शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यातील सर्वाधिक कमी तपमानाची नोंद निफाडला

राज्यातील सर्वाधिक कमी तपमानाची नोंद निफाड येथे झाली आहे. या ठिकाणी ४ डिग्री सेल्सिअस तपमान नोंदविले गले आहे.गेल्या काही दिवसापर्यंत गुलाबी वाटणारी थंडी आता नाशिककरांना हुडहुडी भरत आहे. नाशिमध्ये पारा ६ अंशावर होता तर निफाडमध्ये  तापमान 4 अंशांपर्यंत खाली आले आहे. निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची ही नोंद झाली आहे. आता नागरीकांच्या दैनंदिन जीवनावर थंडीचा परिणाम झाला आहे. विशेष करून जेष्ठ नागरिकांना थंडीचा त्रास अधिक जाणवत आहे. तर वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागायतीदार चिंतेत सापडला आहे.
 
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष बागा या निफाड तालुक्यात आहेत. राज्यात सातत्याने नीचांकी तपमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी, पिंपरी, सुकेणे, चांदोरी, कोकणगाव, पिंपळगाव या भागात होत आहे. त्यामुळे थंडीमुळे निफाड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. निफाड तालुक्यासह कादवा, बाणगंगा, गोदा खोऱ्यात थंडीचा जोर कायम आहे. पिंपळगाव, निफाड, सुकेणे, ओझर या भागातील द्राक्षांना या थंडीचा फटका बसत आहे. सुरुवातीला पडलेली थंडी ही  द्राक्षासाठी पोषक होती. मात्र पारा सातत्याने खाली गेल्याने द्राक्ष फुगवणीवर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष मणी फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतीदार चिंतेत सापडला आहे. अनेक द्राक्ष बागामध्ये तापमान वाढवण्यासाठी  शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर काही बागायतीदारांनी बागे भवती मोठ मोठी कापडे गुडाळली आहेत. जेणेकरून द्राक्षाना थंडी कमी लागेल. शहरी भागात लोक गरम कपडे दिवसभर परिधान करून ठेवत आहेत. रस्त्यावर गर्दी कमी झाली आहे. दिवसभर चहाच्या टपर्यांवर गर्द्री दिसत आहे.