Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री साईसच्चरित - उपोद्धात

Updated: बुधवार, 19 जुलै 2023 (12:56 IST)
 
वर लिहिलेल्या तिघांपैकीं म्हाळसापती बरचे दिवस हयात होते, आणि ते भाद्रपद शेक १८४४ त वारले. त्यांचा व महाराजांचा अति निकट संबंध होता. महाराजांचें बसणें मशिदींत असे व निजणें एक रात्र मशिदींत व एक रात्र चावडींत असे. महाराज मशिदींत निजत त्या रात्री म्हाळसापति उजाडेपर्यंत महारांजवळ बसूना असत, व मधूनमधून दोघांच्या अति प्रेमाच्या गोष्टी चालत. म्हाळसापतींचें देहावसान होईपर्यंत त्यांचा एक दिव्स आड मशिदींत रात्रभर बसण्याचा क्रम चालू असे. हे चांगले अधिकारी असून पूर्ण निरपेक्ष असत व यांचेपासून महाराजांचे भक्तांना बोध व आनंद नित्य मिळत असे; किंबहुना महाराजांच्या पश्चात्‌ त्यांच्या भक्तांना हें एक विश्रांतिस्थानच होतें.
 
महाराज येथें आल्यापासून प्राय: येथील मशिदींत वास करूं लागले. ती मशीद त्या वेळेला अगदीं पडक्या स्थितींत असे. महाराज दिवसा इकडे तिकडे जात, पण रात्रीं मशिदींतच राहात. कोणीं जेवावयास नेलें तर जात; लोकांस औषधपाणी सांगत व देत. त्यासाठीं कधींहि पैसा घेत नसत. इतकेंच नव्हे, पण रोग्यांची शुश्रूषा योग्य होत नसली तर स्वत: आपण जाऊन करीत व अशा तर्‍हेनें  महाराजांनीं ज्यांना औषधोपचार केला व ज्यांची शुश्रूषा केली अशी पुष्कळ मंडळी अजून येथें आहेत. पुढें औषधपाणी देण्याचें महाराजांनीं बंद केलें व नुसती उदी म्हणजे अंगारा देऊं लागले. पूर्वीहि अंगारा देत असत व त्यापासून लोकांना गुण येई.
 
आपण पूर्वी लोकांना औषधपाणी करीत होतों, अशाविषयीं उल्लेख महाराजांनीं एकदां प्रस्तुत लेखकाजवळ केला होता. ते म्हणाले. “ काका, (प्रस्तुत लेखकाला ते काका म्हणून हांक मारीत.) मी पूर्वीं लोकांना औषधदेत असें. पुढें औषध देणें सोडलें आणि ‘हरि हरि’ करूं लागलों आणि हरि हरि करतां करतां हरि भेटला.”
 
