रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2017 (11:27 IST)

शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या अशोक मोरे यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर आंदोलन सुरु असताना पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये झटापट झाली. यावेळी लाठीचार्ज सुरु झाला. त्यानंतर मोरे हे पळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं उपचारापूर्वीच निधन झालं.

दुसरीकडे पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात बुधवारी संध्याकाळी १ जून रोजी पोलिस आणि आंदोलक यांच्या मध्ये तणाव निर्माण होवून पोलिसानावर दगडफेक झाली होती.पिंपळगावला आंदोलन कर्त्यांना पळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच हवेत गोळीबार करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यात बापू जाधव नावाच्या शेतकऱ्याला नळकांडी लागल्याने तो जखमी  झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर पोलिस अधिकारी सुद्धा जखमी झाले होते.त्यामुळे अजून स्थिती खराब होवू नये यासाठी १४४ लागू झाले असून २ जून दुपारी ४ पर्यंत हे लागू राहणार आहे.या कलमा अंतर्गत ५ पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी येऊ शकत नाही. जर आले तर कलम १४४ चे  उल्लंघन समजल्या जाते आणि अटक होऊ शकते.