पुलवामा हल्ला आम्हीच केला
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचा दावा केला होता. यानंतर लगेचच काही वेळानंतर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्दने दुसरा व्हिडिओ प्रसिद्ध करून इम्रान यांचा दावा खोडून काढत पुलवामा हल्ल्यामागे 'जैश'च असून, त्याची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.
जैशने प्रसिद्ध केलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये संघटनेच्या बॅनरसमोर एक दहशतवादी भूमिका मांडताना दिसत आहे. पुलवामासारखे हल्ले आम्ही कधीही, कुठेही घडवून आणू शकतो.
आम्ही आमच्या इच्छेनुसार केव्हाही हल्ले करू शकतो, अशी दर्पोक्ती दहशतवादी संघटनेने केली आहे. या हल्ल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा इम्रान खान यांनी केलेला दावाही या व्हिडिओमध्ये खोडून काढण्यात आला आहे.