महाराज येथें प्रथम आले तेव्हां येथें एक देवीदास नांवाचे साधु असत व त्यांचेकडे निरनिराळे साधु निरनिराळे वेळीं येत. तसेंच रामेश्वर, पंढरपूर व इतर दक्षिणेकडील क्षेत्रांना पायवाटेनें जाणार्‍या यात्रेकरूंचा हा रस्ताच असल्यामुळें पुष्कळ सत्पुरुषांचे पाय येथें वेळोवेळीं लागत. त्यांपैकीं एक जानकीदास नांवाचे साधु येथें बरेच दिवस होते. ते उत्तम अधिकारी होते असें सांगतात. त्यांची व महाराजांची फार बैठक असे. तसेंच सुप्रसिद्ध गंगागीरबाबाहि येथें येत असत. महाराज येथें आल्यानंतर जेव्हां गंगागीर येथें प्रथम आले, तेव्हां महाराज दोन हातांत दोन मातीच्या घागरी विहिरीवरून भरून नेत होते. त्यांना पाहिल्याबरोबर गंगागीरबाबा जवळ असलेल्या गांवकरी मंडळींना म्हणाले, ‘ही मूर्ति येथें कधीं आली ? हें केवळ रत्न आहे. यांची योग्यता फारच मोठी आहे. गांवचें फार मोठें भाग्य कीं, हें रत्न तुम्हांला लाभलें.’ नंतर गंगागरिबाबा महाराजांचे दर्शनास गेले व दोघांच्या मोठया प्रेमाच्या गोष्टी झाल्या. असेच उद्नार महाराजांसंबंधानें अक्कलकोटच्या आनंदनाथमहाराजांनीं काढले होते. हे आनंदनाथमहाराज अक्कलकोटच्या सुप्रसिद्ध स्वामींचे शिष्य होते. ते येवल्याजवळ सावरगांव येथें एकदां गेले असतां शिर्डीचे माधवराव बळवंत देशपांडे, दगडू भाऊ गायके, नंदराम शिवराम मारवाडी व भागचंद मारवाडी, त्यांचे दर्शनास गेले होते. दर्शन झाल्यावर ही मंडळी शिर्डीस यावयाला निघाली, तों आनंदनाथमहाराज एकाएकीं धांवत येउण त्यांचे गाडींत बसले व म्हणाले, मी तुमच्याबरोबर येतों. नेवरगांवाच्या व येवल्याच्या मंडळींनीं य अमहाराजंना अडविण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. आनंदनाथमहाराज तेथें आले तेव्हां त्यांनीं महाराजांसंबंधानें शब्द काढले ते असे, “हा हिरा आहे. याची खरी किंमत तुम्हांला नाहीं. हा जरी उकिरडयावर असला तरी प्रत्यक्ष हिरा आहे, हें घ्यानांत ठेवा.” या वेळीं महाराज प्रसिद्धीस आले नव्हते व गांवांतले लोक त्यांना एक साधारण किंबहुना वेडा फकीर मानीत.
 
महाराजांची स्थिति या वेळेला “फाटकें तुटकें नेसतो रे । मन मानेल तेथें बसतो रे । वेडया वेडयापरि दिसतो रे । परी ब्रम्हांड गिळुनी असतो रे ॥” अशी होती. महाराज कधीं ओढयावर जाऊन बसत; कधीं गांवकुसाजवळ असलेल्या एका लिंबाखालीं बसत, कधीं कोणाच्या मळ्यांत जाऊन बसत; अंगावरील कपडे फाटके असत, कधीं कधीं उग्ररूप धारण करीत. या व अशाच वर्तनामुळें साधारण जनसमाजाला ते वेडेच वाटत. पण लौकरच लोकंचा भ्रम दूर झाला व महाराजांची योग्यता शिर्डीच्या लोकांना कळून आली. तो प्रकार असा घडून आला :---
 
