शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By

UPSC पूर्वपरीक्षा : परीक्षेला जाण्यापूर्वी 9 टिप्स लक्षात ठेवा

- रोहन नामजोशी
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे पूर्वपरीक्षा रविवारी पार पडणार आहे. आता एका दिवसात किती अभ्यास करूया आणि किती नको अशी अवस्था झाली असेल, उद्याचा दिवस कसा असेल, त्याची सातत्याने धाकधूक होऊन पोटात खड्डाही पडला असेल. पण एक दीर्घ श्वास घ्या आणि खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या.
 
1. अभ्यासाचा अतिरेक टाळा
तुम्ही गेले वर्षभर किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त या परीक्षेचा अभ्यास करत आहात. त्यामुळे एका दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण अभ्यासक्रमाचा आवाका पाहता ते शक्य नाही. प्रयत्न करायला गेल्यास वेळ फुकट जाईल आणि काळजी वाढेल. त्यामुळे अगदी हलकाफुलका अभ्यास करा आणि आपला अभ्यास पुरेसा झाला आहे, असं सतत स्वत:ला सांगत रहा. शांत वाटेल.
 
2. कमी बोला
हे जरा कठीण आहे तरी बघा जमतंय का. आजच्या दिवशी व्हॉट्स अप, फेसबुक, टेलिग्रामवर भारंभार येणारं मटेरिअल वाचण्याच्या मोहात पडू नका. नेट बंद करून ठेवा. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं टाळा. अभ्यास झाला का? हे वाचलं का? ते वाचलं का हे तर अजिबात विचारू नका.
 
3. परीक्षा केंद्राची संपूर्ण माहिती घ्या
आतापर्यंत कदाचित घेतलीही असेल. मात्र नसेल घेतली तर लगेच घ्या. आपल्या घरापासून केंद्र किती दूर आहे, जायला किती वेळ लागतो, तिथे जाण्याची साधनं कोणती, किती वाजता घरातून निघणार, गाडीने जाणार असाल गाडीत हवा आणि पेट्रोल भरून ठेवा. गाडी सुस्थितीत ठेवा अन्यथा वेळेवर धावपळ होईल. ओळखपत्राबरोबर हल्ली परीक्षा केंद्रावर सरकारी ओळखपत्राची प्रतही मागतात. त्या प्रती आजच काढून ठेवा.
 
शक्यतो दोन तीन जण मिळून जाण्याच्या भानगडीत न पडलेलं. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा पेपर बुडाला अशी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ओला उबर करणार असाल तर आजच बूक करा.
 
4. शांत झोप घ्या
आता म्हणाल, "चेष्टा करता का राव?" पण शांत झोप घ्या. जागरण तर अजिबात करू नका. एका रात्रीत कोणीही IAS होत नाही या वाक्याचा विस्तारित अर्थ लक्षात घ्या. जास्त विचार करू नका.
 
5. युद्धाला निघताना...
ओळखपत्रावर जी वेळ दिलेली असते त्या वेळेत पोचलंच पाहिजे. साधारण पेपर सुरू होण्याच्या आधी एक तास आधी पोहोचण्याच्या सूचना असतात. एक तासाच्या पाच मिनिटं आधीच पोहोचा. निघताना पाण्याची बाटली, टोपी, रुमाल, गॉगल या गोष्टी स्वत:जवळ बाळगा. या अगदी बेसिक सूचना असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष होतं. सध्या तीव्र उन्हाळा आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी एक कांदा बरोबर ठेवा. रस्त्यावरची शीतपेयं पिणं टाळलंत तर अतिउत्तम. निघण्याच्या आधी हलका आहार घ्या. मिसळ, वडापाव वगैरे तर अजिबात नको. त्याने पेपर सोडवताना आळस येण्याची शक्यता असते. त्यामुळे हलका आहार घ्या.
 
6. प्रत्यक्ष युद्धभूमीवर
आपली परीक्षेची खोली, जागा मिळाली की आपलं साहित्य जपून ठेवा. फार मौल्यवान गोष्टी बाळगू नका. मोबाईल बंद करून बॅगमध्ये ठेवा. आपल्या जागेवर बसताना कागदाचे चिटोरे, परीक्षेशी निगडीत साहित्य तर नाही ना याची खातरजमा करून घ्या. वर्गात बसल्यावर परीक्षेशी निगडीत औपचारिकता उदा. उत्तरपत्रिका, सह्या, हे सगळं करायला वेळ असतो. ही प्रक्रिया सावधगिरीने पार पाडली जाते. तेव्हा संयम बाळगा. काही अडचण आल्यास पर्यवेक्षकाशी शांतपणे बोला. त्यांच्याशी वाद तर अजिबात घालू नका. तसंच आपल्या मागे पुढे बसलेल्या स्पर्धकांशी मैत्री करण्याच्या फंदात अजिबात पडू नका. उत्तरपत्रिकेवरची माहिती डोळ्यात तेल घालून भरा. तिथली एक चूक महागात पडू शकते. एकदा पेपर हातात पडला की मग आत्मविश्वासाने सामोरे जा.
 
7.मध्यांतर
दोन पेपरच्या मध्ये दोन तासांची सुट्टी असते. घरून डबा आणल्यास उत्तम. जर नसेल तर आसपास चांगलं हॉटेल शोधा. पुन्हा तोच मंत्र मसालेदार जेवण टाळा. साधं जेवण घ्या. मध्यांतरात अधाशासारखे फोन करून कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर होतं, किती अटेम्ट केले या चर्चा अजिबात करू नका. यामुळे मनोबलावर परिणाम होतो. दुसऱ्या पेपरसाठी स्वत:ची बॅटरी चार्ज करा. वाटलं तर बसल्या बसल्या एखादी डुलकी घेऊन ताजेतवाने व्हा. पुन्हा तेच की अनोळखी स्पर्धकांशी मैत्री टाळा. त्याचा फारसा फायदा होत नाही. वेळ वाया जातो. या मध्यांतरात अभ्यास करणं टाळा. जे एक वर्षांत झालं नाही ते एक तासात शक्य होत नाही. त्यामुळे त्या वाटेला न गेलेलं बरं.
 
8. परीक्षेनंतर
परीक्षा आता झालेली असेल. तुम्ही अगदी ब्रह्मदेवाला आवाहन केलं तरी उत्तरं बदलणार नाही. त्यामुळे त्यावर अजिबात विचार करू नका. व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चेचा रतीब पडतोच. मोबाईल हा अविभाज्य घटक असल्यामुळे या चर्चा झडणारच. त्या चर्चेमुळे मन:शांती घालवू नका आणि खोचक मेसेज करून दुसऱ्यांचीही. तसंच Answer Keys घेऊन लगेच पडताळणी करू नका. दोन तीन दिवस थांबा.
 
9. ब्रेक घ्या
परीक्षा झाल्यानंतर लगेच मेन्सचा अभ्यास करायला घेऊ नका. थोडा ब्रेक घ्या, ताजेतवाने व्हा, मग नव्या दम्याने अभ्यासाला लागा.