लालबागच्या राजाचे दर्शन घेत असताना मंडप परिसरात एक अप्रिय घटना
गणेश चर्तुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेत असताना मंडप परिसरात एक अप्रिय घटना घडली आहे. लालबागच्य राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेमध्ये आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या वादात पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे लालबागच्या राजाच्या दरबारात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळाले .
काही महिला दर्शन घेण्यासाठी अधिक काळ थांबायचा प्रयत्न करत होत्या. पण पोलिसांकडून गर्दी पाहता कोणालाच थांबू दिलं जात नाही आहे. या कारणावरुन दर्शनासाठी आलेली महिला आणि महिला सुरक्षारक्षकांमध्ये वाद झालेली आहे. यावेळी महिलेने सुरक्षारक्षक असलेल्या महिलेला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी या वादग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती पूर्ववत केली.