महाराजांना मशिदींत व देवळांतूनहि पुष्कळ दिवे लावण्याची हौस असे. अर्थात्‌ ‘हौस असे’ हें व्यावहारिक द्दष्टीचें बोलणें आहे. खरोभर पाहिलें तर त्यांचें करणें कोणतीच हौस पुरविण्याकरितां नसे. (कारण त्यांना हौस अशी उरलीच नव्हती.) तर त्यांत कांहीं तरी अन्य हेतु म्हणजे लोकांचे हित करण्याचाच असावयाचा. असो. या दिव्यांसाठीं महाराज तेली व वाणी यांचे घरोघर जाऊन तेल मागून आणीत. कांहीं दिवस त्यांनीं महाराजांना तेल दिलें. अर्थात्‌ तीं व्यावहारिक माणसें किती दिवस तेल देणार ? त्यांनीं एक दिवस महाराजांना तेल नाहीं म्हणून सांगितलें. त्यामुळें महाराजांच्या नित्यक्रमांत थोडाच फरक पडणार होता ! महाराजांनीं पणत्यांमध्यें तेलाऐवजीं पाणी घातलें आणि नेहमींप्रमाणें काकडे घालून काडी ओढून ते पेटविले. महाराज ही तयारी करीत असतांना लोकांना त्यांच्या वेडेपणाविषयीं खात्री वाटूं लागली; पण जेव्हां काडी ओढून काकडयांस लावल्याबरोबर ते पेटले व रात्रभर जळत राहिले, तेव्हां अर्थातच लोक थक्क झाले. ते महाराजांना शरण गेले व महाराजांची अवहेलना केल्याबद्दल क्षमा मागूं लागले. कित्येकांनीं तर महाराजांना निरनिराळ्या तर्‍हेनें थोडें थोडें छळलें होतें. ते तर फारच घाबरले. पण महाराज पूर्ण दयाळू, अपकार करणार्‍यांची सुद्धां उपेक्षा करावयाची नाहीं तर त्यांच्यावरहि उपकारच करावयाचा हें महाराजांचें ब्रीद ! तेव्हां अर्थातच कोणालाहि  भिण्याचें कारण नव्हतें. सर्व लोकांवर महाराजांचें प्रेम असून त्यांचें पुत्रवत्‌ प्रतिपालन महाराज करीत. गांवावर कोणतेंहि संकट यावयाचें असलें कीं महाराजांनीं त्याची आगाऊ सूचना द्यावयाची व महारजांचे सांगण्याप्रमाणें जे वागत ते निर्भय होत.
 
सगळ्या गांवची जरी महारजांवर श्रद्धा बसली, तरी महाराजांशीं निकट संबंध फारच थोडया लोकांचा असे. महाराजांच्या प्रखर वृत्तीमुळें त्यांच्याशीं फाजील सलगी करण्याची कोणाची हिंमत होत नसे; आणि मशिर्दीत लोकांचें जाणें-येणें फार कमी असे. या वेळेला येथील देशापांडे घराण्यापैकीं माधवराव बळवंत यांचे जाणें-येणें विशेष होऊं लागलें. मशिदीच्या आवाराला लागूनच एक लहानसें घर होतें, तेथें त्या वेळीं मराठी शाळा असे. त्या शाळेंत माधवराव हे मास्तर होते व त्यानीं वेळोवेळी शाळेंतून मशिदींत जाण्याचा पाठ पाडला. तेथें गेले म्हणजे चिलीम भरून आपण ओढावयाची आणि महाराजांना ओढावयाला द्यावयाची. कोणत्या कारणानें कां होईना, माधवरावांची महाराजांशीं सलगी होऊं छागली आणि माधवरावांचें मन महाराज आकर्षण करूं लागले. कांहीं वर्षांनीं मधवरावांनीं सर्व धंदे सोडून केवळ महाराजांची व त्यांचे दर्शनास येणार्‍या मंडळीची सेवा हाच एक धंदा पत्करला. या सेवेबद्दल मोबदला म्हणून माधवरावांनीं कधींहि मागितला नाहीं. अजूनहि यांचा आणि महाराजांच्या भक्तांचा निकट संबंध आहे आणि त्यांचा पुष्कळ मंडळींना आधार वाटतो; व कित्येक भक्त तर अधिक उणें कांहीं निघाल्यास माधवरावांचे सल्लयाशिवाय पुढें पाऊल टाकीत नाहींत.
 
महाराज शिर्डी सोडून बहुतकरून कोठें जात नसत. मात्र कधीं कधीं निमगांवास बाबासाहेब डेंगळे या नांवाचे महाराजांचे भक्त असत तिकडे जात व कधीं राहत्यास चंद्रभानशेट मारवाडी यांचेकडे जात. चंद्रभानशेट वारल्यावर त्यांचे दुकानाचा कारभार खुशालचंदशेट पाहात असत. या खुशालचंदजींना महाराज वारंवार बोलावणें धाडीत व कोणी राहात्याचा माणूस आला कीं त्याला खुशालचंद्र भेटला होता का, म्हणून विचारीत. असो.
 
