पुन्हा पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांनो घ्या काळजी
येत्या ७ ते ९ जानेवारी या दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो.पुढील आठवड्यात उत्तर-भारतातातून पश्चिम दिशेकडे वारे वाहणार आहेत. त्याच्या प्रभावामुळे हवामानात अस्थिरता निर्माण होऊन विदर्भातील बऱ्याच भागात ढगाळ हवामान आणि मेघ-गर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच भागात तर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात (प्रामुख्याने पूर्व तालुक्यांमध्ये) मेघ-गर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व-विदर्भात काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येणार नाही. पावसाचे प्रमाण आणि शक्यता ८ तारखेला अधिक राहिल तर, ९ तारखेला पावसाचे प्रमाण कमी होऊन पूर्व-विदर्भातच पावसाची शक्यता राहिल, असे मत देखील व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाडा आणि खानदेशासह मध्य-महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.