बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (17:02 IST)

सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाने विष प्राशन करत संपवलं आयुष्य

नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यात एका महिला सरपंचाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मरळगोई खुर्द येथील महिला सरपंच योगिता अनिल फापाळे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यावर महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरकडच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटकही करण्यात आली आहे.
 
महिला सरपंच झाल्यानंतर तिच्या सासरी तिचा छळ सुरु झाला. सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला वैतागून महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. भावाने दिलेल्या तक्रारीनंतर महिला सरपंचाच्या पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला सरपंचाच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मयत महिला सरपंच योगिता फापाळे यांचे भाऊ संतोष शांताराम गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीचा तिच्या सासुरवाडीचे लोक छळ करत होते. तक्रारीत म्हटल्यानुसार, माझ्या बहिणीचा कोणत्याही कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची तक्रार गवळी यांनी केली आहे. सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे (सर्व रा. मरळगोई खुर्द) या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.