Marathi Biodata Maker

अजित पवारांना शरद पवारांच्या आशीर्वादाची गरज का वाटतेय?

Updated: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (08:55 IST)
 
पावसाळी अधिवेशनाच्या आधी 16 जुलैला अजित पवार यांनी नवनिर्वाचित मंत्री आणि त्यांच्या गटातील काही आमदारांसोबत शरद पवार यांची वाय.बी. चव्हाण सेंटरच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो असं प्रफुल्ल पटेलांनी त्यावेळी स्पष्ट केलं. त्यावेळी ते म्हणाले, “पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती आम्ही शरद पवारांना केली. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं.”
 
लगेच दुसऱ्या दिवशी 17 जुलैला पुन्हा अजित पवार काही आमदारांसह वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. त्या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरींनी आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याची री ओढली. शरद पवारांनी तुम्हाला आशीर्वाद दिला का? या प्रश्नावर ते म्हणाले, “वडिलांकडे गेल्यावर ते आशीर्वाद देत नसतात का?”
 
12 अॉगस्ट ला पुण्यात उद्योगपती चोरडीया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. ही भेट लपूनछपून झाली असली तरी दोन्ही नेते एकमेकांना भेटले असल्याचं त्यांनी स्वीकारलं. उद्योगपती चोरडिया यांनी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं त्यानिमित्ताने आम्ही भेटलो. ही कौटुंबिक भेट असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पण जयंत पाटील यांच्या भावाला आलेल्या ईडी समन्सनंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट घडली. या भेटीदरम्यान अजित पवार, शरद पवार यांच्यासह जयंत पाटीलही उपस्थित होते.
 
शरद पवारांची सोबत अजित पवारांना गरजेची?
“शरद पवार हे महायुतीमध्ये सामिल झाले तरच अजित पवार यांना मुख्यमंत्री होता येईल अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली आहे. त्यामुळे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी अजित पवार वारंवार त्यांना भेटत आहेत.
 
“विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्तभेटीनंतर हे वक्तव्य केलं. अधिवेशन काळात शरद पवार यांच्या भेटीनंतरही विधिमंडळाच्या परिसरात ही चर्चा नेत्यांमध्ये होती. या चर्चेत किती तथ्य आहे ?
 
वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, “अनेक राजकीय नेत्यांशी बोलल्यानंतर या चर्चेत तथ्य आहे असं वाटतं. शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चेहरा आहेत. अजित पवार यांना मानणारा गट असला तरी तुलनेने कमी आहे. अजित पवार गट सत्तेत सामिल झाल्यानंतर एक सर्व्हे झाला होता. या सर्व्हेमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने 17% मतदार असल्याचं दिसून आलं. त्यापैकी 12.5% मतदार हे शरद पवार यांच्या बाजूने दिसून आले तर 5% मतदार हे अजित पवार गटासोबत असल्याचं दिसलं.
 
त्यामुळे भाजपला शरद पवार हे आपल्यासोबत हवे आहेत अशी माहिती आहे. यासाठी अजित पवार हे शरद पवार यांची सतत मनधरणी करताना दिसतायेत. अजित पवार गटातील महत्वाच्या नेत्यांच्या बालेकिल्यात सभा घेऊन शरद पवार भाजपसोबत ज्यायला तयार नाहीत हे दिसून येत आहे.”
 
बीड या धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्यात शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी ‘साहेब तुमचा पाठिंबा पाहीजे..! आणि कामाच्या माणसांना आशिर्वाद द्या…’ असे होर्डिंग्ज बीडमध्ये लावण्यात आले होते.
 
‘जे लोक साहेबांना कामाच्या माणसांना आशीर्वाद द्या म्हणतायेत. ते पवार साहेबांना घरी बसवायला निघाले होते अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. त्याचबरोबर जे गेले त्यांना साहेबांचा आशीर्वाद पाहीजे हे ऐकून समाधान वाटलं असं जयंत पाटील म्हणाले.
 
ज्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली त्याचा परिणाम मतांवर नकारात्मक होऊ नये याच्या प्रयत्नात भाजप आहे. अनेक नेते हे अजित पवार गटासोबत गेले असले तरी मतदार विभागला जाईल का? याबाबत अजूनही शंका आहे.
 
शिवसेना फोडल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या पक्षाचं महत्व कमी करण्यात भाजपला यश आलं असलं भावनिकदृष्ट्या ते मतदारांमध्ये रूजवणं अद्याप भाजपला शक्य झालं नाही. त्यासाठी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला महायुतीत हवी असावी का?
 
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, “एकनाथ शिंदे गट फोडल्यामुळे जी सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळली आहे, ती शरद पवारांना मिळू नये यासाठी अजित पवार त्यांना स्वतः सोबत घेण्याचा प्रयत्न करत असावेत किंवा शरद पवारांचा विरोध बोथट करून संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न या भेटींमधून किंवा माध्यामांमध्ये बोलून केला जात असावा.”
 
उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडताना तो त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेला पक्ष होता. ते हयात नसाताना त्यांच्या विचारांशी प्रतारणा केली असा प्रचार करत पक्ष फोडला. बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि फोटो हे दोन्ही पक्षांकडून वापरलं जातं. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला.
 
या वयात त्यांच्याकडून पक्ष हिरावून घेतलं हे शरद पवारांनी मतदारांमध्ये रुजवल्यास अजित पवार गटाला मोठा फटका बसी शकतो. त्याचबरोबर शरद पवार यांनी माझा फोटो वापरला तर कोर्टात जाणार असं सुनावलं आहे. शरद पवारांचं नाव न वापरता मतं मागितली तर त्याचा परिणाम विविध सर्व्हेमधून समोर येत आहे. कदाचित यासाठी भाजप नेतृत्वाला शरद पवारांसोबत पूर्ण राष्ट्रवादी महायुतीत गरजेची वाटत असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
 



Published By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments