शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (15:40 IST)

Bank Locker Rules बँक लॉकर कामकाज आणि नियम संपूर्ण माहिती

reserv bank
बँक लॉकर कामकाज आणि नियम तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे, वाचा पूर्ण महिती
 
ज्या बँकेच्या सेफ लॉकरचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल त्या बँकेत तुमचे बचत खाते असायला हवे. बचत खाते नसेल तर केवायसीची सर्व कागदपत्रे देऊन खाते उघडावे लागेल. एक महत्त्वाची गोष्ट अशी की बँकेच्या सगळ्याच शाखांना लॉकरची सुविधा देणे अनिवार्य नाही. उपलब्ध जागा आणि त्या भागातील आर्थिक व्यवहार लक्षात घेऊन बँका ही सुविधा उपलब्ध करून देतात.
 
बर्‍याच वेळा असा अनुभव येतो की लॉकर हवा असेल तर अमुक रकमेचे फिक्स्ड डिपॉझीट ठेवावे लागेल असा आग्रह बँकेचे कर्मचारी करतात. पण आग्रह करणे हा मार्केटींगचा भाग समजावा. अशी कोणतीही सक्ती बँक करू शकत नाही.
 
प्रत्येक बँकेत लॉकरचे भाडे एकसारखेच असते कि नाही ?
नाही. लॉकरचे भाडे ठरवण्याचा अधिकार बँकेला आहे. लॉकरचा आकार (साइज) आणि शाखा कोणत्या भागात आहे यावरही लॉकरचे भाडे कमीजास्त असू शकते. उदाहरणार्थ मुंबईत जव्हेरी बाजार, मुंबादेवी, मलबार हिल अशा भागात भाडे जास्त असते. बँका लॉकरचे भाडे आगाऊ मागू शकतात आणि काही बँका भविष्यात पुरेसे असे भाडे खात्यात जमा ठेवण्याचा आग्रह धरतात. एक महत्वाची बाब अशी की बँका ही सुविधा 'कस्टमर रिटेंशन' म्हणजे ग्राहक टिकवण्यासाठी देतात. हा बँकिंगचा अत्याश्यक भाग नाही. सगळ्या बँकाचे भाडे एकसारखे असेही नाही. म्हणजे पाहा, स्टेट बँकेचे छोट्या लॉकरचे भाडे ११०० रुपये आहे, तर अ‍ॅक्सिस बँकेचे ३५०० रुपये आहे.भाडे दरात बँक वेळोवेळी बदल करते.
 
बँकेच्या लॉकरचा काही करार करावा लागतो का?
होय, १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर हा करार केला जातो ज्यावर ग्राहकाने अटी मान्य आहेत अशी सही करायची असते. या अटींमध्ये सर्वात महत्वाची अट इन्डेम्नीटीची म्हणजे नुकसान भरपाईबद्दल असते.
 
हा करार म्हणजे लॉकर भाड्यावर (रेंट), भाडेपट्ट्याने (लिझवर) घेतला असे समजावे की तो लॉकर ग्राहकाच्या मालकीचा (ओनरशिप) आहे असे समजावे?
ग्राहक आणि बँक यांचा करार या तिन्ही प्रकारात मोडत नाही. या कराराला बेलर आणि बेली (bailor and bailee) म्हणता येईल. या करारानुसार तुमच्या मालाचा ताबा (पझेशन) बँकेकडे असते, पण स्वामित्व तुमचे असते. उदाहरणार्थ, धोब्याकडे दिलेले कपडे त्याच्या ताब्यात असतात पण मालकी हक्क तुमचा असतो. आता हे उदाहरण दिलेच आहे तर त्याचा उपयोग आणखी काही संकल्पना समजण्यासाठी करू या. समजा तुम्ही महागडी रेशमी साडी ड्राय क्लिनिंगला दिली तर आणि ती ड्रायक्लिनरने हरवली तर त्याची नुकसान भरपाई मर्यादित असते.ती साडी तुम्ही किती रुपयांना विकत घेतली या किमतीला महत्व नसते. बँकेच्या लॉकरबाबत असेच काहीसे असते. त्यामुळे बँकेवर दरोडा पडला किंवा भिंत फोडून चोरी झाली, भूकंपामुळे बँक कोसळून लॉकर नाहीसे झाले तर बँक नुकसान भरपाई देत नाही.
बँक लॉकर कसा वापरला जातो हे समजून घेऊया
लॉकरच्या दोन चाव्या असतात. एक ग्राहकाकडे असते, तर दुसरी बँकेच्या अधिकार्‍याकडे असते. लॉकर वापरताना आधी बँक अधिकारी त्यांची चावी वापरतात आणि नंतर तुम्ही चावी फिरवून लॉकर उघडायचा असतो. बंद करताना तुमची चावी पुरेशी असते. ही चावी फक्त आणि फक्त ग्राहकालाच वापरता येते. नोकर किंवा इतर नातेवाईकांना ती वापरता येत नाही. खाते जॉइंट नावावर असेल तर त्यापैकी कोणालाही चावी वापरता येते.
 
