मंगळवार, 29 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (07:54 IST)

अकोला जिल्ह्यात शुक्रवारपासून जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती

अकोला जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटसक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात रोखून अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अपघातात नागरिकांचा हकनाक बळी जातो. त्यापैकी 80 टक्के मृत्यू हे डोक्यावर जबर दुखापत लागल्यानेच होत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे हेल्मेट परिधान केल्यास जीव वाचू शकतो. अशातच सर्वोच्च न्यायालयाने दरवर्षी 10 टक्के अपघातात कमी करण्याचे निर्देश परिवहन मंत्रालय यांना दिले असून प्राणांतिक अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट दिल्याने त्या अनुषंगाने उपाय योजण्याच्या सूचना सर्व संबधितांना देण्यात आल्या आहेत.
सर्वसामान्य दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे, विना हेल्मेट चालकांवर येत्या शुक्रवारपासून शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली असून सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याचं आवाहन केलं आहे.