श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता
प्राचीन काळी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात थानकुसा तालुक्यामध्ये ‘पेनुगोंडा’ नावाचे एक गाव होते. या गावामध्ये ‘वासवी’चा जन्म झाला. म्हणून हे श्री कन्यका परमेश्वरीचे जन्मस्थान पेनुगोंडा म्हणून ओळखले जाते.
पेनुगोंडा येथे राजा कुसुमश्रेष्ठी व राणी कुसुमांबा यांचे राज्य होते. बर्याच वर्षानंतरही त्यांना मूल होत नव्हते, म्हणून त्यांनी आपले गुरू भास्कराचार्या यच्याशी आपल्याला आपत्य होत नाही व वंश नाही म्हणून विचारणा केली. त्यावर भास्कराचार्यंनी राजा कुसुमश्रेष्ठीला पुत्रकामेष्टी यज्ञाची माहिती देऊन तो यज्ञ करावा असा सल्ला दिला. त्यानुसार राजाने कुसुमांबा यांना सांगून त्यांची संमती घेतली व यज्ञाचे पौरोहित्य आपले गुरू भास्कराचार्यांना स्वीकारण्यास विनंती केली आणि भास्कराचार्यांनी ती तत्काळ मान्य केली. त्याप्रमाणे यज्ञ करण्यात आला. या यज्ञामुळे देवदेवता प्रसन्न झाल्या. त्यांनी यज्ञेश्वरामार्फत प्रसाद पाठविला. आकाशवाणी झाली की, हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर कुसुमश्रेष्ठीला अपत्य प्राप्त होईल. त्याचवेळी सर्व देवतांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यानुसार कुसुमांबा यांनी वैशाख शु।। 10 वार शुक्रवार उत्तरा नक्षत्रावर कन्या राशीमध्ये दोन जुळ्यांना जन्म दिला. मुलांचे नाव विरूपाक्ष व मुलीचे नाव वासवी ठेवण्यात आले. कालांतराने चंद्राच्या कलेप्रमाणे वासवी मोठी होत गेली.
त्यावेळेस क्षत्रियांचा राजा विष्णुवर्धन हा होता. तो युद्ध करून व युद्धामध्ये विजय मिळवून परत जाताना पेनुगोंडा येथे आला तेव्हा कुसुमश्रेष्ठींनी त्यांचे आदरातिथ्य करून विजयी मिरवणूक काढली व विष्णुवर्धन राजाने विश्रंतीसाठी तेथेच तळ ठोकला. त्यानंतर नगरातील सर्व लोक त्याचा सत्कार करणसाठी येऊ लागले. तोच राजा कुसुमश्रेष्ठींनी आपल्या परिवारांची ओळख करून दिली. मोठा मुलगा विरूपाक्ष व मुलगी वासवी आणि पत्नी कुसुमांबा. वासवीचे रूप पाहताक्षणी राजा विष्णुवर्धन मूर्छित झाला. कारण वासवी ही एवढी सुंदर, तिचे डोळे, तिच्या चेहर्यावरील तेज, गौर वर्ण, नाजूक पाहून तो तिला पाहातच राहिला. आणि तिच्या तो मोहात पडला.
तद्नंतर तो आपल्या राज्यात परत गेला आणि त्याने पेनुगोंडा येथील राजा कुसुमश्रेष्ठी यांना वासवीच्या विवाहाची मागणी घातली. विवाहाचा प्रस्ताव देऊन आपले प्रतिनिधी पेनुगोंडास पाठविले. राजाने राजसभा बोलविली आणि सर्वाना तो प्रस्ताव सांगितला. वैशंचे 714 गोत्रज चर्चेसाठी सर्व नगरातून बोलविण्यात आले. सर्वाचे एकमत होत नव्हते. 714 पैकी 102 गोत्रज राजा कुसुमश्रेष्ठीच बाजूने बोलत होते. त्यामुळे त्यामध्ये दोन गट निर्माण झाले. आणि 612 गोत्रज वैश्य कुळामधून वेगळे झाले. आणि तेव्हापासून 102 गोत्रजच लोकांना ‘आर्य वैश्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. विष्णुवर्धन राजाला विवाह संबंधीचा नकार प्रस्ताव पाठविला. परंतु त्याने युद्धकरून वासवीला जिंकून तिच्याशी विवाह करण्याचा आग्रह धरला. ही बातमी पेनुगोंडा येथील नगरात वार्यासारखी पसरली. राजा व प्रजा चिंताक्रांत झाले. ही सर्व बातमी वासवीला समजली. तिने आपल्या पित्यास आपले मत सांगितले, मला युद्ध करणे व त्या युद्धामध्ये