रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (13:18 IST)

मॅनेजर होताना...

आपण प्रथमच मॅनेजर म्हणून लोकांसमोर जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे सर्वांना खूशठेवून काम करून घेण्याची कला आपल्याला यायला हवी. कर्मचार्‍यांत सुसंवाद ठेवणे, कामात स्पष्टता असणे, वेळेबाबत शिस्त असणे आदी गोष्टींच्या जोरावर आपण यशस्वीपणे कर्मचार्‍यांचे नेतृत्व करू शकतो.

कामाचे वाटपः जर आपण प्रथमच मॅनेजरपदाचा कार्यभार स्वीकारला असेल तर कामाचे वाटप करण्याची कला आपल्याला यायला हवी. जर आपण प्रभावीपणे कामाचे वाटप केले नाही तर ते आपले अपयश ठरू शकते. लक्षात ठेवा की, प्रत्येक काम आपल्याला करायचे नाही. पण समोरील व्य्रतीकडून, सहकार्‍यांकडून चांगल्या पद्धतीने काम कसे करून घेता, यावर आपले कौशल्य अवलंबून असते. कर्मचार्‍यांत सुसंवाद राखून आणि कामाचे ओव्हरलॅपिंग होऊ न देता कंपनीचे उद्देश साध्य करण्याचे कसब आपल्या अंगी असावे.

ध्येयात स्पष्टता असावीः आपल्या टीममधील प्रत्येक सहकार्‍यांना कामाची जबाबदारी समजून सांगायला  हवी. मॅनेजर या नात्याने प्रत्येक कर्मचार्‍यांशी संवाद ठेवायला हवा आणि अडचणी दूर करण्यास मदत करायला हवी. कामाबाबत आणि जबाबदारीबाबत स्पष्टता नसेल तर गोंधळ उडेल आणि ध्येय साध्य करण्यास अडचणी येतील. कर्मचार्‍याच्या कुवतीप्रमाणेच कामाचे वाटप केले तर ते आणखी सोपेपडेल. कामात संभ्रम राहणार नाही, याची दक्षता मॅनेजरने घ्यायला हवी.

टीमची माहितीः चांगला मॅनेजर किंवा व्यवस्थापक हा आपल्या टीममधील सदस्यांसंबंधी अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक कर्मचार्‍याचे स्वप्न असते. अशा स्थितीत मॅनेजरने त्याचे स्वप्न ओळखून त्यानुरुप संधी उपलब्ध करून देण्यास आग्रही राहिले पाहिजे. या कृतीतून टीम मॅनेजर हा सर्व सदस्यांशी, कर्मचार्‍यांशी, सहकार्‍यांशी भावनिकरीत्या जोडला जातो.

एकूण घेण्याची कलाः वेळोवेळी फिडबॅक घेणे हे मॅनेजरसाठी चांगली बाब ठरू शकते. याशिवाय संतुलित फिडबॅक देण्याची कलादेखील यायला हवी. आपले ज्ञान पाजळण्याऐवजी एक चांगला मॅनेजर हा सर्वांचे म्हणणे ऐकून घेतो आणि चांगल्या मताची कदर करतो. सर्वोत्तम मॅनेजर हा ज्यूनिअर किंवा सिनियर असा भेदभाव न करता विचारांना सन्मान देणारा असावा.

उणिवांवर काम : मॅनेजरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अगोदर आपल्या उणिवा दूर कराव्यात आणि नंतर नेतृत्वक्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. संवाद कौशल्य, कामावरचे प्रभुत्त्व, टीमवर्क हे गुण वृद्धिंगत करणे महत्त्वाचे आहे.