शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (15:10 IST)

उद्धव ठाकरे लोकांची दिशाभूल करत आहेत - श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (12 मे) सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचा निर्णय कसा त्यांच्या बाजूने आला आहे याचा उहापोह केला. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब, अनिल देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित होते.
 
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लवकारत लवकर निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. "माननीय पंतप्रधानाना विनंती करतो की, महाराष्ट्राची बदनामी तातडीने थाबवावी आणि लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
तसंच यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसंच डबल इंजिनमधलं पोकळ इंजिन आता बाजूला टाकलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.
 
राज्यपालांची भूमिका घृणास्पद आहे, असं म्हणत राज्यपालांच्या नियुक्तीसाठी एका यंत्रणेची मागणी ठाकरे यांनी केली आहे.
 
तर उद्धव ठाकरे यांनी लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
 
* गद्दारांच्या माध्यमातून शिवेसेना दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला आहे.
* पोपट मेला आहे हे जाहीर करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे.
* निकालपत्रात 'मी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्री करता आलं असतं' असं म्हटलंय याचाच अर्थ हे सरकार बेकायदेशीर आहे.
* शिंदे सरकारला मिळालेलं जीवदान तात्पुरतं आहे. महाराष्ट्राची अवहेलना थांबवा, सरकारनं राजीनामा द्यावा आणि जनतेवर फैसला सोपवूया.
* जर अध्यक्षांनी वेडावाकडा निकाल दिला तर आम्ही परत सर्वोच्च न्यायालयात जाऊ.
यावेळी शिवसेना नेते अनील परब यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला देत, त्यातील काही मुद्दे वाचून दाखवत काही दावे केले आहेत. ते खालील प्रमाणे
 
अनिल परब यांनी केलेले दावे
* अध्यक्षांकडे प्रकरण पाठवलं गेलं असलं तरी न्यायालयाने एक चौकट घालून दिलेली आहे. त्यावेळी सुनील प्रभू यांनी दोन वेळा व्हीप बजावला त्याचं उल्लंघन झालंय.
* शेड्यूल 10चा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या विरोधात अध्यक्षानी काम केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर ठरते.
* विधिमंडळात 40 लोकांनी पक्षाच्या विरोधात मत दिल्याचं रेकॉर्डवर आहे.
* गटनेता निवडण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांचा आहे, तो कोर्टानं मान्य केला आहे.
* राज्यपालांना सबळ पुरावे न देता अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नाही. तरीही त्यांनी बहुमत चाचणीला बोलवलं.
* फूट हा बचावाचा मुद्दा होऊ शकत नाही. विधिमंडळ पक्षाच्या बहुसंख्यावर पक्ष मिळणार नाही. शिंदेंना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही.
* अध्यक्षांनी वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, असं न्यायालयाने सांगितलं आहे.
* विधानसभा अध्यक्षसुद्धा अपात्र आमदारांच्या मतांवर अध्यक्ष झाले आहेत.
कोर्टाच्या निर्णयाची प्रत घेऊन आम्ही अध्यक्षांना पत्र देतोय की हे प्रकरण लवकरात लवकर घ्यावे, असंसुद्धा परब यांनी स्पष्ट केलं आहे.
 
उद्धव ठाकरे लोकांची दिशाभूल करत आहेत - श्रीकांत शिंदे
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टचा निकाल कसा त्यांच्या बाजूने आला आहे याचा उहापोह केला. उद्धव ठाकरे यांनी कोर्टाकडे केलेल्या 6 प्रार्थना कोर्टानं फेटाळून लावल्याचं शिंदे यांनी म्हटलंय.
 
प्रत्येकजण स्वत:च्या सोयीचे पार्ट सुप्रीम कोर्टाच्या निकालातून काढून सांगतायत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घाबरून राजीनामा दिला आणि आता मात्र नैतिकतेचा आधार घेतल्याचा आरोप श्रीकांत यांनी केला.
 
"मला परत मुख्यमंत्री करा असं ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाकडे म्हटलं होतं", असा दावासुद्धा शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचे दावे म्हणजे कोर्टाचा अवमान असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
 
सरकार वैध असल्यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केला आहे, असंसुद्धा त्यांनी म्हटलंय.
 
ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत हे मी जबाबदारीने सांगतो, असं यावेळी श्रीकांत यांनी यावेळी सांगितलं आहे.
 
शिंदे स्वप्नातसुद्धा राजीनामा देणार नाहीत - अजित पवार
 
एकनाथ शिंदे सरकार स्वप्नातसुद्धा राजीनामा देणार नाही, असं अजित पवार यांनी पुण्यात म्हटलं आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, त्यात व्हिपची नियुक्ती तसंच राज्यपालांवर ओढलेल्या ताशेऱ्यांवर विचारल्यानंतर अजित पवारांनी म्हटलं की, या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. पक्षांतरबंदी कायद्याला काही अर्थ राहणार आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होणार आहे.
 
पत्रकारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याबाबत प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, "अटलबिहारी वाजपेयी यांची उंची आणि आताच्या लोकांची उंची यात जमीन-आस्मानचा फरक आहे. ते अजिबात राजीनामा देणार नाहीत. हे कुणी मनातसुद्धा आणू नका. ते स्वप्नातसुद्धा राजीनामा देऊ शकत नाहीत मग प्रत्यक्षात कधी देणार?"
 
अजित पवार यांनी नाना पटोले यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे.
 
"नाना पटोलेंनी न सांगता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या जागी तातडीनं नव्या अध्यक्षांची निवड झाली असती तर तो विषय धसास लागला असता. जर त्याजागी आधीच अध्यक्ष असते तर त्यांनी या आमदारांवर लगेचच कारवाई केली असती," असं अजित पवार पुढे म्हणाले आहेत.
 
शिंदे सरकारचा अंत जवळ - राऊत
"16 आमदारांना जावं लागेल, फडणवीस-शिंदे सरकारचा अंत जवळ आला आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलंय. "यांना वेड लागलं आहे का हे पेढे वाटत आहेत," असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
 
"विधानसभा अध्यक्षांना 90 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा लागेल," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे आणि फडणवीस निर्लज्जपणाने आणि बेशरमपणे वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
 
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे आणि फडणवीसांच्या सर्व चूका दाखवून दिल्या आहेत, असं राऊत म्हणालेत. पण त्याचवेळी राऊत यांनी नाना पटोलेंच्या राजीनामान्याच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे.
 
कोर्टाचा निर्णय कन्फ्युजिंग - राज ठाकरे
कालचा कोर्टाचा निर्णय कन्फ्युजिंग आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
 
यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना रागाच्या स्वरात उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "मला तुम्ही त्यांचे प्रश्न विचारू नका, तो वेगळा पक्ष आहे, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका."
 
दरम्यान "कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहावं लागतं, आधीचे मुख्यमंत्री जपून राहीले नाहीत त्यामुळेच हे सगळं घडलं," अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी जाताजाता केली आहे.
 
अध्यक्ष कायद्यानुसार निर्णय देतील - फडणवीस
कोर्टाने सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ दिला आहे. त्यामुळे कुणी अध्यक्षांवर दबाव आणण्याच प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. अध्यक्ष कुणाच्या दबाला बळी पडणार नाहीत. ते स्वतः निष्णात वकील आहेत. त्यामुळे ते कायद्यानुसार योग्य वेळेत हा निर्णय करतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
तसंच उद्धव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार नाही, असा आरोप फडणवीस यांनी पुन्हा एकदा केला आहे.
 
यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्या आरोपांनासुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांची नैतिका काढायची म्हटलं तर इतिहासात जावं लागेल. ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Published By- Priya Dixit