लॉकरची चावी हरवली तर?
चावी हरवणे ही समस्या मोठ्या डोकेदुखीची ठरू शकते. बँकेला ते ताबडतोब कळवणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर शोध घेऊनही चावी सापडली नाही तर दुसरी चावी बँकेचा डेसिग्नेटेड लॉकस्मिथ किंवा लॉकर बनवणार्‍या कंपनीचा माणूसच नवी चावी बनवून देऊ शकतो. त्यासाठी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. संपूर्ण खर्च ग्राहकाला करावा लागतो. हा खर्च मोठा असतो इतकेच आम्ही इथे सांगू शकतो.
 
कोणत्या परिस्थितीत बँका तुमच्या लॉकरचा ताबा घेऊन तो लॉकर उघडून आतील ठेव ताब्यात घेऊ शकतात?
हे घडण्यासाठी अनेक दिवस जावे लागतात. भाडे वेळेवर भरले नाही तर बँक आधी ग्राहकाला नोटीस पाठवते. काही काळाने पुन्हा एकदा नोटीस पाठवली जाते. या नोटीसांची मुदत संपली की वर्तमानपत्रात जाहिर नोटीस दिली जाते. त्यानंतरही ग्राहक जागा झाला नाही तर आतील सर्व ऐवज ताब्यात घेऊन सीलबंद पाकीटात ठेवून बॅकेच्या कोषागारात ठेवला जातो. ग्राहक परत आल्यावर खर्च वसूल करून त्या ठेव्याचा ताबा दिला जातो. लक्षात घ्या, बँकेवर या मालाची कोणतीही जबाबदारी नसते.
 
लॉकरचे नॉमीनेशन करता येते का?
सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बाब माहिती असावी ती अशी की लॉकरचे नॉमीनेशन करता येते आणि ते वेळीच करावे. गरजेनुसार नॉमीनेशन बदलता येते. पण कोणत्याही परिस्थितीत लॉकरचे टायटल ओपन ठेवू नये म्हणजेच नॉमीनेशन केले नाही असे होऊ नये. पण केवळ याच कारणासाठी बँक लॉकर उघडू शकते असे नाही. अतिविशिष्ट स्थितीत कोर्टाने ऑर्डर दिल्यास बँकेला लॉकर उघडावा लागतो. भाडे भरूनही जर तुम्ही लॉकर वापरला नाही तर बँकेला लॉकर ताब्यात घेण्याचे अधिकार आहेत. वर सांगितलेल्या सर्व परिस्थितीत जेव्हा लॉकर उघडला तेव्हा लॉकर ज्यांच्या नावावर आहे ते स्वतः / त्यांचा नॉमिनी / बंकेतर्फे कर्मचारी, बँकेचा अ‍ॅडव्होकेट आणि बँकेचा एक ग्राहक यांच्या साक्षीने हे कामकाज करावे लागते
 
