सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (17:33 IST)

अभिनेते किरण मानेंनी बांधलं 'शिवबंधन', उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

kirna mane
facebook
मराठी अभिनेते किरण माने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. मुंबईत 'मातोश्री' निवासस्थानी हा प्रक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
यानंतर किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित या पक्षप्रवेशाचा फोटो शेअर केला.
 
तसंच, या पोस्टमध्ये किरण माने म्हणाले आहेत की, "शिवबंधन आधीपासून मनाशी बांधलेलंच होतं घट्ट. आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं. तेही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्‍या पिढीतल्या शिलेदारानं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र."
 
पक्ष प्रवेशापूर्वी किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बातचित केल्याचा फोटोही समोर आला आहे. दोघे एकत्र बसून चर्चा करत असल्याचं हा फोटो सांगतो.
 
यापूर्वी 'मुलगी झाली हो' या मालिकेतील वादामुळे किरण माने चर्चेत आले होते. मात्र, त्यापलिकडे त्यांची अभिनेता म्हणून ओळख महाराष्ट्राला आहे. सोशल मीडियावरून ते वैचारिक लेखन करत असतात. आजवर विविध पुरस्कारांचे मानकरीही ते ठरले आहेत.
 
किरण माने हे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेमध्ये विलास पाटील या भूमिका साकारत असताना, त्यांना या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आलं होतं. त्यांना मालिकेतून अशाप्रकारे काढून टाकण्यात आल्यानं महाराष्ट्रातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
 
ते प्रकरण काय होतं, हे बीबीसी मराठीनं त्यावेळी वाचकांना सविस्तरपणे सांगितलं होतं. ते इथे पुन्हा देत आहोत.
 
1) मालिकेतून काढल्यावर किरण माने म्हणाले होते?
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असलेल्या राजकीय भूमिकेमुळे आपल्याला लक्ष्य करून या मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असा आरोप किरण माने यांनी केला होता.
 
किरण माने यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अशा दबावापुढे कधीही झुकणार नाही. यापुढेही भूमिका मांडत राहणार असं किरण माने यांनी म्हटलं.
 
2) निर्मात्यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
 
पण, किरण मानेंना राजकीय भूमिकेमुळं नव्हे तर इतर कारणांमुळं काढण्यात आलं आणि त्याची त्यांना कल्पनाही होती, असा दावा निर्मात्या सुझाना घई यांनी केला आहे.
 
किरण माने यांना अनेकवेळा सूचना केल्या होत्या. पण तरीही समाधान न झाल्याने त्यांना काढण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं निर्मात्यांनी म्हटलं.
 
) बोलण्याची संधी दिली नसल्याचा मानेंचा दावा
 
यानंतर बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत किरण माने यांनी आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणाले, "मला मालिकेतून काढण्यामागे राजकीय कारण नाही हे सांगायला इतका वेळ का लागला? सिरिअलमध्ये माझी भूमिका महत्त्वाची आहे. तू उद्यापासून नाही असं सांगण्याइतका मी नगण्य नाही. मला बोलण्याची संधी दिली नाही. माझं ऐकून घेण्यात आलं नाही."
 
4) किरण मानेंवर या सहकलाकारांची नाराजी
 
मालिकेत किरण माने यांच्या पत्नीच्या भूमिकेत असलेल्या शर्वाणी पिल्लई यांनी त्यांना राजकीय भूमिकेमुळं नव्हे तर त्यांच्या वर्तनामुळंच काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं.
 
ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही किरण मानेंची सेटवरची वागणूक योग्य नसल्यानं त्यांना काढल्याचं म्हटलं आहे. किरण माने कायम स्वतःबद्दल बोलायचे, असा आरोपही त्यांनी केलाय. इतरही सहकलाकारांनी त्यांच्या विरोधातच बाजू मांडली आहे. किरण माने यांनी अनेकदा मालिकेतून काढून टाकेन अशाप्रकारे धमकावल्याचंही सहकलाकारांनी सांगितलं.
 
5) सहकालाकरांच्या मतांवर किरण माने काय म्हणाले?
 
किरण मानेंनी कलाकारांना विरोधात बोलायची सक्ती केल्याचा आरोप केला. 'अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे.
 
करू द्या आरोप, जाऊ द्या झाडून, ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्रॉडक्शन हाऊसविरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल, असं मानेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.
 
6) किरण मानेंच्या या काल्पनिक पोस्टचा अर्थ काय?
 
महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाहीये. पण त्यांनी फेसबुकवर एक काल्पनिक पोस्ट लिहिली.
 
त्यात त्यांनी म्हटलं की अपशब्द वापरत होता तर त्याला त्याचवेळी थोबाडला का नाही त्याचवेळी? पोलीस कम्प्लेन्ट का नाही केली? या महिलांसाठी त्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षभर स्टॅंड का घेत नव्हत्या?
 
7) काही सहकलाकारांचा किरण मानेंना पाठिंबा
 
मुलगी झाली हो मालिकेतील काही सहकलाकारांनी किरण माने यांना पाठिंबा दिला. अभिनेत्री श्वेता आंबीकर, प्राजक्ता केळकर व शीतल गीते यांनी किरण मानेंचं सेटवरचं वर्तन आक्षेपार्ह नसल्याचं म्हटलं होतं.
 
किरण माने हे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. ते आमच्याशी खूप चांगलं वागतात, को-आर्टिस्ट म्हणूनही खूप उत्तम आहेत. या दीड वर्षांत मी कधीही त्यांना शिवी देताना, अपशब्द वापरताना पाहिलं नाहीये, असं श्वेता आंबीकर हिने म्हटलं. मराठी अभिनेत्री अनिता दाते यांनीही किरण मानेंना पाठिंबा दिला.
 
8) राजकीय वळण
 
किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्याच्या प्रकरणानं राजकीय वळण घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत किरण मानेंच्या पाठिशी असल्याचं सांगितलं.
 
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वीट केलं. तर धनंजय मुंडे यांनी तर हा प्रकार म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं म्हटलं आहे.
9) चित्रा वाघ यांनी केले किरण मानेंवर आरोप
 
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी किरण मानेंना शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणत त्यांच्यावर महिला सहकलाकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
 
चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रॉडक्शन हाउसनं हाकलून दिलयं. मग मानेनं नवं नाट्य उभं केलं.
 
महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टीका करणाऱ्यांना सत्ताधारी पाठिशी घालत आहेत. कोण आहेत मानेचे बोलवते धनी?
 
10) शरद पवारांची घेतली मानेंनी भेट
 
किरण माने यांनी रविवारी (16 जानेवारी) या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली. आपल्या विरोधात झालेल्या अन्यायाची बाजू पवारांकडे मांडल्याचं किरण माने म्हणाले.
 
शरद पवारांनी आपली बाजू ऐकून घेतली असून त्यांनी लगेचच याबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही, असंही माने यांनी सांगितलं.
 
शिवसेना आणि मनसेनं मात्र माने यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचं चित्र आहे.
 
Published By- Priya Dixit