बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (07:55 IST)

काढणीसाठी आलेल्या द्राक्षावर चोरट्यांनी मारला डल्ला

कोकणगाव नाशिक : अस्मानी संकट, त्यातच चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अजूनच भर पडली आहे. कोकणगाव येथील प्रगतिशील शेतकरी केशवराव मोरे यांच्या  काढणीसाठी आलेल्या द्राक्षावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे घडली. या घटनेमुळे आता शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
 
याबाबत माहिती अशी की, कोकणगाव येथील प्रगतिशील शेतकरी केशवराव मोरे यांची जम्बो व्हरायटीची द्राक्षबाग आहे. सोमवारी रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी द्राक्षबागेत प्रवेश करीत १५ ते २० क्विंटल द्राक्ष तोडून नेले.
 
सकाळी द्राक्ष काढणीसाठी मजूर येणार होते. पण, त्याआधीच चोरट्यांनी हात साफ केला. चोरी गेलेल्या द्राक्षाची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे दीड लाख रुपये किंमत होती.
 
द्राक्षाची छाटणीपासून विक्रीपर्यंत लहान मुलासारखी जोपासना केली जाते. परंतु, मध्येच येणार्या संकटामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor