शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:37 IST)

मराठी अनुवाद प्रकरण शिवसेनेची सरकारवर जहरी टीका

राज्यपाल यांचे अभिभाषण मराठी मध्ये अनुवादित न होता गुजराती भाषेत झाले त्यामुळे मोठा गोंधळ विधिमंडळात झाला होता. या चुकीमुळे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना माफी मागावी लागली होती. मराठी दिनाच्या आदल्या दिवशी हा प्रकार झाल्याने विरोधक चांगलेच चिडले होते. तर सभागृहाचे काम सुद्धा बंद करण्यात आले होते. या सर्व प्रकरणावर शिवसेना बोलणार नाही असे शक्य नाही. दैनिक सामना मधून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यकारभार किती ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरू आहे त्याचाच हा उत्तम नमुना. असे शिवसेनेन टीका करतांना म्हटले आहे.
शिवसेनेचे संपादकीय पुढील प्रमाणे

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायरीवर आज मराठी भाषा अडखळली. मराठी अनुवादकास सुरक्षारक्षकांनी पायरीवर अडवल्याने राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद झाला नाही व राज्यपालांचे इंग्रजी भाषण अनेकांच्या डोक्यावरून गेले. या चुकीला माफी नाही, पण तरीही मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. निदान ‘मराठी’ अस्मितेच्या बाबतीत तरी मुख्यमंत्र्यांवर असे प्रसंग येऊ नयेत. राज्यकारभार किती ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरू आहे त्याचाच हा उत्तम नमुना. 
राज्याचे काय होणार?
महाराष्ट्रात सध्या जो तमाशा सुरू आहे तो पाहून संयुक्त महाराष्ट्राचे १०५ हुतात्मेही स्वर्गात अस्वस्थ झाले असतील. रोजच आमच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे धिंडवडे निघत आहेत व विद्यमान सत्ताधारी त्यावर रंगसफेदी करीत आहेत. नगरचे उपमहापौर छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अपशब्द वापरतात. त्यानंतर गदारोळ होतो व उपमहापौर छिंदम यांची हकालपट्टी होते. आता तर छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना दयामाया नाही. छिंदम प्रकरणात जशी लपवाछपवी आणि बनवाबनवी झाली तशीच एक बनवाबनवी मराठी भाषेच्या संदर्भात सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरू झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे भाषण इंग्रजीत सुरू होताच त्याचा मराठी अनुवाद ऐकण्यासाठी आमदारांनी टेबलावरचे ‘इअर फोन’ कानास लावले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवादच ऐकू येत नव्हता. ऐकू येईल तरी कसा? कारण त्यासाठी नेमलेला अनुवादक जागेवर पोहोचलेलाच नव्हता. त्यासाठी जे कोणी जबाबदार असतील ते असतील, पण मराठी राज्यातच राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न होण्याचा लाजिरवाणा प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला. अर्थात हा अनुवाद गुजरातीत सुरू होता असा जो आरोप केला जातोय तो खरा नाही. मात्र मराठी अनुवादक पोहोचले नाहीत, आमदारांची गैरसोय झाली आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकेल असा प्रकार घडला हे सत्य आहे. संपूर्ण राज्याचे इंग्रजीकरण झाले व ‘मराठी’त अनुवाद झाला नाही तरी कोण विचारतेय, या एका बेफिकिरीतून हा प्रकार घडला आहे. मराठी राजभाषेची ही अवहेलना आहे व झाल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली आहे. दोषींवर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले. पण मराठी भाषा व महाराष्ट्र अस्मितेच्या बाबतीतच असे ‘दोष’का निर्माण होतात?