लाट तयार झाली आहे, ती थोपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
 
Published By- Priya Dixit