Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकरी मित्रा अशी टोमॅटो पिकावरील कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन

Updated: गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (20:22 IST)
 
प्रतिबंधात्मक उपाययोजना
रोपवाटीकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादी वाफ्यावर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड २ मिटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे, यामुळे रोगप्रसार करणाऱ्या किडींपासून रोपांचे संरक्षण होईल. रोपवाटिकेमध्ये रसशोषक किडी (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. पुनर्लागवडीसाठी २५-३० दिवसांची रोपे पुरेसे हार्डनिंग करुन वापरावेत. पुनर्लागवडीच्यावेळी वाफ्यावर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. यामुळे पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
 
रोपाची पुनर्लागवड करण्यापूर्वी २५-३० दिवस अगोदर शेताच्या सर्व बाजूने ५-६ ओळी मका किंवा ज्वारी किंवा बाजरी अशी सापळा पिके म्हणून लावावे. त्यामुळे पांढऱ्या माशीला मोठ्या प्रमाणात अटकाव होतो. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी इमिडॅक्लोप्रीड (१७.८एस.एल.) ४ मिली प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे १०-१५ मिनिट बुडवावी. टोमॅटो पिकास शिफारशी प्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात. तसेच नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा.
 
टोमॅटो पिकाला आवश्यकतेप्रमाणेच पाणी द्यावे व पीक तण विरहित ठेवावे. ज्या भागात / शेतात वर्षानुवर्षे तिन्ही हंगामात टोमॅटो पीक घेतले जाते अशा ठिकाणी रोग व किडी प्रस्थापित झालेले असतात त्यामुळे पीक पद्धतीतील अशी साखळी खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति एकर ३०-३५ निळे व पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत. टोमॅटोवरील टुटा नागअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी २० कामगंध जलसापळे (वॉटर ट्रॅप) लावावेत यामुळे टूटा किडीचे सामूहिक पतंग आकर्षण व मिलन प्रजोत्पादनामधील अडथळयांसाठी उपयोग होऊन किडींची संख्या आणि प्रादुर्भाव कमी करता येईल. टोमॅटोच्या फळांची शेवटची तोडणी झाल्यास झाडे उपटून नष्ट करावेत. रोगग्रस्त पीक शेतात तसेच राहिल्यास नवीन लागवड केलेल्या पिकांवर अशा किडींव्दारे पुन्हा प्रसार होऊन विषाणू रोगांचा प्रादुर्भाव होतो.
 
उपचारात्मक उपाययोजना
टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेला असेल तर विषाणूजन्य रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी खालील उपचारात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे व फळे काढुन वेळीच नष्ट करावीत जेणेकरून पुढील प्रसार टाळता येईल. रसशोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी लेकॅनीसिलियम लेकॅनी ५० ग्रॅम किंवा मेटॅ-हाझीयम अॅनीसोप्ली (१.१५ डब्लू.जी.) ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात वातावरणात आर्द्रता असताना संध्याकाळी फवारणी करावी.
 
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८% एस.एल ३ मिली किंवा स्पायरोमेसिफेन (२२.१०% डब्लू डब्लू एस.सी.) १२ मिली किंवा थायोमेथोक्झाम (२५% डब्लू. जी.) ४ ग्रॅम किंवा प्रॉपरगाईट (५०%) अधिक बायफेनथ्रीन (५% एस.इ.) २२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फुलकिडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (७०% डब्लू. जी.) २ ग्रॅम किंवा सायॅनटॅनीलीप्रोल (१०.२६% ओ.डी.) १८ मिली किंवा थायमिथोक्झम (१२.६०%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५०% झेड. सी.) २.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
 
मावा किडीच्या नियंत्रणसाठी सायनट्रॅनिलीप्रोल १०.२६ ओ.डी. १८ मिली किंवा डायमिथोएट (३०% ई.सी.) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टूटा नागअळीच्या नियंत्रणासाठी सायनट्रॅनिलीप्रोल १०. २६ ओ.डी. १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लाल कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी प्रॉपरगाईट (५०%) डब्लू / डब्लू अधिक बायफेथ्रीन ( ५% एस. इ.) २२मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
फळ पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनऍनीलीप्रोल १८.५० एस.सी. ३ मिली किंवा इन्डोक्झाकार्ब १४.५० एस.सी. १० मिली किंवा नोव्हॅल्युरॉन १० ई.सी. १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई. सी. २० मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा प्रॉपीनेब ३० ग्रॅम प्रति १० लिटरपाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
 
फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना टोमॅटो पिकावरील किड व रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी उपाययोजना सुचविण्यात येतात. त्या उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेवर केल्यास टोमॅटो पिकावरील कीड रोखण्यास निश्चितच होईल.
 
Edited by Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली, राजकारणाविरोधात मोहीम सुरू करणार

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

पुढील लेख
Show comments