गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लोकशाहीत यश व अपयश येत असते: शरद पवार

महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.
 
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना पराभव. लोकशाहीत यश अपयश हे येत असते असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात नेतृत्व कमी पडल्याचे मान्य करून ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अपयश आले. अतिशय चांगली कामे करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश प्राप्त करता आले नाही. त्यामुळे आम्हाला आणखी काही सुधारणा करता येईल का, यावर आम्ही लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मतांच्या गणितात भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अगदी थोड्या फरकाने मागे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही असे यश मिळणे म्हणजे लोकांचा आमच्यावरचा विश्वास आहे असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पैशांच्या जोरावर निवडणूक न लढवता कामांच्या जोरावर निवडणूक लढवली आहे. सत्ताधारी पक्षाने मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि साधन सामग्रीचा उपयोग केला. सत्ताधाऱ्यांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्तेचा उपयोग करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे यश मिळालं. या विजयाचे श्रेय त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले. पराभव आल्याने खचून जायचे नाही, पुन्हा जिद्दीने उठायचे असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याकडे भर द्यावे असं त्यांनी सुचवले.