सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (11:13 IST)

एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क झाला आहे, संजय राऊत यांची माहिती

eknath shinde
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील 11 आमदारांसोबत त्यांनी सुरतच्या ल मेरेडिअन हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे निमंत्रण दिले असता त्याच वेळी एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचं स्पष्ट होत आहे. निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
 
विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची पीछेहाट झाल्याने हा वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल येत असून त्यांच्या फोनवर कॉल केल्यानंतर गुजराती टोन ऐकू येत आहे.
 
एकनाथ शिंदे गुजरातमधल्या सुरत इथल्या ला मेरिडियन हॉटेलमध्ये आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार फुटल्यास महाविकास आघाडीचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं.
 
दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की "एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. काही आमदारांना घेराबंदी करून गुजरातमध्ये ठेवण्यात आले आहे."
 
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सोमवार संध्याकाळपासून आहे. आमदार संपर्क कक्षेच्या बाहेर गेल्याचं कळताच वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मुंबई आणि परिसरातील आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.
 
शिवसेनेविरोधातील कटकारस्थान - नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे म्हटले आहे.
 
गोऱ्हे म्हणाल्या, "एकनाथ शिंदे आमचे अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत. एकनाथ शिंदे नेहमीच भेटतात पण रोज सगळे नेते एकमेकांना भेटत नाही. किती तासांपासून, किती सेकंदापासून ते नॉट रिचेबल आहेत याची मला कल्पना नाही.
 
"अतिशय कार्यक्षम आणि कार्यबाहुल्य असणारे नेते आहेत. विधान परिषदेच्या कामासाठी त्यांनी अनेक दिवस गुंतवून घेतलं होतं. दिवसरात्र कामं सुरू होती. त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी आहे. काल मतदान झाल्यानंतर पक्ष कार्यालयात आम्ही जमलो तेव्हा एकनाथ शिंदे तिथे होते.
 
"चर्चा करत होते, बोलत होतो. मुख्यमंत्र्यांनी येऊन आमदारांशी बातचीत केली होती. आताच्या घडीला ते कुठे आहेत यावरून तर्कवितर्क करण्याची गरज नाही. ते लवकरच सगळ्यांच्या संपर्कात येतील.
 
"शिवसेनेविरोधात कटकारस्थानं रचली जातात त्याच्या पाच पायऱ्या आहेत. अशा विचारातून काही साधलं नाही तरी विधायक कामावर पाणी फेरलं जातं. हितशत्रूंचा डाव असतो. प्रत्येक आमदार मला कुठे ना कुठे भेटलेले आहेत. एकनिष्ठ आणि प्रामाणिक असे आमदार आहेत जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ देतात. आम्हाला मतदानावेळी आमचा कोटा व्यवस्थित मिळाला होता. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले.
 
"बिनबुडाच्या निराधार बातम्या आहेत. कुणाची मतं कुठे गेली आहेत याबद्दलचा निष्कर्ष अंतर्गत अभ्यास-चर्चेनंतरच कळू शकतो. निवडून आल्यानंतर आम्ही मातोश्रीवर जातो. विजयी उमेदवारांना वहिनी रश्मी ठाकरे ओवाळतात.
 
"ही एक परंपरा आहे. प्रत्येक गोष्टीत गैरसमज पसरतात. वर्षावर भेटायला जाणं आणि आज जी बैठक आहे यामध्ये दैनंदिन कामं असतात. काहीतरी वाईट घडलंय म्हणून बैठक बोलावलेय असं नाही. शिवसेनेचं यश आहे ते झाकण्यासाठी अपप्रचार केला जात आहे," असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
 
आज दुपारी 12 वाजता शिवसेना आमदारांची बैठक पुन्हा एकदा बोलावण्यात आली आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.
 
शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.