शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (14:35 IST)

अधिकमास माहात्म्य अध्याय अठरावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयजयाजी मंगलधामा ॥ मंगलनाम तुझें आत्मयारामा ॥ चराचर फलांकितद्रुमा ॥ नामाअनामातीत तूं ॥ १ ॥
अमंगळ हे माझी काया ॥ मंगलनाम तुझें हे रघुराया ॥ मंगल जननी दुहिता प्रिया ॥ करी छाया कृपेची ॥ २ ॥
तंव कृपाबळें समस्त ॥ वदेन म्हणतों समग्र ग्रंथ ॥ तो सिद्धि पाववीं समस्त ॥ ठेवीं वरदहस्त शिरीं माझ्या ॥ ३ ॥
ऐका श्रोते जन सादर ॥ मलमहात्म परिकर ॥ लक्ष्मीनारायण संवाद थोर ॥ भावें साचार परिसीजे ॥ ४ ॥
पूर्वी मेरुगिरीचे दक्षिणपारीं ॥ विंध्याद्री पर्वत निर्धारी ॥ नर्मदा वाहे अमृतमय नीरीं ॥ वृक्षतीरीं शोभती ॥ ५ ॥
नानावृक्ष सुशोभित ॥ नारीकेळीं फळभारें लवत ॥ ताडमाड खर्जुरी शोभत ॥ वृक्ष शोभती नानापरी ॥ ६ ॥
तेथें हंस कारंडव चक्रवाकें ॥ मयोर चातक बदकें ॥ मूषक नकुळ बिडाळकें ॥ आनंदें देखें खेळती ॥ ७ ॥
तेथें ऋषिसमुदावो बरवा ॥ स्नानसंध्यें आराधिती उमाधवा ॥ यक्षगण गंधर्वातें तेधवा ॥ आराम रमवी सर्वातें ॥ ८ ॥
तेथें भवानी सहित शूळपाणी ॥ क्रीडार्थ येताती तये वनीं ॥ ऐसी ते परम शोभीत स्थानीं ॥ अनुपम्य न वदवे ॥ ९ ॥
तेथें भृगुनामे एकनगरी ॥ परम रमणीय परी ॥ सदां वास्तव्य अमरपुरीं ॥ तप आदरें करिताती ॥ १० ॥
तंव तया नगरीं एक ब्राह्मण ॥ भृगुवंशज सकुलीन ॥ वेदाध्यायी परम निपुण ॥ ज्योतिषी पूर्णसिद्धांतीं ॥ ११ ॥
नामतया कुळशर्मा ॥ जाणे सर्व धर्म अधर्मा ॥ तयाची भार्या उपरमा ॥ कुशावती नाम तियेचें ॥ १२ ॥
तिच्या उदरीं कन्यारत्‍न ॥ प्रसवली ते गुणनिधान ॥ रूपें परम लावण्य ॥ नाम जाण मेधावती ॥ १३ ॥
एकुलती एक वंशस्थळीं ॥ अतिसुंदर रूपागळी ॥ उणी तिजपुढे नैषधबाळी ॥ बहु आगळी चतुरपणें ॥ १४ ॥
ओठ जिचें अति आरक्त ॥ गौरांगीं शोभिवंत ॥ सिंहाकृति कटि शोभत ॥ मृगनेत्री गजगामिनी ॥ १५ ॥
प्राप्त होतां षौडशवर्षे ॥ कुच चमकती जंबीरा ऐसें ॥ पीतवर्ण साजिरे सरसे ॥ देखतां मानस संतोषे ॥ १६ ॥
तपीये विसरले तपा ॥ जपीये विसरले जपा ॥ पाहतां जियेचे स्वरूपा ॥ वीर्य ढळे क्षणार्धे ॥ १७ ॥
ऐसी ते लावण्याची ज्योती ॥ पहातां नेत्र तटस्थ होती ॥ पिता अवलोकितां तये प्रती ॥ जाली उपरती मृगांक ॥ १८ ॥
मग पितयानें वर विचार ॥ करितां जाला साचार ॥ पद्मनाभ एक द्विजकुमर ॥ अतिसुंदर सुलक्षणी ॥ १९ ॥
वेद्शास्त्रसंपन्न होती ॥ मान्यता विशेष सर्वाठायीं ॥ घटितार्थ पाहून ते समयीं ॥ तिथिनिश्चयो पैं केला ॥ २० ॥
सालंकृत कन्यादान ॥ करून अर्पिलें कन्यारत्‍न ॥ चारी दिवस सोहळा संपूर्ण ॥ ब्राह्मण भोजन यथाविधी ॥ २१ ॥
कांहीं एक दिवस श्वशुरमंदिरी ॥ राहिलीसे ते सुंदरी ॥ उभयतां प्रीति पडिभारी ॥ न सोडिती एकमेकां ॥ २२ ॥
क्षण एक वियोगे व्यथा ॥ सहन होईना उभयतां ॥ तंव दैवयोग विचित्रता ॥ न सोडी सर्वथा कवणातें ॥ २३ ॥
एकदां नर्मदा तीरीं विप्रकुमर ॥ जलक्रीडा करितां निर्भर ॥ सन्निध पातला एक मगर ॥ नेला ओढूनी पाताळा ॥ २४ ॥
तीरीं होता जो समुदाव ॥ हाहाःकार करिती जों सर्व ॥ ग्रामवासियांनी घेतली धांव ॥ मात जाणविली पितयातें ॥ २५ ॥
वक्षस्थळ ताडिती मातापिता ॥ श्वशुरासहीत धांवली कांता ॥ शोक करिती मातापिता ॥ हा हा जगन्नाथा केलें काय ॥ २६ ॥
मृत्तिका घेऊन वदनीं ॥ घालीतसे ते कामिनी ॥ शोकवर्णितां उलों पाहे धरणी ॥ कवीची वाणी कुंठित ॥ २७ ॥
म्हणें आहा देवा जगन्नाथा ॥ कोठवरी भोगूं वैधव्यव्यथा ॥ जन म्हणती हे ललना आतां ॥ करिल काई नेणवे ॥ २८ ॥
म्हणे बुडालें माझें जहाज ॥ वोस पडली माझी सेज ॥ सौभाग्य दग्ध झालें आज ॥ बोलूं गुज कवणातें ॥ २९ ॥
ऐसा विलाप करितां ते कांता ॥ पिता सांवरी तियेतें तत्वतां ॥ परि न सोसवे दुःख अवस्था ॥ सांवरून पिता धरी बळें ॥ ३० ॥
पाहा नाहीं कोणी कोणाची ॥ अवघीं सांगाती सुखाची ॥ वेळ येतां मृत्युकाळींचीं ॥ अंती एकलाची जातसे ॥ ३१ ॥
यालागीं सज्ञान जनीं ॥ प्रवर्तावें आत्मसाधनीं ॥ सुटे काळ भयापासूनी ॥ ऐसें जनीं वर्तावें ॥ ३२ ॥
कवणाची माता कवणाचा पिता ॥ कवणाची कांता कवण दुहिता ॥ बंधु भगिनी हे तत्वता ॥ आप्त सोयरे समग्र ॥ ३३ ॥
कवण नाहीं कोणाचे ॥ अंतीं जाणें लागें नेमाचें ॥ यालागीं सार्थक जन्माचें ॥ करा साचें बापानो ॥ ३४ ॥
पहा प्रवाहीं बुडाला विप्रकुमर ॥ तया तें टाकून परिवार ॥ परत ते जाले येरायेर ॥ लहान थोर सर्वही ॥ ३५ ॥
ऐसे लोटतां बहुत दिवस ॥ वैधव्य दशा सतीस ॥ जिताचि मृत्यु स्त्रियेस ॥ भोगितां वैधव्यास जाण पां ॥ ३६ ॥
दिवस न लोटेची सर्वथा ॥ न सरे वैधव्याची व्यथा ॥ आयुष्यही न सरेचि तत्वता ॥ मरणावस्था सतीतें ॥ ३७ ॥
तंव एके काळीं ते सुंदरी ॥ स्नानार्थ पातली नर्मदातीरीं ॥ तेथें पुराणश्रवणीं क्षणभरी ॥ अवकाशें बैसली असे ॥ ३८ ॥
तेथें निरोपण निघालें ॥ मळमाहात्म पुण्यागळे ॥ स्नान दान करितां एक वेळें ॥ प्राप्त सोहळे वैकुंठीं ॥ ३९ ॥
ऐसा विश्वास धरून अंतरीं ॥ गृही पातली ते सुंदरी ॥ मग मृदुवचने प्रार्थना करी ॥ ते अवसरीं पितयाची ॥ ४० ॥
म्हणे ताता ऐक वचन ॥ वैधव्य व्यथा न लोटे जाण ॥ तरी उपाव करूं कवण ॥ सांगा मज लागून स्वामियां ॥ ४१ ॥
तिये तें पाहून दुःखभरित ॥ पितानेत्री अश्रु स्रवत ॥ म्हणे बाई एक मात ॥ करी व्रत मलमाहात्म ॥ ४२ ॥
परी संपूर्ण भरत आला मास ॥ उर्वरित राहिला एक दिवस ॥ तरी तूं आचरें स्नानदानास ॥ मौन नक्तास आचरावे ॥ ४३ ॥
उपरी करूं उद्यापन ॥ यथाविधि ब्राह्मण संतर्पण ॥ केलिया घडे महापुण्य ॥ सत्य जाण शुभानने ॥ ४४ ॥
जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकतां ॥ शेवटील अध्याय ऐकतां ॥ फळ लाधे हो तत्वता ॥ संपूर्णता प्राप्त होय ॥ ४५ ॥
तैसेंचि हेंही व्रत जाण ॥ करीं तूं एकची दिन ॥ मनोरथ पुरविता भगवान् ॥ श्रीजनार्दन दयाळु ॥ ४६ ॥
ऐसी ऐकता पितयाची वार्ता ॥ बहुत हर्षभरित ते दुहिता ॥ प्रातःकाळीं स्नानार्थ तत्वता ॥ नर्मदा तीरीं पातली ॥ ४७ ॥
संकल्पयुक्त स्नान सारुनी ॥ परतली स्वगृहा कामिनी ॥ मग सत्पात्र विप्र बोलावूनी ॥ बैसे भामिनी पूजेतें ॥ ४८ ॥
त्रयत्रीणिदशक देख ॥ अपूप केले सुरेख ॥ घृतसहीत शर्करामिश्रित ॥ कांस्यपात्रीं संपादी ॥ ४९ ॥
कुंभघट स्थापूनियां ॥ पूजन करीं लवलाह्या ॥ चित्ती भावार्थ धरूनियां ॥ विप्रवर्या अर्पितसे ॥ ५० ॥
दक्षिणेसहीत वस्त्र अलंकार ॥ द्विजा पूजीते सुंदरा ॥ मग मौन्य करूनि नक्‍त विचारा ॥ सर्वेश्वरा भजतसे ॥ ५१ ॥
स्वपंक्‍ती विप्र भोजना ॥ सारिती जाली ते ललना ॥ प्रातःकाळी उद्यापना ॥ पिता जाण करवीतसे ॥ ५२ ॥
षड्रस अन्नें निपजवूनीं ॥ घृतपाचित पायसान्नीं ॥ द्विजा बैसवून भोजनीं ॥ दक्षिणादानीं विधियुक्त ॥ ५३ ॥
यथाकाळें फळें आणुनी ॥ ब्राह्मणातें अर्पी दक्षिणादानीं ॥ ओंटी भरून सुवासिनी ॥ नमस्कारूनि बोळवीत ॥ ५४ ॥
ऐसें उद्यापन करूनी ॥ भावार्थबळें प्रसन्न शूळपाणी ॥ विमान आले स्वर्गीहूनी ॥ शिवगणीं मंडित पैं ॥ ५५ ॥
घंटारव होता अपार ॥ माजी शिवगण आणि किन्नर ॥ वाद्यें वाजती अपार ॥ सुरवर तटस्थ ठेले ॥ ५६ ॥
ऐसें विमान उतरतां भूतळीं ॥ दिव्यरूप केली ते बाळी ॥ सर्वां देखता उद्धरोन गेली ॥ आश्चर्य सकळीं पै केलें ॥ ५७ ॥
म्हणती एक दिनीचा व्रत प्रभावो ॥ तात्काळ उद्धरली पहाहो ॥ ऐसा कृपाळू लक्ष्मीनाहो ॥ लीला लाघवो दाखवीतसे ॥ ५८ ॥
असो ते विप्रसुता ॥ शिवाजवळी नेली तत्वतां ॥ येरी चरणी ठेवून माथा ॥ विश्वनाथा नमियेलें ॥ ५९ ॥
नमस्कारून पार्वतीतें ॥ स्तुतिवादें प्रवर्ते स्तवनातें ॥ जोडूनियां बद्धहस्तें ॥ मुखीं गर्जे नामघोष ॥ ६० ॥
जय शंकर सदाशिवा ॥ कर्पूरगौरा उमाधवा ॥ भक्‍तवरदायक प्रियमाधवा ॥ सोडविले भवापासुनी ॥ ६१ ॥
म्हणे उदारा त्रिनयना ॥ खट्‌वांगधरा व्याळभूषणा ॥ वृषभध्वजा भक्तपाळणा ॥ दानवनिक्रंदना दयानिधे ॥ ६२ ॥
मी तंव मतिमंद अपराधी ॥ कृपासागर तूं दयानिधी ॥ देऊन पूर्ण कृपा औषधी ॥ भवभयव्याधी निवारिली ॥ ६३ ॥
ऐसा स्तुतिवाद करूनी ॥ मस्तक ठेविला शिवचरणीं ॥ संतोषयुक्त झाली भवानी ॥ देखून नयनीं तियेतें ॥ ६४ ॥
