1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (08:30 IST)

त्यामुळे सर्वच पक्षांवर मी नाराज आहे : गिरिश बापट

girish bapat
सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.खासदार गिरिश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
बापट म्हणाले की, राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांचे राहिले आहे. गोर गरीब लोकांची लहान-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान पहाणे महत्त्वाचे आहे. मात्र आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढ लागली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल तर पक्ष कसा उभा राहिले. मात्र आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालावी लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे. ही बाब माझ्यासारख्याला पटत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांवर मी नाराज आहे.