मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (20:25 IST)

विधान परिषद निवडणूक : दुपारी 3 वाजेपर्यंत 279 आमदारांचं मतदान पूर्ण

vidhan
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 279 आमदारांचं मतदान पूर्ण झालं.
 
सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये थेट लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतेय.
 
विधानपरिषद निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना रंगणार आहे.
 
विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी अपक्षांच्या जोरावर बाजी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पराभव करून त्यांनी तिसरा उमेदवार जिंकून आणला होता. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
 
हरिभाऊ बागडे यांनी पहिला मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिंग एजंट म्हणून प्राजक्त तनपुरे, अनिल पाटिल आणि संजय बनसोडे कार्यरत आहेत. भाजपकडून संजय कुटे, अतुल भातखळकर, रणधीर सावरकर,आशीष शेलार, राहुल नार्वेकर तर कॉंग्रेसचे पोलिंग एजंट अमर राजूरकर, सुनील केदार, यशोमती ठाकूर, अस्लम शेख पोलिंग एजंट म्हणून काम पाहत आहेत.