मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Updated : सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (20:59 IST)

विराट कोहली : 'कर्णधारपद सोडल्यानंतर मला या एकाच खेळाडूनं मेसेज केला'

विराट कोहलीने आपल्या दमदार आणि आक्रमक स्टाईलमध्ये पुनरागमन केलं आहे. त्याची ही स्टाईल दिसली आशिया चषक टी-20 स्पर्धेतील भारत वि. पाकिस्तान सामन्यात. जवळपास महिनाभर क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहिल्यानंतर विराटनं आशिया चषक टी-20 स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं.
 
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा जो पहिला सामना झाला होता त्यात त्याने विकेटवर टिकून राहत 35 धावा जमवल्या. त्यानंतर हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत 59 धावा केल्या.
 
त्यानंतर काल झालेल्या भारत वि. पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात कोहलीला सूर गवसला. पाकिस्तानी बॉलर्सकडून येणाऱ्या भेदक गोलंदाजीवर त्याने 44 चेंडूंमध्ये 60 धावा जमवल्या. यात 4 फोर तर 1 षटकाराचा समावेश आहे.
 
या एका षटकारानंतर त्याने या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर त्याने टीम इंडियाच्या जर्सीला किस केलं. त्याला दिलेल्या संधीबद्दल तो आभारी असल्याचं त्याच्या या कृतीतून दिसत होतं.
 
या सामन्यात कोहली ज्यापद्धतीनं पीचवर धावत होता, ते पाहताना हा तो खेळाडू नाही जो मागील 3 वर्षं आंतरराष्ट्रीय शतकाच्या शोधात होता, असं वाटत होतं.
 
भारताची फिल्डिंग सुरू होती तेव्हा क्रॅम्प आल्यामुळे कोहली मैदानात दिसला नाही. भारताचा पराभव झाल्यानंतर जेव्हा तो पत्रकार परिषदेत आला तेव्हा तो वेगळाच कोहली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
 
नेहमीच आपल्या आक्रमक स्वभावाने टीकेचा धनी ठरलेला कोहली यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला अत्यंत शांततेत उत्तर देत होता. 'मी सलग 14 वर्ष झालं खेळतोय'
 
एका प्रश्नावर तो थोडा चिडला मात्र तणाव निवळावा म्हणून तो लगेचच हसायला लागला. तो म्हणाला की, "मी सलग 14 वर्ष झालं खेळतोय. त्यामुळे मला संधी मिळालीय असा काही मुद्दा नाहीये. ड्रेसिंग रूमच्या आत काय घडतं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे."
 
पाकिस्तानविरुद्ध काढलेल्या 60 धावांविषयी तो म्हणाला, "मी माझ्या बाजूने 120 टक्के प्रयत्न केलेत." तो हसत होता मात्र मागच्या काही कालावधीत त्याला जे काही सहन करावं लागलंय ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
 
तो सांगत होता की, "लोक टीव्हीवर जाऊन बरेच सल्ले देतात, पण मी जेव्हा कर्णधारपद सोडलं तेव्हा फक्त धोनीनेच मला मेसेज केला होता. त्याच्यासोबत मी पूर्वी खेळालोय. टीव्हीवर जाऊन बोलणाऱ्या लोकांकडे माझे नंबर आहेत. ते मला कॉल करून सल्ले देऊ शकले असते. पण तसं घडलंच नाही."
 
कोहलीने यावेळी धोनीसोबतच्या खास कनेक्शन विषयीही सांगितलं.
 
तो म्हणाला की, "रिस्पेक्टचं सुद्धा एक कनेक्शन असतं. दोन्ही बाजूंनी जेव्हा सुरक्षितता असते तेव्हाच हे शक्य असतं. त्याला माझ्याकडून काही नकोय आणि मलाही त्यांच्याकडून काही नकोय. लोकांनी टीव्हीवर सल्ले दिले मात्र कोणी एक मेसेज केला नाही. मी पण माणूस आहे, या सगळ्याचा माझ्यावरही परिणाम होतोय."
 
जेव्हा धोनीने कोहलीला मेसेज केला होता
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 15 -16 वर्षांपूर्वीच्या एका मुलाखती दरम्यान म्हटला होता की, "भलेही मी क्रिकेट खेळत असेन-नसेन पण लोकांनी मला एक चांगला क्रिकेटर म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावं. तो क्रिकेटर एक चांगला माणूस आहे ही माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट असेल मला असं वाटतं."
 
