शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2023 (20:46 IST)

सातारा : ‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde
शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता. पाटण) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात  येईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते. अनेकजण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. या योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ देण्यात येत आहे.
 
‘लेक लाडकी’ सारखी योजना प्रथमच सुरू करण्यात आली असून. महिलांना एसटी बस प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या असल्याने त्यांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचल्यास जनतेच्या समस्या कळू शकतात. ही योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावात यावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
 
श्री.शिंदे म्हणाले,शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत. अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करताना मंत्रिमंडळ बैठकीत ३०० पेक्षा अधिक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. अल्पावधीत २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.  शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
‘नमो शेतकरी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. सामान्य माणसालाही मुख्यमंत्र्याला भेटावेसे वाटते हा विश्वास शासनाविषयी निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यासाठी २ हजार ४५ कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी शासनाने दिला आहे. डोंगरी विकासाच्या २०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor