रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (12:29 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय बारावा

श्रीगणेशाय नमः ॥ जय सद्‍गुरु समर्था ॥ अनाथनाथा कृपावंता ॥ मुमुक्षु शरणांगत होता ॥ जन्मवार्ता तया नाहीं ॥ १ ॥
ऐसे देतसां कृपादानासीं ॥ म्हणोनि शरणांगत पायासीं ॥ भावार्थ धरून मानसीं ॥ शरण चरणांसी आलों असें ॥ २ ॥
मी तंव अनंत अपराधी ॥ अगणित पापाची वृद्धी ॥ परी कृपाळू तूं दयानिधी ॥ नेई सिद्धी परमार्थ ॥ ३ ॥
ऐका श्रोते हो सावधान ॥ मलमास परम आख्यान ॥ मागील अध्यायीं कथन ॥ व्यतीपात वैधृती महिमा वर्णिला ॥ ४ ॥
पांच पर्वे यांचा प्रश्न ॥ लक्ष्मीनें केलासे आपण ॥ तयामाजी सांगितले दोन ॥ पुढें अवधान देइजे ॥ ५ ॥
शताच्छतं च संक्रांतौ ॥ शतोत्थं विषुवेषुच ॥ युगादौ तच्छतगुणमयनेतच्छताधिकं ॥ १ ॥
सोमग्रहे शतगुणं तच्छतं तुरविग्रहे ॥ असंख्यत्वं व्यतीपाते दानंदानविदोविदुः ॥ २ ॥
उत्पातौ लक्षगुणितं भ्रमणे कोटिरुच्यते ॥ अर्बुदं पतने प्रोक्तमक्षय्यं पतिते फलं ॥ ३ ॥
शुभेव्यतीपातदिनेवहन् स पंचगव्येन महानदीजले ॥ उपासते यो यमुनानदीजलं जप्येच शुद्धो व्यती पात ते नमः ॥ ४ ॥
श्रीविष्णु वदतसे निकें ॥ ऐक क्षीराब्धिकन्यके ॥ मागें कथिलें पर्व देखें ॥ पुढें ऐकें अति आदरें ॥ ६ ॥
व्यतीपात वैधृती वर्णन ॥ तुज म्यां केलें निरोपण ॥ तयाहि परी शतगुण ॥ ऐकें महिमान पुढारी ॥ ७ ॥
शत संक्रांतीचें फळ एके ठायीं ॥ तयावरी शतपर्वणी अधीक पाहीं ॥ युगायुगीं मासादि आयनेंही ॥ होत असे विशेष ॥ ८ ॥
तया शतगुणें अधिक ॥ चंद्रग्रहण असे देख ॥ तयाते शतगुणें एक ॥ सूर्यग्रहण बोलिलें असे ॥ ९ ॥
असंख्य व्यतीपात केले दान ॥ कोटितीर्थी केलेंसे भ्रमण ॥ किंवा पंचगव्यादि प्रायश्चित्ते जाण ॥ व्यतीपातस्नान गंगोदका ॥ १० ॥
कोटि पुरश्चरणें जप पाहीं ॥ चंद्रसूर्यग्रहण होई ॥ तया वरिष्ट अधिक पाहीं ॥ ऐकें नवाई शुभानने ॥ ११ ॥
अहोहे पूर्णिमा महिमा ॥ वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा ॥ तेथें बोलावयाची मीसा ॥ बोलतां बोले न बोलवे ॥ १२ ॥
पूर्णिमा दिनीं प्रातःस्नान ॥ जो नर करी आपण ॥ तया ऐसा पुण्यवान ॥ दुजा आन असेना ॥ १३ ॥
किंचित सुवर्ण अथवा कांहीं ॥ दान दीजे ब्राह्मणाते पाहीं ॥ विप्रभोजन माध्यान्ह समयीं ॥ त्या एवढा नाहीं पुण्यवान ॥ १४ ॥
षड्रस मिष्टान्न पाहीं ॥ वाढी ब्राह्मणातें स्वगृहीं ॥ वरी दक्षिणेसहीत वस्त्र तेंही ॥ अर्पी भावें आदरें ॥ १५ ॥
वैशाखी कार्तिकी माघी रौद्री ब्राह्मीच वैष्णवी ॥ विशेष फलदास्तिस्त्रः पिंडदानेऽक्षयंफलं ॥ ५ ॥
वैशाखीं कार्तिकीं माघीं ॥ श्रेष्ठता जाणिजे तिघीं ॥ फाल्गुनीं चैत्रीं नवविधी ॥ पौषी त्रिशुद्धि जाणिजे ॥ १६ ॥
या इतुकियां पूर्णिमेतें ॥ वेगळालीं असे दैवतें ॥ तेहीं परिसावूं तूंतें ॥ ऐक निरुते भामिनी ॥ १६ ॥
ज्येष्ठ पूर्णिमाते पाहीं ॥ ब्रह्म सर्वत्रीं दैवत राहीं ॥ आषाढी ते नारायणरूपेही ॥ असे तेही जाणिजे ॥ १८ ॥
म्हणोन करावे व्यासपूजन ॥ व्यासरूपे साक्षात नारायण ॥ यालागीं करावे पूजन ॥ भाव धरूनि मानसीं ॥ १९ ॥
नादिसिद्ध हे आषाढी ॥ पूर्वी हंसरूपी श्रीयागुढी ॥ म्हणोनि परम हंस प्रौढी ॥ परंपरा पुढी चालतसे ॥ २० ॥
परमहंसरूपे नारायण ॥ म्हणोनि व्यासरूपे नारायण ॥ यालागीं अगत्य कीजे पूजन ॥ हंसरूपे नारायण म्हणोनी ॥ २१ ॥
माघमासी माधव देवता ॥ फाल्गुनीं रुद्रतत्वता ॥ चैत्र दैवत अनंता ॥ असे तत्वता निर्धारे ॥ २२ ॥
वैशाखीं पितृदैवत जाण ॥ मार्गशीर्षी यक्षकिन्नर जाण ॥ देवी भवानी ते जाण ॥ पौषी पौर्णिमा बोलिजे ॥ २३ ॥
ऐसिया पर्वकाळीं जाण प्रतिमासीं कीजे पिंडदान ॥ तेणे समग्र देवता तुष्टमान ॥ आशिर्वचन पै देती ॥ २४ ॥
स्नानविधी दान पुण्य ॥ जे आचरती भावे जाण ॥ तयाचे ऋण जाय निरसून ॥ नसे अनुमान यदर्थी ॥ २५ ॥
पंचमहा यज्ञ पितृतर्पण ॥ यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन ॥ प्रतिमासीं जे करिती आचरण ॥ तया नारायण संतुष्टे ॥ २६ ॥
मासामासाचे ठायीं जाण ॥ येतसे तिथी पर्व लक्षून ॥ तरी कां करावे अनमान ॥ बहुत धन लागेना ॥ २७ ॥
अल्पवेचे पुण्यविशेष ॥ परी कोणी न धरिती सायास ॥ येर्‍हवीं पिशुन येता गृहास ॥ करिती सायास आदरे ॥ २८ ॥
तेथे खर्च करिती भलतैसा ॥ व्यर्थ वेचिती वयसा ॥ परी सत्कारणीं न वेचिती पैसा ॥ गर्जतसे ठसा पुराणीं ॥ २९ ॥
पुराणिक सांगतचि गेले ॥ व्यासादिकीहीं काव्य केले ॥ पुराणे विस्तारून ठेविले ॥ परि जन न चाले या वाटे ॥ ३० ॥
फुकट स्वल्पाचेही स्वल्प ॥ ते कोणीही न नेणती अल्प वृथा जल्पताती जल्प ॥ अभिमाने कल्प भोगिती ॥ ३१ ॥
शिश्नोदर पारंगत ॥ जगामाजी रूढी बहुत ॥ नेणोनियां हिताहित ॥ भगवंती देख अंतरले ॥ ३२ ॥
वीट न मानावा बोलण्याचा ॥ पुढे मागुता नरदेह कैचा ॥ क्षणेक संग रतिसुखाचा ॥ नये कामाचा बापानों ॥ ३३ ॥
जाय पाहतां सोन्याची घटी ॥ मागुती नये लक्षितां लक्षकोटी ॥ करितां संसाराची आटाटी ॥ जन्म शेवटी निर्फळ ॥ ३४ ॥
उदरालागीं करावे नीचसेवन ॥ तेथे पापपुण्य न विचारितां धन ॥ मेळवावे संसारालागून ॥ शेवटीं कणव सांगाती ॥ ३५ ॥
हे तो जगाची जगप्रौढी ॥ प्रचीत पाहाताती रोकडी ॥ परी कोणीही न करिती तातडी ॥ प्रपंच सांकडी उगवावया ॥ ३६ ॥