माझ्यामुळे रक्तताप व्हावा हे मान्य नाही. आपण दुसर्या पद्धतीने युद्धास सामोरे जाऊ, असे म्हणून तिने आपले विचार व योजना सांगितली. आपण अहिंसा व त्यागाची भूमिका घेऊन आपण युद्धांचे नियंत्रण करू या. हा विचार सर्व उपस्थित मंडळींना पटला त्यानुसार राजाने सर्वजण वासवीच्या आदेशांचे पालन करतील, असा हुकूम काढला. तद्नंतर सर्व नगरांमध्ये तयारी सुरू करण्यात आली. सर्व नगर सजविण्यात आले. कुसुमश्रेष्ठी व 102 गोत्रज एकदम आनंदीत होते. सर्वाना नगरेश्वर मंदिराजवळ जमा होण्यास सांगितले. तेथून सर्वजण वासवीच्या सांगण्यावरून गोदावरी नदीकडे कूच केली. तेथे वासवीच्या आदेशाने 103 अग्निकुंडाची तयारी करण्यात आली. वासवी स्वत: मधल्या अग्निकुंडासमोर उभी राहिली आणि 102 (गोत्रजांना) दाम्पत्यांना प्रत्येक अग्निकुंडासमोर उभे राहण्यास सांगितले. तिने सांगितले की, मी स्वत: अग्निकुंडात उडी मारणार आहे. आपण ही उडी माराला तार आहात का? असा प्रश्न केला, सगळे विचारात पडले. सर्वाना कळले की, वासवी ही साधी नाही, तिच्यामध्ये गूढशक्ती वास करीत आहे. तिने आपले विश्वरूप दाखवायचे ठरवले. वासवीने सांगितले की, मी आदिशक्तीचा अवतार आहे. मीच महिषासुराचा वध केला. शुंभ, निशुंभ राक्षसाचाही वध मीच केला. त्रेतायुगामध्ये मी सीतादेवीचे रूप धारण केले. द्वापरुगात यशोदाच्या पोटी दुर्गा या नावाने जन्म घेतला. या कली युगामध्ये स्त्रिांना संरक्षण देण्याचा मी निश्चय केला म्हणून मी ‘वासवी ब्रह्मचारिणी’ या नावाने वैश्य कुळामध्ये जन्म घेतला हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. वासवीचे मूळरूप पाहून सर्वजणांनी साष्टांग नमस्कार केला. ती म्हणाली, माझ्या या योजनेची माहिती मिळताच विष्णुवर्धन राजाचा नाश होईल.
त्याचदिवशी म्हणजे माघ शुद्ध द्वितीया 102 गोत्रज वैश्य दाम्पत्यांनी ईश्वरांचे चिंतन करीत अग्निकुंडाला प्रदक्षिणा मारली आणि विष्णुवर्धन राज्याविषयी राग आणि असामाधान व्यक्त केले. सर्वानी अगदी प्रसन्न चित्ताने वासवीसहीत अग्निकुंडात उडय़ा घेतल्या.
ही वार्ता विष्णुवर्धन राजास कळताच त्याला धक्का बसला. त्यांच्या हृदयाचे व डोक्याचे तुकडे तुकडे झाले. त्याची जीवनात्रा संपुष्टात आली. त्याने जसे कर्म केले तसे त्याला फळ मिळाले. विष्णुवर्धन राजाचा अंत झाला. ही बातमी कळताच त्याचा पुत्र नरेंद्र त्वरित पेनुगोंडा नगरीत आला व त्याने विरूपाक्षांच्या पायावर लोळण घेतले. विरुपाक्षाने त्यास जवळ घेऊन अलिंगन दिले. आता तरी धर्माचे पालन कर असे वचन नरेंद्र राजाकडून घेतले. नरेंद्र राजाने तस मन:पूर्वक श्रद्धेने विरूपाक्षाला नमस्कार केला. त्यानंतर भास्कराचार्यांनी विरूपाक्षास काशीला जाऊन पित्याचे पिंडदान करण्यास सांगितले आणि तेथून परत आल्यावर मला तुझ्याकडे राज्य स्वाधीन करायचे असे सांगितले. नंतर तो आल्यावर अगदी थाटामाटात त्यांचा पेनुगोंडा येथे राज्यभिषेक करण्यात आला. श्री कन्का परमेश्वरीचा पुतळा नगरेश्वरांच्या मंदिरात उभारण्यात आला. त्यानंतर ते मंदिर ‘वासवी कन्का परमेश्वरीचे’ मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. वासवीची मूर्ती स्थापन केल्यानंतर दुसर्याच दिवशी विरूपाक्षला राज्याभिषेक करण्यात आला.
‘वैश्य कुलभूषण राजधिराज राजमार्तड विरूपाक्ष अमर रहे’ असा सर्वानी उद्घोष केला.
सुनील धरणे