बाबासाहेब डेंगळे यांचे बंधु नानासाहेब डेंगळे जाळी-निमगांव येथें राहात असत. त्यांना मुलगा नव्हता. प्रथम कुटुंबास मुलगा होईना म्हणून दुसरें लग्न केलें; तरीसुद्धां कांहीं उपयोग झाला नाहीं. मग बाबासाहेबांनीं त्यांना महाराजांचे दर्शनास पाठविलें. महाराजांचे दर्शनास नानासाहेब डेंगळे आले तेव्हां महाराजांनीं मुलगा होईल असा आशीर्वाद दिला व योग्य वेळीं तो आशीर्वाद फलद्रूप होऊन त्यांना मुलगा झाला. अर्थातच त्यामुळें नानसाहेबांची श्रद्धा महाराजांवर बसली व ते महाराजांकडे वारंवार येऊं लागले. त्याचें सरकारी कामगारांशीं बरेंच दळणवळण असल्यामुळें त्यांनीं साहजिकच महाराजांचे गुण कामगार मंडळी जवळ गाइले आणि त्यामुळें लवकरच कलेक्टराचे चिटणीस रा. चिदंबर केशव ऊर्फ अण्णासाहेब गाडगीळ कांहीं मडळींना घेऊन महाराजांचे दर्शनास आले. अण्णासाहेब गाडगिळांची महाराजांवरील श्रद्धा उत्तरोत्तर वाढत जाऊन ते महाराजांचे पूर्ण भक्त बनले.
 
महाराज ज्या मशिदींत बसत व निजत, ती पूर्ण मोडकळीस आलेली असून खालीं धुरळा अतिशय, व वरूनहि माती पडावयाची अशी स्थिति असल्यामुळें नानसाहेब डेंगळ्यांनीं महाराजांना एक जाड फळी निजण्यासाठीं म्हणून आणून दिली. त्यांचा हेतु हा कीं, महाराजांनीं नुसत्या जमिनीवर न निजतां ती फळी खालीं टाकून तिच्यावर निजावें. महाराजांनीं त्य फळीचा उपयोग निजण्यासाठीं केला, पण प्रकार निराळा केला. ती फळी जमिनीवर न टांकतां ती मशिदीच्या आढयाला जुन्या चिंध्या बांधून टांगली व तिच्यावर निजूं लागले. त्या चिंध्यांकडे पाहिलें तर फळीचें सुद्धां ओझें सहन करण्यासारख्या त्या नव्हात्या. पण महाराजांच्या प्रभावामुळें त्या फळीचेंच काय, पण महाराजांच्या शरीराचेंहि ओझें त्या सहन करूं लागल्या. निजतांना चार बाजूंना चार जळत्या पणत्या महाराज ठेवीत. त्या फळीवर महाजांना पांहाण्याचें ज्याला त्याला मोठें कौतुक वाटे व पुष्कळ मंडळी लाब उभे राहून तें कौतुक पाहात; मात्र महाराजांना फळीवर चढतांना किंवा उतरतांना कोणीं पाहिलें नाहीं. पुष्कळदां मंडळींनीं पाळती ठेविल्या पण महाराजांचें चढणें-उतरणें कोणालाहि दिसलें नाहीं. वरील कौतुक पाहाण्यासाठीं मंडळी फर जमूं लागली, तेव्हां ही उपाधी दूर होण्यासाठीं महाराजांनीं ती फळी एके दिवशीं तोडून टाकली.
 
