नाशिक पोलिस प्रभागातील उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड नि:शुल्क देणार
नाशिक पोलिसही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे दिसत आहे. आपल्या प्रभागातील उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, याची माहिती मतदारांना नि:शुल्कपणे देण्याची सुविधा नाशिक पोलीसांनी सुरु केली आहे. अशी सुविधा देणारे राज्यातले नाशिक हे एकमेव पोलीस आयुक्तालय असणार आहे.
सध्या गुंडांनी राजकारणात येण्याचे आणि राजकारण्यांनीही त्यांना पक्षात घेवून पवित्र करण्याचा धडाका सुरु केला आहे. याविरोधात सर्वसामान्यांमध्ये अव्यक्त रोषही आहे. परंतू अनेकदा आपल्या प्रभागातील उमेदवारावर खरंच किती आणि कुठले गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मतदारांना नसते. हीच गरज ओळखून नाशिक पोलीसांनी हे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोग मतदानाच्या दिवशी गुंड उमेदवारांची कुंडली मतदानकेंद्रांबाहेर लावणार आहे. परंतू तत्पुर्वीच अशा गुन्हेगारांची माहिती नागरीकांना मिळावी यासाठी नाशिक पोलीसांनी हा उपक्रम सुरु केला आहे. झोन-1 मध्ये मागेल त्याला निशुल्क माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.