आता बँकेच्या लॉकरमध्ये जमा केलेले सगळे काही अत्यंत सुरक्षित असते हे खरे. पण काही नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत बँकेच्या सुरक्षिततेची जबाबदारी नसते. उदाहरणार्थ एखाद्या क्षेत्रात भूकंप झाला आणि बँकेची इमारत कोसळून लॉकर त्या ढिगार्‍यात गहाळ झाले तर लॉकरमधील ऐवजाची जबाबदारी बँकेकडे नसते.
आता एक वेगळे उदाहरण घेऊ या. बँकेची सुरक्षा आणि व्यवस्थापन लक्षात घेता लॉकर अत्यंत सुरक्षित समजले जातात. पण गेल्या काही दिवसांत हे लॉकर फोडून लूट करणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. २०१९च्या सुरुवातीला बँक ऑफ बडोदाचे लॉकर फोडून चोरट्यांनी २.५ कोटींचा डल्ला मारला होता. आता यावर उपाय म्हणजे काही इन्शुरन्स कंपन्यांनी या नुकसान भरपाईची पॉलीसी जाहिर केली आहे. त्यापैकी इफ्को टोक्यो या जनरल इन्शुरन्स कंपनीने अत्यंत माफक शुल्कात ही पॉलीसी विक्रीस उप्लब्ध केली आहे. ४० लाखापर्यंतच्या चिजवस्तू बॅक लॉकरमध्ये असतील तर प्रिमियम २५०० रुपये आहे.
 
लॉकरमध्ये सामान ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं काही नियम तयार केले
लॉकरमध्ये सामान ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं काही नियम तयार केले आहेत. यामध्ये टर्म डिपॉझिटचा समावेश आहे. जेव्हा नवा ग्राहक मौल्यवान वस्तू ठेवण्यास बँकेत येईल, तेव्हा बँक त्याच्याकडून तीन वर्षांची लॉकर फी डिपॉझिट म्हणून घेते. तसंच लॉकरसेवा काढून घेण्याची फीदेखील त्याच वेळी घेतली जाते. पूर्वीपासून लॉकरची सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना हा नियम लागू नाही. हा नियम फक्त नव्या ग्राहकांना लागू करण्यात आला आहे, याबद्दलची माहिती देणारं वृत्त 'टीव्ही 9 हिंदी'नं प्रसिद्ध केलं आहे.
 
नियम बदलले आणि भरपाई निश्चित केली
रिझर्व्ह बँकेने नियम बदलले आणि भरपाई निश्चित केली. लॉकरमधून सामान चोरी झाल्यास, आग लागल्यास आणि आर्थिक घोटाळा झाल्यास लॉकरच्या वार्षिक फीच्या 100 पट भरपाई  द्यावी, असा नियम केला. आरबीआयनं निश्चित केलेला हाच नियम सध्या लागू आहे. उदाहरण घ्यायचं झालं, तर लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंसाठी तुम्ही बँकेला वर्षाला 1 हजार रुपये फी देत असाल आणि बँकेत चोरी झाली किंवा दरोडा पडला, तर तुम्हाला 1 हजार रुपयांच्या 100 पट म्हणजेच 1 लाख रुपये मिळू शकतात. तुमच्या हातात किती पैसे पडतील हे तुमच्या क्लेमवर निर्धारित असेल. लॉकरमध्ये 10 लाखांचं सोनं ठेवलं असेल, तर लॉकरच्या रेंटच्या हिशेबानं तुम्हाला किती भरपाई मिळेल याचा अंदाज लावू शकता.
 
तुम्हाला बँकेकडून भरपाई मिळू शकते
आग लागणं, चोरी होणं, फसवणूक होणं, इमारत कोसळणं, बँक कर्मचाऱ्यानं घोटाळा करणं या परिस्थितीतही क्लेम केल्यास तुम्हाला बँकेकडून भरपाई मिळू शकते. आता अशा काही घटना घडल्यास 100 पटीनं भरपाई मिळण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. पूर्वी असं काही अघटित घडलं तर ग्राहकांना असा कोणताच अधिकार मिळाला नव्हता. ग्राहकांच्या वस्तूंचं नुकसान झाल्यास बँका हात वर करू शकत नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं पुढाकार घेऊन हा नियम निश्चित केला होता.
 
बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणं योग्य ठरेल
संबंधित बँकेचे सर्व कायदे, नियम पाहूनच बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवणं योग्य ठरेल. आपण बँकेच्या लॉकरमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे ठेवतो. बँकेवर दरोडा पडला अथवा चोरी झाली, तर पूर्वी त्याच्या भरपाईची कोणतीच गॅरंटी नव्हती. बँकेत आपल्या मौल्यवान वस्तू अटी-शर्तींवर ठेवाव्या लागत होत्या. तरीही अनेक जण बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवत होते आणि लॉकरची फीदेखील भरत होते.