सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टविनायक
Written By

लेण्याद्रीचा गिरिजात्मज

Lenyandri
अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की, जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. अष्टविनायकातला हा एकमेव गणपती डोंगरात एका गुहेत आहे. ते स्थान म्हणजे लेण्याद्री. 
 
पौराणिक कथा
गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.
Lenyandri
मंदिर
जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे. मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस २८ लेणी आहेत. एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत मंदिराची लेणी कोरली आहे. लेण्याद्री मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत असून, तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. समोरील सभामंडप ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंतच प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. 
Lenyandri
या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.
 
असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.