निरखून पाहे भवानी ॥ तंव कुंकुमही न वदनीं ॥ म्हणे धवरहित हे कामिनी ॥ जाणवलें मनीं जगन्मातें ॥ ६५ ॥
मग आश्वासुनी तियेतें ॥ सन्निध बैसविली निरुतें ॥ नाना उपभोग सयोचितें ॥ पुरवी तियेतें भवानी ॥ ६६ ॥
ऐसे लोटले कित्येक दिवस ॥ तंव एके दिवशीं श्रीनिवास ॥ शिवभेटीस अनयास ॥ कैलासा पैं आले ॥ ६७ ॥
नमूनियां कैलासराणा ॥ येरायेर करूनि हास्यवदना ॥ देऊनियां अभ्युत्थाना ॥ रमारमणा बैसविलें ॥ ६८ ॥
स्वागत पुसोनि सकळ ॥ वाराणशी चालले तात्काळ ॥ विमानरूढ ते वेळे ॥ भवानीसहित निघाले ॥ ६९ ॥
सवें घेतली मेधावती ॥ काशीपुरा पावली त्वरित गती ॥ अनुपम्य रचना तये स्थिती ॥ देखून मनीं आनंद ॥ ७० ॥
म्हणोन आनंदवन म्हणती ॥ अमृतवाहिनी भागीरथी ॥ जे त्रिपथगामिनी विख्याती ॥ जन तरती बिंदुमात्रें ॥ ७१ ॥
तेथें वास्तव्य नीलकंठ ॥ करिता जाला वरिष्ठ ॥ केशवराज दैवत श्रेष्ठ ॥ स्थापी नीलकंठ आदरें ॥ ७२ ॥
तंव तेथें अकस्मात मेधावती ॥ देखती जाली पार्वती ॥ खेद खिन्न वैधव्य सती ॥ म्लान वदनें देखिली ॥ ७३ ॥
मग प्रार्थूनि विश्वनाथा ॥ म्हणे हे सती वैधव्यव्यथा ॥ न साहेची सर्वथा ॥ निवारीं कृपावंता हे ॥ ७४ ॥
भोळा उदार कर्पूरगौर ॥ देता झाला अक्षई वर ॥ अक्षई सौभाग्य अपार ॥ होऊं शंकर बोलिला ॥ ७५ ॥
तैं पासुनी नाम जाण ॥ मंगळागौरी ठेवी त्रिनयन ॥ दिधलें अक्षई भुवन ॥ स्थापिली जाण वारणशीये ॥ ७६ ॥
तैं पासूनी नाम विख्यात ॥ म्हणती मंगळागौरी सत्य ॥ जनयात्रेसी जाती नित्य ॥ घेती दर्शन आदरें ॥ ७७ ॥
इतर देशींचे यात्रेकरी ॥ जाती ते नमिती मंगळागौरी ॥ हे प्रचीती अद्याप वरी ॥ सर्वत्र नेत्रीं देखती ॥ ७८ ॥
ऐसीते मेधावती विप्रदुहिता ॥ एक दिनी व्रत आचरतां ॥ वैधव्याची निवारूनि व्यथा ॥ अक्षयी सौभाग्यता ते जाली ॥ ७९ ॥
ऐसें हें मलमाहात्म जाण ॥ लक्ष्मीतें सांगे जनार्दन ॥ तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन ॥ करोत श्रवण आदरें ॥ ८० ॥
शास्त्र प्रचीती साक्षीभूत ॥ मनीं धरूनि शुद्ध भावार्थ ॥ भावें आचरावे हे व्रत ॥ सर्व आघात न सोहे ॥ ८१ ॥
शिव पुराणींची हे कथा ॥ पद्यपुराणीं असे तत्वता ॥ तेची प्राकृत भाषे तुम्हां आतां ॥ श्रवण पंथा निवेदिली ॥ ८२ ॥
तया मंगळागौरीचे दर्शन ॥ मंगळ होती सर्वही जन ॥ शंकरगौरी तुष्टमान ॥ होय कल्याण सर्वां ठायीं ॥ ८३ ॥
तरी नर अथवा नारी ॥ बाळ अथवा वृद्ध सुंदरी ॥ लाभ सारिखा सर्वां परी ॥ व्रत निर्धारीं आचरतां ॥ ८४ ॥
इति श्रीमलमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ अष्टादशोऽध्याय गोड हा ॥ १८ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ॥ ८४ ॥
 
॥ इति अष्टादशोऽध्यायः ॥