रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (14:22 IST)

भंडारदरा येथे मद्यधुंद पर्यटकांची पोलिसांना व स्थानिकांना मारहाण

अकोले तालुक्यातील भंडारदरा क्षेत्रांत चांगला पाउस येत असल्याने पर्यटकांची गर्दी झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात नाशिक, मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात व आनंद लुटतात.
 
धरणाच्या भिंतीवर पोलीस बंदोबस्त असून पर्यटकांना भिंतीवर जाण्यास मनाई असताना तरीही काही पर्यटक पोलिसांना न जुमानता दादागिरी करत भिंतीवर जात असतात. असाच प्रकार शुक्रवारी चार वाजेच्या सुमारास घडला.
 
संगमनेर, सिन्नर, अकोले तालुक्यातील काही पर्यटक फिरण्यास आले असता त्यांनी स्लीपवेवर जाण्याचा प्रयत्न केला असता कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी त्यांना जाण्यास मनाई केली.
 
मात्र ते मद्यधुंद नशेत असल्याने त्या पर्यटकांनी पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांना धक्काबुक्की करत हाणामारी करण्याचा प्रयत्न केला. तसेच दगड मारून जखमी केल्याचे कृत्य केले. या हाणामारीत स्थानिक नागरिकही जखमी झाले आहे. पोलिसांचे कपडे फाडतात यामुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व्यावसायीकानी केली आहे.
 
याप्रकरणी पोलीस कर्मचारी रवींद्र रंगनाथ गोंदे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी किरण कोंडाजी उगले, ज्ञानेश्वर विश्वास कदम, विनोद संतोष औटी,आकाश सतीश उगले सर्व रा. अकोले, ज्ञानेश्वर गणपत लांडगे रा. संगमनेर, अजित बाळासाहेब शिंदे रा. सिन्नर यांना हाणामारी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.