गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 ऑक्टोबर 2016 (09:47 IST)

नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न - संग्राम कोते पाटील

नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादू पाहत आहे, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत केला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे निव्वळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करतात, कृती मात्र शून्यच असते, अशी टीका कोते पाटील यांनी यावेळी केली. 
 
नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून धर्मशिक्षण, कुलगुरुंना अमर्याद अधिकार देणे, असे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासंदर्भात चर्चेचा केवळ फार्स केला गेला. परंतु ठराविक विचारसरणी लादण्याचा प्रयत्न सुरूच असल्याचे कोते पाटील यांनी सांगितले. 
 
ऑनलाइन प्रवेश, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, विद्यापीठ उपकेंद्र सुरू करणे, स्पर्धा परिक्षांसाठी भरती प्रक्रियेला विलंब याबाबतीत राज्य सरकार केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करीत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी नाराज आहेत. मराठा मोर्चाचा रेटा पाहून काही अटींवर 'ईबीसी' सवलतींचा निर्णय घेतला. परंतु, त्याचे श्रेय सरकारने घेण्याचा प्रयत्न करू नये, ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही केली होती, असे कोते पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे उपस्थित होते.