शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 11 जुलै 2017 (09:37 IST)

विम्बल्डन स्पर्धा : व्हीनस विल्यम्स, कुझ्नेत्सोव्हा, योहाना कॉन्टा उपान्त्यपूर्व फेरीत

स्पेनच्या 14व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने जर्मनीच्या अग्रमानांकित अँजेलिक कर्बरला पराभऊत करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत खळबळजनक निकालाची नोंद केली. या विजयामुळे मुगुरुझाने उपान्त्य फेरीत धडक मारली. मुगुरुझाने पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना कर्बरचे आव्हान 4-6, 6-4, 6-4 असे सुमारे पावणेदोन तासांत संपुष्टात आणले.
 
याबरोबरच अमेरिकेची दहावी मानांकित व्हीनस विल्यम्स, रशियाची सातवी मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा, लात्वियाची 13वी मानांकित येलेना ऑस्टापेन्को, अमेरिकेची 24वी मानांकित कोको वान्डेवेघे आणि स्लोव्हाकियाची बिगरमानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हा यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
 
तब्बल 18 वर्षांपूर्वी आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावणाऱ्या व्हीनसने क्रोएशियाच्या ऍना कोन्जुहचा 6-3, 6-2 असा पराभव करताना थाटात आगेकूच केली. धाकटी बहीण सेरेना विल्यम्सने गर्भवती असल्यामुळे या वर्षी विम्बल्डनमधून माघार घेतली असताना व्हीनस पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. व्हीनससमोर उपान्त्यपूर्व फेरीत येलेना ऑस्टापेन्कोचे आव्हान आहे.
 
सातव्या मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हाने पोलंडच्या नवव्या मानांकित ऍग्नेस्का रॅडवान्स्काचा 6-2, 6-4 असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. कुझ्नेत्सोव्हाला उपान्त्यपूर्व लढतीत कर्बरला चकित करणाऱ्या मुगुरुझाशी झुंज द्यावी लागेल. द्वितीय मानांकित सिमोना हालेपने बल्गेरियाच्या व्हिक्‍टोरिया आझारेन्कावर 7-6, 6-2 अशी सहज मात केली. आता तिला सहाव्या मानांकित योहाना कॉन्टाशी झुंज द्यावी लागेल.