रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (09:55 IST)

नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

नाशिक येथील आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मॉडेल आयटीआय करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी ८.९९  कोटीच्या प्रकल्प किंमतीस केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. यात केंद्र व राज्याचा हिस्सा ७०:३० असा आहे.  जागतिक बँक सहाय्यित स्ट्रीव्ह ( Strive)  प्रकल्पांतर्गत या संस्थेचा समावेश करण्यात आला आहे.  स्ट्रीव्ह प्रकल्पांतर्गत स्थापन केलेली व सोसाईटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आयएमसी सोसाईटी या योजनेची अंमलबजावणी करील.  आयएमसीला सर्व व्यवसायाच्या उपलब्ध जागेच्या २० टक्के जागांवर प्रवेश अधिकार राहतील.
 
स्थानिक उद्योगधंद्यांच्या मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून देण्यात येणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाची गुणवत्तावाढ करण्यासाठी  तसेच प्रशिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट होण्यासाठी राज्यातील किमान एका विद्यामन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा “मॉडेल आय.टी.आय” म्हणून दर्जावाढ करण्यात येईल. ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थानिक उद्योगधंद्याच्या मागणीनुसार कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी  प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्र म्हणून काम करील.
 
स्थानिक औद्योगिक आस्थापनांसोबत प्रभावी संबंध राखणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण सुविधांचा इष्टतम वापर करण्यासाठी दुसरी व तिसरी पाळी सुरु करणे,  औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मनुष्यबळाला या संस्थेत प्रशिक्षण घेण्यासाठी आकर्षित करणे, असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षण देणे  ही या केंद्राच्या कामाची उद्दिष्ट्ये असतील. ही मॉडेल आय.टी.आय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी, उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था राहणार असून औद्योगिक आस्थापनांसोबत प्रभावी समन्वय स्थापणारी संस्था म्हणून विकसित करण्यात येईल.  या संस्थेने योजनेअंतर्गत केलेल्या आदर्श कामगिरीचे अनुकरण राज्यातील इतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये करणे अपेक्षित आहे.
 
स्थानिक उद्योगधंद्यांना अपेक्षित असलेली कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेणे, यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, यातील पायाभूत सुविधांची यादृष्टीने दर्जोन्नती करणे, ग्रंथालय, वर्कशॉप, संगणक लॅब, माहिती तंत्रज्ञान सुविधांची दर्जोन्नती, तेथील स्वच्छता, सुरक्षितता आणि दर्जावाढ याकडे लक्ष देणे, पर्यवेक्षकाच्या रिक्त जागा भरणे, प्रशिक्षित मनुष्यबळाला नोकरी मिळवून देण्यासाठी सेलची स्थापना करणे, यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, कालबाह्य व्यवसाय बदलणे, अशा वेगवेगळ्या महत्वाच्या कामांची पुर्तता या मॉडेल आय.टी.आयकडून अपेक्षित आहे.