1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (16:01 IST)

जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

jitendra awhad
जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

वकील कोर्टात काय म्हणाले?
 जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे गजानन चव्हाण यांनी युक्तीवाद केला.त्यांनी घटनेचा व्हीडिओ न्यायालयात दाखवला.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री ठाण्यात आले होते गर्दी झाली होती. धक्काबुक्की होऊ शकत होती मात्र अर्जदार आव्हाड हे तिथे गर्दीत काही चुकीचं होऊ नये असा प्रयत्न करत होते. त्या महिलेला ते बहीण मानतात. सख्खी बहीण नाही हे मान्य आहे पण ते बहीण मानतात याचा व्हीडिओ आहे. सीएमचा ताफा जात आहे त्यांना मार्ग करून देण्यासाठी आव्हाडांनी त्या महिलेला हात धरून बाजूला केलं. त्यानंतर आणखी दोन जणांना बाजूला केला.
 
"विनयभंगाच्या केसमध्ये हेतू, इंटेशन महत्त्वाचं मानलं जातं. इतर अशा केसेसचे संदर्भ वकिलांकडून दिले जात आहेत. जिथे केवळ स्पर्श करणे म्हणजे विनयभंग असं सिद्ध झालेलं नाही. मी तिला बहिणीसमान वागणूक दिली आहे. तीन वर्षांपासून आमची ओळख आहे. कोर्टाने दिलेल्या अटी शर्थी मी मान्य करेन. चौकशी करण्यासाठी तपासासाठी मी तयार आहे त्यासाठी अटक करण्याची काय आवश्यकता आहे?”
 
 यावर तक्रारदार महिलेच्या वकिलांनी म्हटले, “जर ते म्हणतायत की महिला ओळखीची आहे तर तिला आदराने तिला बाजूला करायला हवं होतं.” 
 
न्यायालयात माहिती देताना तपास अधिकारी म्हणाले, प्रकरण संवेदनशील आहे. तसंच आरोपी हे राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. ते तपासात अडथळा निर्माण करू शकतात दबाव टाकू शकतात. त्यांना जामीन देताना ज्या अटी शर्थी घातल्या होत्या त्याचे पालन ते करत नाहीत. 
 
आतापर्यंत काय झालं?
‘मला कोणतेही गुन्हे मान्य झाले असते. पण 354 हा गुन्हा मला अमान्य आहे. कारण हे मी कधी माझ्या आयुष्यात केलेलं नाही,’ असं वक्तव्यं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
 
राजकारणात विरोध करावा पण असं नाही. समाजात माझी मान खाली जाईल असं करायचं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
 
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, “मी आज नाही लढत २००३ पासून मी लढतोय जेव्हा जेम्स लेन आला. या गुन्ह्याचं मला काही बोलायचं नाही. पण 354??
 
माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणी म्हणतात Your dad has molested somebody. हे राजकारण मी कधीही पाहिलं नाही. असं असेल तर मला यात रहायचं नाही.”
 
इतक्या खालच्या पातळीचं राजकारण व्हयला नको. घरं उद्धवस्त होतील, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
 
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाडांसोबत पत्रकार परिषद घेतली.
 
या पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, जितेंद्र आव्हाडांची समजूत घालण्यासाठी सांगलीहून आलो. प्रवासादरम्यान आव्हाड यांच्यासंदर्भातील काही व्हीडिओ पाहिले. इथे आल्यावर आणखी काही माहिती मिळाली.
 
ज्या भगिनींनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, ती क्लिप आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे. आव्हाडांनी कार्यक्रमादरम्यान त्या भगिनींचा उल्लेख बहीण असा केला होता. त्याची क्लिप उपलब्ध आहे. महिलांबाबत आव्हाड यांची काय भूमिका आहे हे तुमच्या लक्षात येईल, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
 
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना ही कारवाई राजकीय सूडापोटी केलेली नाही, असं म्हटलंय. तसंच सरकार कायद्याने चालतं. कोणीही कायदा हातात घेऊ नये, ते खपवून घेतलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.आव्हाडांच्या राजीनाम्याविषयी विचारलं असता मात्र त्यांनी राजीनामा दिला की नाही मला माहीत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.  

अंतिम निर्णय शरद पवार घेतील – अजित पवार
अजित पवार यांनी या संपूर्ण घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हा यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली.
 
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचंसुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
 
तक्रारदार महिला गुन्हा नोंदवण्यापूर्वी कोणाकोणाला भेटली याची पारदर्शक चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
 
“यामागे एक षडयंत्र आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ते राज्यघटनेला धरून नाही. मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. या घटनेचा सूत्रधार कोण आहे हे शोधलं पाहिजे,” असं अजित पवार यांनी म्हटलंय.
 
“महाराष्ट्रात भगिनीवर अत्याचार व्हायला नको, पण नियमाचा आधार घेत असाही गुन्हा दाखल करू नये. चुकलेलं असेल तर जरूर कारवाई करा. पण तुम्ही अशी प्रतिमा खराब करण्यासाठी काही करत असाल तर ते लोकशाहीला घातक आहे,” असं ते पुढे म्हणाले.
 