असो जे करतिल जैसे ॥ ते तंव भोगितिल तैसे ॥ क्रोध येऊं नये मानसे ॥ वदलो फारसे म्हणवूनी ॥ ३७ ॥
कथाभाग राहिला मागे ॥ सांप्रत तो वदावा लागे ॥ पूर्णिमा महिमा रमारंगे ॥ सांगितला निजांगे रमेलागीं ॥ ३८ ॥
यावज्जीवं मर्त्यलोके स्नानदानादिभिः कृतैः ॥ स्नानेनैकेन पूर्णायां दिनं भवति सार्थकं ॥ ६ ॥
क्षणेक जाणूनि संसार ॥ दयाळू तो जगदीश्वर ॥ मृत्युलोका केला प्रसर ॥ तरणोपाय मानवाते ॥ ३९ ॥
बहुत सुगम सुलभ उपावो सांगितलासे देवाधिदेवो ॥ पूर्णिमादिनीं स्नानदानातपावो ॥ कीजे निर्वाहो जन्माचा ॥ ४० ॥
आपुला जन्म सार्थक करून ॥ कीजे पूर्वजांचे उद्धरण ॥ येविषयींचें कथन ॥ स्वयें जनार्दन वदतसे ॥ ४१ ॥
ऐकेंहो क्षीराब्धिबाळी ॥ अमावास्येची नव्हाळी ॥ श्रवण केलिया सकळी ॥ होय होळी पापाची ॥ ४२ ॥
मासा मासाचिया अंतीं ॥ येतसे अमावास्या तिथी ॥ तरी स्नान दान यथापद्धती ॥ करावें निगुती आदरें ॥ ४३ ॥
सारूनि स्नान संध्या देवतार्चन ॥ करूनियां महाहवन ॥ मग कीजे तिळतर्पण ॥ ब्राह्मण भोजन यथाविधी ॥ ४४ ॥
श्राद्ध कीजे यथास्थित ॥ पिंडदान करून युक्त ॥ तेणें पितृगण संतोषत ॥ आशीर्वाद देत कुळातें ॥ ४५ ॥
ऐसे प्रत्यही अमावास्येसीं ॥ आचरावें निश्चयेसी ॥ तये दिनीं पितृलोकासी ॥ पितरासीं संतोष ॥ ४६ ॥
तये दिनीं पितरांलागून ॥ पितृलोकीं करिता सन्मान ॥ देऊनि मिष्टान्न भोजन ॥ तेणें पितृगण आनंदती ॥ ४७ ॥
मग संतोषून देती आशीर्वचन ॥ तेणें वंशवृद्धि होतसे जाण ॥ जयातें वाटे व्हावें कल्याण ॥ पावे सदन वैकुंठीं ॥ ४८ ॥
तेणें अवश्य करावें पिंडदान ॥ न केलिया अपाय दारुण ॥ आणि मोक्षरूप कल्याण ॥ सावधान परिसावें ॥ ४९ ॥
एकमासवरी उपोषण ॥ पितरांतें होतसे जाण ॥ मग तयातें करावें लागे वायुभक्षण ॥ तंव ते कोपून शापिती ॥ ५० ॥
त्याचिया शापास्तव पाहीं ॥ संसारपुरीं न पडेचि कांहीं ॥ कष्टी होती सर्वदांही ॥ म्हणती आमुचें दैव हेंचि पैं ॥ ५१ ॥
आदौ आचरण करिती सरस ॥ मग बोल ठेविती प्रारब्धास ॥ कुसमुसोन साधिती संसारास ॥ धरूनि हव्यास निजमनीं ॥ ५२ ॥
जिता धड न बोलती वचन ॥ मग कोठून करतील पिंडदान ॥ जळो ऐसियाचें पुत्रपण ॥ काय वांचून संसारी ॥ ५३ ॥
धन्यधन्य ते पितृभक्त ॥ अमान्य न करिती वचनाते ॥ सदांसर्वदां पुरविती हेत ॥ मागीतला पदार्थ देताती ॥ ५४ ॥
जिवंत असतां सन्मान ॥ मेलिया करिती गयावर्जन ॥ प्रतिमासें अमावास्येसी जाण ॥ ब्राह्मणभोजन श्राद्धयुक्त ॥ ५५ ॥
सुफळ तयाचा संसार ॥ सदां तुष्टमान श्रीधर ॥ आशीर्वाद देती अमर ॥ हो कल्याण म्हणोनी ॥ ५६ ॥
ऐसे जे कां पितृभक्त पाहीं ॥ माझें नमन तयांचें पायीं ॥ हेचि बुद्धि सर्वकाळ ह्रदयीं ॥ देवो शेषशायी परमात्मा ॥ ५७ ॥