नानासाहेब डेंगळे ज्या कारणासाठीं महाराजांचे दर्शनास प्रथम आले, त्याच कारणासाठीं कोपरगांवचे मुलकी सर्कल इन्स्पेक्टर गोपाळराव गुंड हेहि दर्शनास आले. यांना तीन कुटुंबें असून मुलगा नव्हता. यांनाहि महाराजांचे आशीर्वादानें मुलगा झाला. हेहि महाराजांचे पूर्ण भक्त बनले. त्यांच्या मनांत एकादां असें आलें कीं, मधीद मोडकळीस आली आहे. ती आपण फिरून बांधवावी; व त्यासाठी त्यांनीं बरेचसे दगड गोळ केले. पण महाराजांनीं.त्यांना मशीद बांधण्याची परवानगी दिली नाहीं. तें काम दुसर्‍या एका भक्ताकडून करवून घ्यावयाचें होतें. ती हकीकत पुढें दिली आहे. गोपाळरावांनीं जमविलेल्या दगडांचा विनियोग महाराजांच्याच आज्ञेनें तेथील शनीचें देऊळ बांधण्यांत व गांवांतील दुसर्‍या देवळांचा जीर्णीद्धार  करण्यांत झाला. महाराजांचें सर्व देवळांकडे लक्ष असे. येथील मारुतीच्या देवळाचाहि महारांनींच जीर्णोद्धार करविला व तें देऊळ मोठेंहि करविलें. जसें गांवांतील देवळांकडे महाराजांचें लक्ष असे. तसेंच येथील तुरबतीकडे सुद्धां महाराजांचें लक्ष असे. गांवकुसाजवळील निंबाच्या झाडाखालीं महाराज कधीं कधीं बसत म्हणून वर सांगितलें आहे. तेथेंच एक पीराची तुरबत आहे असें महाराजांनीं एकदां म्हटलें व तेथें खणून पाहिलें तों तेथें खरोखरच तुरबत निघाली. मग त्या दिवशीं मंडळळींनीं महाराजांची वाजत गाजत मिरवणूक काढली. या तुरबतीबद्दलचा उल्लेख महाराजांनीं प्रस्तुत लेखकाजवळहि केला होता. महाराज म्हणाले, ही आपल्या वडिलांची जागा आहे. येथें दर गुरूवारीं व शुक्रवारीं ऊद जाळीत जावा म्हणजे त्यांत आपलेंच कल्याण आहे. एकदां गोपाळराव गुंडांच्या मनांत असें आलें कीं, येथें महाराजांप्रीत्यर्थ वार्षिक जत्रा ऊर्फ उरूस भरवावा. तो विचार त्यानें गांवांतील तात्या पाटील, दादा कोते पाटील, माधवराव देशपांडे वगैरे वगैरे मंडळींपुढें ठेवला व त्यांना तो रुचून त्यांनीं त्यासाठीं जमवाजमव करण्याचें मनावर घेतलें. पण तेथें तेव्हां असलेल्या कुळ्कर्ण्याकडून आडकाठी झाली व तिचा परिणाम हा झाला कीं, कलेक्टरानें जत्रा भरवूं नये म्हणून हुकूम दिला. पण जत्रा भरविण्यासंबंधानें महाराजांचा आशीर्वाद पूर्ण होता. म्हणून वरील मंडळींनीं फिरून कलेक्टराकडे अर्ज करून, पहिला हुकूम रद्द ‘करवून जत्रा भरविण्याचा हुकूम आणला. ती जत्रा महाराजांच्या आज्ञेनें रामनवमीला भरवावयाचें ठरलें, व तेव्हांपासून ती सूरू झाली ती अजूनहि दर रामनवमीला भरत असते.
 