गृह मंत्रालय साडे सतरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. त्यावेळी असा अन्याय आम्ही कुणावर केला नाही, असा दावा यावेळी अजित पवार यांनी केलाय. आव्हाड यांना जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होतो आहे. शेवटी आम्ही माणसं आहोत. 72 तासांत दोन गुन्हे दाखल केले. माणूस खचतो. पण, शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असं आव्हाड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 
जयंत पाटील काय म्हणाले?
"एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यास, स्त्री किंवा पुरुषास लज्जा उत्पन्न होईल, मन दुखावेल अशी कृती करणे, खासगीपणाचे उल्लंघन होईल असे वर्तन करणे विनयभंग अंतर्गत होऊ शकते. आव्हाड गर्दीतून वाट काढत असताना गर्दीतून का येताय असं म्हणत होते. तरीही 354 कलम लावलं आहे."
 
जयंत पाटील यांनी पुढे म्हटलं की, अनेक ठिकाणी गर्दी होत असते. यासाठी 354 कलम लावलं याचं आश्चर्य वाटतं.राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. त्यांनी याची दखल घेतली की नाही माहिती नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर झालेला प्रकार आहे. कशाला, साईडला या हा प्रकार विनयभंगात येतो असं मला वाटत नाही.
 
एखाद्याला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार करत असू तर तो कायद्याचा गैरवापर आहे. ‘हर हर महादेव’ या सिनेमातील दृश्यांबाबत जे आक्षेप घेतले त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चुकीचं चित्रिकरण दाखवल्यावर आक्षेप घेतला यात मराठी माणसाचं काय चुकलं? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
 
या प्रकरणातही चुकीची कलमं लावली. राग मानून आता ही दुसरी कृती केलेली आहे.त्या भगिनीने नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर महिलेने गुन्हा दाखल केला. हा प्रकार निषेधार्थ  आहे. पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आम्ही या कृतीचा निषेध करतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
 
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा मतदारसंघ असलेल्या मुंब्रामध्ये गदारोळ उडाला आहे. काल (रविवारी रात्री ) त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे.
 
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा अर्थात आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यांनीच तशी माहिती ट्विटरवरून दिलीय.
 
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354 चे. मी या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत."
 
भारतीय दंड विधान 354 म्हणजे महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणे.
 
रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत असतानाच तक्रारदार रिदा रशीद या त्यांच्या वाटेत आल्या. त्यावेळी आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला लोटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे गाडीमध्ये बसलेले असतानाच त्यांच्या समोरच हा सारा प्रकार घडल्याचं व्हिडीओतून दिसत आहे.
तक्रारदार रशीद या भाजप नेत्या आहेत.
आव्हाडांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर मुंब्रा येथे आव्हाड यांचे कार्यकर्ते आंदोलनाला बसले आहेत. गेल्या 72 तासांमध्ये माझ्यावर दोन खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. ही लोकशाहीची हत्या मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असे आव्हाडांनी म्हटले आहे. त्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत-आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की जितेंद्र आव्हाडांना आम्ही राजीनामा देऊ देणार नाही. "ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत," असे ट्वीट ऋता यांनी केले आहे.

"अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील," असे ऋता यांनी म्हटले.
 
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मला सर्वांसमोर अपमानित केले. माझा हात पकडून त्यांनी धक्का दिला आणि म्हणाले तू इथं काय करतीयेस. महिलेचा सर्वांसमक्ष अपमान झाल्याबद्दल पोलिसांनी आव्हाडांवर कारवाई करावी असे रशीद यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांतर्फे आव्हाडांवर गुन्हा नोंदवला आहे त्याचा निषेध करण्यात आला आहे.
 
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाडविरोधातील कारवाईचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या आव्हाडांवरील कारवाई ही सुडबुद्धीतूनच होत आहे.
 
तक्रारदार महिला काय म्हणाली?
तक्रारदार रिदा रशीद यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आव्हाडांनी आपल्याला दोन्ही हातांनी पकडून ढकलले असं म्हटले आहे. त्यांनी मला गर्दीत ढकलले असं त्या म्हणाल्या.
 
सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की केवळ धक्काच लागला आहे. त्यावर तुमचं मत काय असं पत्रकारांनी विचारलं असता रशीद म्हणाल्या की एका महिलेला ढकलेलं असताना तुम्ही हे कसं म्हणू शकता. मी त्यांना विचारेल की ही तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का? महिलांना ढकलण्याची.
 
याआधी काय घडलं?
हर हर महादेव चित्रपटाला विरोध केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती.
 
या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित ‘हर हर महादेव' या चित्रपटावर आता विविध संघटनांकडून आक्षेप घेतला जात होता.
 
याच घटनाक्रमादरम्यान ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.
 
नंतर या प्रकरणावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उमटल्या. शिवाय संभाजीराजे छत्रपती यांनीही या चित्रपटाला एक पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शवला होता.
 
याच प्रकरणात पोलिसांकडून जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. आपल्याला अटक झाल्याची माहिती आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली होती.
 
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो."
 
त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं.  “मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.

“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,” अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे.
 
आव्हाड यांच्या अटकेनंतर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सरू केली आहे.
 
तर आम्ही छत्रपतींचा आपमान सहन करणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.
 
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीतरी चुकीचं जर दाखवलं जात असेल आणि एखादी व्यक्ती जर त्याच्या विरोधात त्यांच्या वेदना मांडत असेल आणि त्यासाठी त्यांना अटक होत असेल तर मी मनापासून त्या अटकेचं स्वागत करते. त्यासाठी आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.  
 
आव्हाडांना अटक त्यांच्या वैचारिक मतभेदांमुळे नाही तर थिएटरमध्ये लोकांना शिविगाळ आणि मारपिट केल्यामुळे झाल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
Published by -Priya Dixit