शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मे 2018 (15:11 IST)

राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवा - धनंजय मुंडे

- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी
 
राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल हरभरा खरेदी अभावी नोंदणी करूनही पडून​​ आहे. त्यामुळे राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावीत अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेयांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
 
मागील दोन ते तीन महिन्यापासून केंद्र सुरू असूनही हरभरा खरेदी सुरु नव्हती, हरभऱ्याला बारदानाही उपलब्ध नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली नाही. हजारो शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती मात्र शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली नाही अशी माहिती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
 
खरेदी केंद्राच्या आवारात लाखो क्विंटल हरभरा पडून आहे, पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे हरभऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तातडीने खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
 
बाजारात हरभऱ्याला कमी भाव आहे अशात शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांशिवाय पर्याय नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे त्याला तात्काळ मदत करावी असेही ते म्हणाले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही याबाबतीत केंद्राला प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह आमदार जयवंत जाधव, आंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख उपस्थित होते.