सांप्रत कलीमाजी पुत्रपण ॥ किंचित् ऐकावें वर्णन ॥ क्रोधें न भरावें पूर्ण ॥ नसा अमान्य वचनासी ॥ ५८ ॥
आपुलिया सुखस्वार्था ॥ पिता सांचवी द्रव्यार्था ॥ नेणोनि पापपुण्य पंथा ॥ धन सर्वथा सांचवीतसे ॥ ५९ ॥
म्हणे मुलें माझीं अज्ञान ॥ माझेंहि झालें वृद्धपण ॥ कामा येई शेवटी धन ॥ पुत्रालागून माझिया ॥ ६० ॥
मग ते पुत्र होती तरुण ॥ पितयातें आलें वृद्धपण ॥ सदां हेळसिती दारुण ॥ मागता धन न देती ॥ ६१ ॥
पिता आपुले धन मागे ॥ तयावरीं डोळे फिरविती रागें ॥ म्हणे मी याचें काय ऋण लागें ॥ वडिलोपार्जित पहिलें ॥ ६२ ॥
बालत्वा पासुनि पाळिला ॥ तोंडीचा घांस चारिला ॥ शेवटीं पुत्र कामा न आला ॥ वृद्धपणी पितयातें ॥ ६३ ॥
ऐसेही पुत्र असती ॥ नको देवा ऐशियाची संगती ॥ जिता नाही नाहीं गती ॥ मेलिया सद्गती केवी होय ॥ ६४ ॥
म्हणोनि एकची पुत्र भला ॥ जेणें कुळाचा उद्धार केला ॥ येही परत्रसाधनीं भला ॥ वंशा केला उद्धारु ॥ ६५ ॥
ऐसे जे का सुपुत्र पाहीं ॥ तेची आचरती अमावास्याही व्रताही ॥ आणीक पुण्यकर्म पाहीं ॥ परलोक पाही साधिती जे ॥ ६६ ॥
जे नर करिती पिंड दानाते ॥ वरी आचरती व्रताते ॥ तयाहीवरी मलमासातें ॥ विशेष पर्वणी अमावास्या ॥ ६७ ॥
वर्धते प्रत्यहं सत्यंनात्र कार्या विचारणा ॥ मासिमासित्वमावास्या दिनेप्राप्ते नराधमाः ॥ ७ ॥
ऐसींहीं पर्वे दोन पाहीं ॥ पूर्णिमा अमावास्या तेही ॥ तुम्हां निवेदिलें सर्वही ॥ शेषशायी वदला असे ॥ ६८ ॥
जे नर ऐकूनि नाचरती ॥ पुराण श्रवणीं न बैसती ॥ तयाची न चुके यातायाती ॥ पुनरावृत्ती चुकेना ॥ ७९ ॥
पितरातें न करिती तोष ॥ तयाची संतती होय नाश ॥ यालागीं श्लोकाधार विशेष ॥ श्रवण कीजे आदर ॥ ७० ॥
तंमासं पितरस्तस्य कुर्वतो वायु भोजनं ॥ तस्य विघ्नं प्रयच्छंति क्षुधितास्तृषितास्तथा ॥ ८ ॥
ते संततिं नाशयंति संपदो भवनानिच ॥ तस्मादमायां कर्तव्यं स्नानदानजपादिकं ॥ ९ ॥
यालागीं श्रोतेजनहो ॥ मलमासातें पाहाहो ॥ अगत्य व्रतातें आचराहो करालाहो परमार्थाचा ॥ ७१ ॥
जैसा लाहो घेता संसारीं ॥ तैसाच कीजे परमार्थावरी ॥ तेणें चुकेल येरझारी ॥ जन्मवरी खंडेल ॥ ७२ ॥
हा नरदेह परम सांग ॥ येथे धरावा सत्संग ॥ सत्संगाविण साधनमार्ग ॥ हाता न लागे सर्वथा ॥ ७३ ॥
म्हणोन मलमास अवधी ॥ साधाहो हेची संधी आधी ॥ गांठ घाला मूळ पदीं ॥ भजा गोविंदीं आदरें ॥ ७४ ॥
स्वस्ति श्री अधिक माहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ द्वादशोध्याय गोड हा ॥ १२ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ७४ ॥ श्लोक ९ ॥
 
॥ इति द्वादशोध्यायः ॥