या जत्रेची व्यवस्था पहिल्यापासून शिर्डी येथील तात्या गणपती पाटील कोते हे पाहात असतात. त्यांच्यावर महाराजांचें अत्यंत प्रेम असे. हे महाराजांना ‘मामा’ म्हणत. यांची आई सौ. बायजाबाई यांनीं महाराजांची फार सेवा केली आणि ती अशा वेळेला कीं, जेव्हां गांवांतील बहुजनसमाज महाराजांना वेडयांत काढी. महाराज पूर्वी दिवसांतून चारपांच वेळां गांवांत भिक्षेल जात. पण सौ. बायजाबाईंनीं त्यांना कधींहि विन्मुख लाविलें नाहीं. अर्थात्‌ या सेवेचें फळ बाईंना तर मिळालेंच, पण त्यांच्या सर्व कुटुंबाला व विशेषत: तात्यांना मिळालें. तात्यांना महाराज पैसे देत इतकेंच नव्हे, तर त्यांचे सर्व तर्‍हेनें लाड करीत. संध्याकाळीं रोज तात्या हे महाराजांकडे जात त्या वेळचा मामा-भाच्यांचा प्रेमाचा सोहळा पाहाण्यासारखा व प्रेमाचीं भाषणें ऐकण्यासारखीं असत. तसेंच मशिदींतील व चावडींतील सर्व व्यवस्था तात्यांकडेच असे. तात्यांनीं येऊन उठविल्याशिवाय महाराज उठत नसत; व तात्यांनीं महाराजांना हातीं धरून नेऊन तेथें महाराजांसाठीं आसन घालावयाचें व त्यावर महाराजांनीं बसावयाचें असा क्रम असे. चिलीमहि तात्यांनींच भरून द्यावयाची.
 
रामनवमीच्या जत्रेच्या वेळीं म्हणजे खुद्द रामनवमीचेच दिवशीं दोन मोठया निशाणांची थाटाची मिरवणूक निघून मशिदींत जात असे; व तेथें तीं दोन निशाणें दोन टोंकांना बांधलीं जात. त्यांपैकीं एक निशाण रा. शंकरराव रघुनाथ देशापांडे ऊर्फ नानासाहेब निमोणकर यांजकडून येत असे, व दुसरें नगरचे दामूशेट कासार यांचेकडून येत असे. नानासाहेब निमोणकर हे निमोणचे देशपांडे होते. निमोण गांव संगमनेर तालुक्यांत आहे. नानसाहेब तालुक्यांत पुढारी गृहस्थांमध्यें मोडत असून सरकारनें त्यांना ऑनररी मँजिस्ट्रेट नेमिलें होतें व तें काम त्यांनीं पुष्कळ वर्षें केलें. शेवटीं वृद्धापकाळ झाला म्हणून तें स्यांनीं सोडलें. त्यांचे चुलते येथें राहात असत व ते कधीं कधीं येथें येत. येथें आले म्हणजे चुलत्याचे सांगण्यावरून महाराजांचे दर्शनास जात. हळू हळू महाराजांवर त्यांची श्रद्धा वाढत चालली आणि शेवटलीं तीन वर्षें तर त्यांनीं महाराजांच्या अखंड सेवेंतच घातलीं. फक्त स्नानसंध्यादि नित्य कर्म उरकण्यापुरते घरीं जात. बाकी सारा वेळ महाराजांचे सेवेंत तत्पर असत. साठी उलटून गेली होती, तरी महाराजांची सेवा करतांना आळस किंबा विश्रांतीची इच्छाहि कधीं त्यांना शिवली नाहीं. महाराज त्यांना ‘काका’ म्हणून हांक मारीत. महाराजांच्या पश्चात्‌ हे फार दिवस राहिले नाहींत. लौकरच त्यांना महाराजांनीं आपल्या पायापाशीं नेलें. महाराजांचे कृपेनें त्यांचा अंत उत्तम झाला. शेवटचे तीन दिवस त्यांना जिकडे तिकडे महाराज दिसत, व जो जवळ येई त्याला सांईबाबा (महाराजांना ‘बाबा’ म्हणत तें वर सांगितलेंच आहे) म्हणत. स्वत:च्या कुटुंबालाहि “या सांईबाबा” असें म्हणत. कुटुंबाला वाटलें. त्यांना कांहीं भ्रम झाला असेल आणि म्हणून कुटुंबानें म्हटलें, “मी बाबा नव्हे, मी आपली पत्नी आहें.” त्यावर ते म्हणाले, “तुझ्यांत कोण, बाबाच आहेत. तूं बाबाच आहेस.” अशा तर्‍हेनें महाराजांचे अखंड स्मरणांत त्यांचा अंत झाला.
 
