मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज ठाकरे यांची बिनशर्त माफी; बिहार-उत्तरप्रदेशातील लोकांसंदर्भातील वक्तव्यावरुन कारवाई

raj thackeray
बिहार, उत्तर प्रदेश आणि हिंदीभाषिकांसंदर्भात कथित अपमानजनक वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त माफी मागितली आहे.
 
न्यायालयाने त्यांचा माफीनामा स्वीकारला आहे. गेली 16 वर्ष हे प्रकरण न्यायालयात होतं. जमशेदपूरचे सुधीर कुमार पप्पू यांनी 2007 मध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात सोनारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
 
पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी 13 मार्च 2007 रोजी जमशेदपूरचे मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
 
सीजेएम यांनी ही तक्रार तत्कालीन प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी डी.सी.अवस्थी यांच्या न्यायालयाकडे सुनावणीसाठी पाठवलं.
 
न्यायालयाने या प्रकरणाची माहिती घेत राज ठाकरे यांना समन्स बजावलं.
 
राज ठाकरे यांनी समन्सविरोधात झारखंड उच्च न्यायालयात दाद मागितली पण त्यांना दिलासा मिळू शकला नाही. सप्टेंबर 2011 मध्ये राज ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागितली.
 
दिल्ली उच्च न्यायालयाने हे प्रकरण तीस हजारी न्यायालयाकडे वर्ग केलं. डिसेंबर 2012 मध्ये तीस हजारी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. त्यांनी मुंबई पोलीस कमिशनरला पत्र लिहून राज ठाकरे यांच्या अटकेचे आदेश दिले.
 
हे प्रकरण तेव्हापासून प्रलंबित होतं.
 
राज ठाकरे यांनी वकील अनुपम लाल दास यांच्या माध्यमातून न्यायालयाकडे माफीनामा सादर केला. न्यायालयाने तो स्वीकारून हे प्रकरण निकाली काढलं.
 
सुधीर कुमार पप्पू यांनी आरोप केला होती की 9 मार्च 2007 रोजी मुंबईस्थित षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बिहार, उत्तर प्रदेश आणि हिंदीभाषिक लोकांविरुद्ध आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केली होती.
 
राज ठाकरे पक्षस्थापनेच्या दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
 
'स्पष्टीकरण द्यायला आलेलो नाही'
 
उत्तर भारतीयांच्या महापंचायत कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण केलं. मी कोणतही स्पष्टीकरण देण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पण त्यांनी त्यांच्या भाषणात त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिलं.
 
"आपल्या माणसांना क्लॅरिफिकेशन लागत नाही आणि जी आपली माणसं नसतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत," राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच या वाक्यानं केली.
 
त्यांची भूमिका स्पष्ट करत असल्याचं सांगताना ठाकरे यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भाषणांचा, वक्तव्यांचा, कायद्यांचा आणि घटनांचा आधार घेतला.
 
राज ठाकरे यांनी दिलेली ९ स्पष्टीकरणं अशी :
 1.      उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला आलो आहे कारण याआधी गुजराती आणि मारवाडी मंडळींनी त्यांच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं, आता दुबेंनी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं म्हणून आलो.
 
2.       माझ्या गोष्टी तुम्हाला हिंदीमध्ये समजावून सांगायच्या आहेत म्हणून इथे आलो आणि म्हणून हिंदीत बोलत आहे, असं सांगून हिंदीत भाषण का करत आहे याचे स्पष्टीकरण दिले.
 
3.       Interstate Migration Act कुणी वाचलाच नाही, त्याचा अर्थ सांगून मनसेचा उत्तर भारतीयांना विरोध आहे,याचे स्पष्टीकरण दिले.  
 
4.       माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची वाक्य आणि भाषणांचे संदर्भ देऊन संघर्ष का होत आहे याचं स्पष्टीकरण दिलं.
 
5.       दिल्लीतील मीडिया इतर राज्यांमध्ये बिहारी आणि यूपीतील लोकांबाबत काय घडतं ते दाखवत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी गोव्याचे माजी मंत्री रवी नाईक यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. गुजरातमध्ये बिहारींबाबात काय घडलं हे सांगत ते कसं दाबलं गेल्याचा दावा केला आणि मनसेलाच कसं दिल्लीतला मीडिया व्हिलन करत आहे याचे स्पष्टीकरण दिले.
 
6.       रेल्वे भरतीची जाहिरात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये देण्यात आली. प्रत्यक्षात नोकरीची संधी महाराष्ट्रात होती. इथल्या लोकांना संधी मिळाली नाही, आलेल्या परिक्षार्थींना जाब विचारल्यावर त्यांनी अयोग्य शब्द वापरले म्हणून त्यांना चोप द्यावा लागला, असं कल्याणमध्ये घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण दिलं.
 
7.       मराठी लोक युपी बिहारमध्ये जाऊन चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांची आरती कराल का, असा सवाल करत स्वतःची भूमिका कशी योग्य आहे, हे त्यांनी सांगितलं.
 
8.       भूमिपुत्रांचा लढा किती जुना आणि कसा जगभर पसरला आहे हे सांगण्यासाठी तक्षशीला, नालंदा, ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांमध्ये काय घडलं याचं उदाहरण दिलं.
 
9.       मराठी माणसं भाजीपाला विकणे किंवा वॉचमनसारखी कमी पगाराची कामं करतात, मी दाखवतो चला तुम्हाला माझ्याबरोबर, असं सांगत त्यांनी उत्तर भारतीयांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
 
राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य
भैया केक कापून वाढदिवस
राज यांनी 14 जून 2008 रोजी म्हणजेच आपल्या वाढदिवशी 'भैया' असे शब्द लिहिलेला केक कापला होता.
 
'छटची नौटंकी सहन करणार नाही'
2009 मध्ये राज यांनी छटपूजेसंदर्भात भाष्य केलं होतं. छट पूजेच्या नावावर राजकीय नौटंकी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असं ते म्हणाले होते. छटपूजेला विरोध नसल्याचं त्यांनी नमूद केलं होतं.
 
'तर त्यांचे हात कलम करा'
परप्रांतातल्या लोकांनी आयाबहिणींवर हात टाकले तर तुम्ही तिथल्या तिथे त्यांचे हात कलम केले पाहिजेत, असं ते राज ठाकरे म्हणाले होते. आदेशाची वाट पाहू नका. पोलिसांना सांगणं की आमच्या पोरांकडे दुर्लक्ष करा. बाहेरून येणार आणि आमच्याकडे माज दाखवणार. कर्नाटकात, केरळमध्ये, आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये असा माज दाखवू शकत नाहीत. कारण इथलं सरकार लेचंपेचं आहे.
 
'सत्तेत आलो तर फक्त मराठी तरुणांना नोकऱ्या'
2014 मध्ये राज ठाकरे यांनी परप्रांतियाबद्दलचा राग आळवला होता. खाजगी सुरक्षा कंपन्या मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या लोकांना नोकऱ्या देतात. मी सत्तेत आलो तर या एजन्सींना बंद करून राज्य सरकारद्वारे सुरक्षा एजन्सी सुरू करेन. ज्यात फक्त महाराष्ट्राच्या तरुणांना नोकऱ्या देण्यात येतील.
 
पोषक वातावरण म्हणून परप्रांतीय येतात
महाराष्ट्रातील सुसंस्कृत मराठी माणसाने महाराष्ट्रात पोषक वातावरण तयार केलं. त्यामुळेच गुजराती आणि मारवाडी लोक इथे येऊन उद्योगधंदा, व्यवसाय करू शकले. यांनी त्यांच्या राज्यात उद्योगधंदे उभारले नाहीत असं राज ठाकरे म्हणाले होते.
 
मराठी माणूस मागे आहे हा भ्रम डोक्यातून काढून टाका. सर्वच मारवाडी, गुजराती माणसांनी दुकाने थाटलेली नाहीत. महाराष्ट्रातही मोठे उद्योजक आहेत. मराठी लोकांनी आणि महाराष्ट्राने पोषक वातावरण तयार केले म्हणून मारवाडमधील लोक व्यवसायासाठी महाराष्ट्रात आले, असं ते म्हणाले होते.
 
'परप्रांतीय मार खाऊनच सुधारतात'
मी ठराविक प्रदेशातील माणसांच्या विरोधात नाही. मात्र महाराष्ट्रात मराठी माणसाला प्राधान्य मिळायला हवं. बाहेरची माणसं 2000 किलोमीटरहून येऊन इथे दादागिरी करत आहेत. हे चालणार नाही. परप्रांतीय माणसं मार खाऊनच सुधारतात. ही माणसं बेपवाईने टॅक्सी-रिक्षा चालवतात. ही माणसं भाज्याही विकतात. मराठी युवकांनी यांच्याकडून भाज्या विकत घेणं थांबवावं.
 
'आम्हाला उत्तर मिळालीच नाहीत'
राज ठाकरे यांना थेट प्रश्न न विचारता आल्याबद्दल उपस्थित उत्तर भारतीयांनी नाराजी व्यक्त केली.
 
संदीप विश्वकर्मा म्हणाले, " नेहमी उत्तर भारतीयांना का टार्गेट केलं जातं, याचं उत्तर मिळालं नाही, कारण मुंबईत विविध प्रांतातील लोक येत असतात."
 
अजय त्रिवेदी यांनीही त्यांची नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मात्र आम्हाला ती उत्तर मिळाली नाहीत. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे आम्हालाही पटतात. पण आमची प्रश्न मनातच राहिली. भविष्यात संधी मिळाली तर नक्कीच आमच्या मनातील प्रश्न त्यांना विचारू."
 
प्रवीण कुमार सिंग म्हणाले, "उत्तर भारतात उद्योग वाढावेत, असं आम्हालाही वाटतं. मात्र जे इथे राहातात त्यांच्याबद्दल काहीच बोलले नाहीत."
 
तर गेली 30 वर्षं मुंबईत राहाणारे नीलेश राठोड यांनी हा कार्यक्रम फिक्स केलेला होता, अशी टीका केली. ते म्हणाले, "या कार्यक्रमात सामान्यांच्या प्रश्नांचा समावेश नव्हता. त्यांनी कोणालाच प्रश्न विचारू दिले नाहीत उलट आमच्या मनात प्रश्न निर्माण केले. निवडणुकीच्या तोंडावर टायमिंग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असं दिसतंय. 2009ला त्यांनी जे भाषण केलं होतं तेच आज हिंदीत केलं इतकाच फरक वाटतो," असं ते म्हणाले.
 
या कार्यक्रमाचे संयोजक, उत्तर भारतीय महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय दुबे म्हणाले, "राज ठाकरे यांना आम्ही 18 प्रश्न लिहून दिले होते.त्यांची त्यांनी उत्तरं दिली. थेट बोलण्याची परवानगी दिली तर अनाहूतपणे काही चुकीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही हे टाळलं."