धोनीचा हा विश्वास कोहलीने प्रत्यक्षात आणला. पण यावेळी एक दिसून आलं की जेव्हा तुम्ही प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावरून खाली येता तेव्हा हे स्पर्धेचं जग तुम्हाला एकट पाडतं.
 
पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळी केल्यानंतर कोहली म्हटला की मी माझ्या बाजूने शक्य तेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
 
तो पुढे म्हणाला की, "मी नेहमीच प्रामाणिकपणे खेळतो. देणारा वरती बसलाय. त्याला जर वाटलं तर नक्कीच देईल, पण तुम्ही कितीही प्रयत्न केले आणि त्याच्या मनात नसेल तर काहीच शक्य नाही. प्रामाणिक प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि मी ते करतो."
 
पत्रकार परिषदेत बोलताना कोहलीची एक वेगळीच शैली होती. तो प्रामाणिकपणा, लोकांचा स्वभाव आणि देवाबद्दल बोलत होता.
 
एका महिन्याच्या ब्रेकनंतर काही बदल झालाय का? या प्रश्नावर कोहलीने विशेष असं काही सांगितलं नाही. पण तो परत आल्यानंतर टीममध्ये उत्साह जाणवल्याचं त्याने सांगितलं. मी आल्यावर त्यांनी माझं स्वागत केलं. या सगळ्यांनी एन्जॉय केल्याचंही कोहलीने यावेळी सांगितलं.
 
कोहलीचं नव्या अंदाजात पुनरागमन...
कोहलीने भारत वि. पाकिस्तान सामन्यात 60 धावा काढून आणखीन एक विक्रम रचला. हे T-20 क्रिकेटमधील त्याचं 32 वं अर्धशतक होतं. या क्रमवारीत त्याने रोहित शर्मालाही मागे टाकलं.
 
पाकिस्तानचा क्रिकेटर बाबर आझम 27 अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर डेव्हिड वॉर्नर 23 अर्धशतकांसह या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
 
कर्णधार म्हणून कोहलीची कारकीर्द आक्रमक होती. त्याच्या या आक्रमकतेमुळे प्रतिस्पर्धी टीमचे सुद्धा हैराण व्हायची. पण यावेळी त्याने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचं कौतुक केलं. दुबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद रिझवानसह संघातील सर्व खेळाडूंचं कौतुक केलं.
 
सामन्यानंतर प्रझेंटेशन सेरेमनी पार पडली. यावेळी रोहित शर्मा म्हणाला, "यावेळी कोहलीचा फॉर्म ब्रिलियंट होता. जेव्हा एका बाजूला खेळाडू धडाधड आऊट होत होते तेव्हा कोहली पीचवर पाय रोवून उभा होता. त्याच्या या टेम्पोची संघाला गरज होती. त्याने रचलेल्या धावा संघासाठी महत्वाच्या होत्या."
 
स्टार स्पोर्ट्सच्या कमेंट्री पॅनेलमध्ये असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण म्हणाला, "पत्रकार परिषद पाहता कोहलीचा आक्रमकपणा कमी झाला आहे. जेव्हा कुलनेस आणि टॅलेंट एकत्र येतं तेव्हा तुमची कामगिरी आणखीनच चांगली होते."
 
कोहली कॅप्टन असताना संघाचे प्रशिक्षक राहिलेले रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, "कोहली लहान मुलगा नाहीये. त्याने 70 इंटरनॅशनल मॅचेस खेळल्यात. त्याच्यासाठी ब्रेक गरजेचा होता. आता ब्रेकनंतर तो त्याच्या फॉर्ममध्ये परत आलाय. त्याचं काय चुकलं होतं ते आता त्याला समजलं असेल आणि आता ती चूक तो सुधारेल."
 
कोहली अवघ्या 34 वर्षांचा आहे आणि आता भारतीय क्रिकेट संघात जे सर्वोत्तम खेळाडू आहेत त्यांपैकी तो एक आहे. तो जर आत्ताच्या फॉर्ममध्ये टिकून राहिला तर भविष्यात त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा केली जाऊ शकते.