रामनवमीचे वेळीं दुसरें निशाण येतें तें दामोदर सावळाराम ऊर्फ दामूशेट कासाराचें हे वर सांगितलेंच आहे. यांना दोन कुटुंबें असून एकापासूनहि पुत्रसंतति नव्हती व त्यामुळें ते फार खत करीत असत. त्यांना एकदां माधवराव देशापांडयांचे सासरे रा. गोविंदाराव सापकर यांनीं येथें येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा असें सुचविलें. त्याप्रमाणें ते आले. महाराजांनीं आशीर्वाद दिला व त्या आशीर्वादाप्रमाणें त्यांना मुलगा झाला. अर्थात्‌ त्यांची निष्ठा महाराजांवर बसली; व तेव्हांपासून रामनवमीला नवीन निशाण आणावयाचें व त्या दिवशीं येथें फकीर जमले असतील त्या सगळ्यांना जेवूं घालावयाचें हा नेम त्यांनीं धरला: व तो त्यांचा नेम अजून चालू आहे.
 
रामनवमीची जत्रा सुरू होण्याचे पूर्वीं कांहीं वर्षें महाराजांनीं एका निष्काम भक्ताला आपल्याकडे ओढून घेतलें होतें. ते भक्त म्हणजे रा. नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चांदोरकर. हे कल्याणचे राहाणारे असून त्या वेळेला नगरच्या कलेक्टरचे चिटणीस होते. यांना एके दिवशीं येथील कुळकर्णी रा. केशव अनंत ऊर्फ आप्पा यांनीं सांगितलें कीं, आपल्याला महाराजांनीं बोलाविलें आहे. नामासाहेबांना हें आप्पांचें बोलणे प्रथम खरें वाटलें नाहीं, व त्यांनीं त्याला म्हटलें; उगीच महाराजांचें नांव कशाला सांगतोस ? तुझें माझ्याशीं कांहीं काम असेल तर तसें स्पष्ट सांग. त्यावर आप्पानें खरोखर महाराजांनीं बोंलावलें आहे असें निश्चयानें सांगितल्यावरून नानसाहेब महाराजांचे दर्शनास आले व लौकरच त्यांची श्रद्धा महाराजांवर बसली. मग ते तेथें वारंवार येऊन महाराजांच्या बोधामृताचा लाभ घेऊं लागले. महाराजांच्या व त्यांच्या तासच्या तास बैठकी होत. “तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यंति तेऽज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ॥” या श्रीभगवदुक्तीप्रमाणें नानासाहेबांचे प्रणिपात, परिप्रश्न व सेवा असत आणि महाराज त्यांना उपदेश करीत. एकदां तर याच श्लोकाचें विवेचन महाराज सुमारें एक तास करीत होते. त्या विवेचनावरून नानासाहेबांची खात्री झाली कीं, महाराजांना संस्कृत उत्तम येत असलें पाहिजे. नानासाहेबांनीं महारजांची सेवा अति उत्तम केली. त्यांत विशेषत: दोन गोष्टींमुळें तर ते महाराजांच्या भक्तांना चिरस्मरणीय राहातील. एक तर महाराजांची जुनी मशीद होती ती त्यांनीं मोडून फिरून बांधली व मोठी केली. ननासाहेबांना हें काम स्वत: करून घेण्याला सवड नव्हती, म्हणून त्यांचे विनंतीवरून नानासाहेब निमोणकरांनीं येथें राहून स्वत: देखरेख करण्याचें पत्करलें व तें काम त्यांनीं उत्तम तर्‍हेनें पार पडलें. मशीद बांधण्याला महाराजांची परवानगी म्हाळसापतींचे द्वारें मागितली व ती महाराजांनीं दिली. तरी पण काम चालू असतांना महाराजांनीं वेळोवेळीं काम पाडून ट

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments