बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

येत्या 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

गेले अनेक आठवडे मुंबईकरांना हुलकावणी देणाऱ्या पावसानं अखेर आज शहरात हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सकाळपासून पावसानं संततधार धरल्यामुळं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. येत्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
 
सकाळी हार्बर, पश्चिम आणि मध्य अशा तिन्ही रेल्वे सेवांवर पावसाचा परिणाम होऊन वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिराने होत होती. तसेच जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
 
सकाळी कुर्ला, सांताक्रूज, कुलाबा, बोरिवली, कांदिवली, बदलापूर, पनवेल, शहापूर, नवी मुंबई सर्वत्र पावसाचा जोर दिसून आला. पावसामुळे सायन, हिंदमाता सिनेमा येथे पाणी तुंबले त्यानंतर येथील वाहतूकही वळवण्यात आली आहे.
 
दरवर्षीप्रमाणे यंदा मुंबईमध्ये पाऊस येण्यास उशीर झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवणाऱ्या तलावक्षेत्रांमध्ये पाऊस न झाल्याने या तलावांवधील, धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. पाऊस असाच लांबल्यास मुंबई-ठाण्यावर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता होती. मात्र आता ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे.
 
आज झालेल्या या पावसाबद्दल बोलताना भारतीय हवामान विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, "वायू चक्रीवादळामुळे मान्सून दाखल व्हायला उशीर झाला आहे. जून संपत आला तरी मान्सून दाखल न होण्याची ही गेल्या अनेक वर्षातील ही एक दुर्मिळ घटना आहे. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल."
 
स्कायमेटचे हवामानतज्ज्ञ महेश पालावत यांनी आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडेल आणि उद्या व 30 जूनपर्यंतही स्थिती कायम राहील त्यानंतर दोन दिवसांनी मराठवाडा-विदर्भात पाऊस पडेल अश स्थिती स्पष्ट करून सांगितली.
 
अंधेरीत सकाळी साडेअकरापर्यंत 81 मिमी पाऊस
सकाळी साडेअकरापर्यंत बोरिवली येथे 54 मिमी, पवई येथे 68 मिमी, अंधेरीमध्ये 81 मिमी, सांताक्रुजमध्ये 62 मिमी, बीकेसीमध्ये 35 मिमी, मरिनलाइन्स येथे 83 मिमी, विक्रोळीमध्ये 53 मिमी पाऊस पडला. हा पाऊस अजूनही सुरू असल्यामुळे त्यात वाढ होईल अशी माहिती पालावत यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.