बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 एप्रिल 2017 (11:45 IST)

'हाय वोल्टेज' सामन्यात सिंधूने दिली सायनाला मात

इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालला सरळ दोन गेममध्ये धक्का दिला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले.
 
सिंधूने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य ठेवताना दमदार खेळ करताना सायनाचे तगडे आव्हान २१-१६, २२-२० असे परतावले. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर सायनाने दुसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी सिंधूला झुंजवले. यावेळी सायना बरोबरी साधणार असेच चित्र होते; परंतु दुसरा गेम २०-२० असा बरोबरीत असताना सिंधूने आक्रमक पवित्रा घेत सलग दोन गुण वसूल करीत सामन्यावर कब्जा केला.
 
विशेष म्हणजे, याआधी सायना आणि सिंधू कारकिर्दीत केवळ एकदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी सायनाने सरळ गेममध्ये बाजी मारली होती. यावेळी सिंधूने सरळ गेममध्ये विजय मिळविला. त्याचप्रमाणे, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेतही सिंधूने सायनाला नमविले होते. तसेच, २०१३ सालच्या लीगमध्ये सायनाने सिंधूविरुद्ध बाजी मारली होती.
 
याआधी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील द्वितीय मानांकित कोरियाच्या सुंग जी ह्यून हिने शानदार विजय नोंदविताना गतविजेत्या आणि पाचवी मानांकित रत्चानोक इंतानोनला २१-१६, २२-२० असे नमविले. तसेच, चौथ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीने माजी आॅल इंग्लंड विजेत्या नोजोमी ओकुहाराला २१-१३, ११-२१, २१-१८ असा धक्का दिला.
 
पुरुषांमध्ये दोन वेळच्या उपविजेत्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनने विजयी घोडदौड कायम राखताना चिनी तैपईच्या जू वेई वांगचे आव्हान १९-२१, २१-१४, २१-१६ असे परतावले.