अयोध्या: राममंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप रामजन्मभूमी ट्रस्टने फेटाळला
समीरात्मज मिश्र
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आमदार तेजनारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी आरोप केलेत की "राममंदिरासाठी 2 कोटी रूपयांसाठी खरेदी केलेली जमीन काही मिनिटातच 18.5 कोटी रूपयांमध्ये पुन्हा खरेदी केली गेली."
रामजन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी हे आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत खोडून काढले. माध्यमांना दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटलंय की "श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जेवढी जमीन विकत घेतली आहे तिची किंमत खुल्या बाजारातल्या किमतीपेक्षा खूप कमी आहे."
रविवारी, 14 जूनला, समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की ज्या दिवशी जमिनीचं कोटी 2 रूपयांचं विक्रीखत झालं त्याच दिवशी त्या जमिनीचं 18.5 कोटी रूपयांचं अॅग्रीमेंट झालं.त्यांचं म्हणणं आहे की, "18 मार्च 2021 ला 10 मिनिटं आधी विक्रीखत झालं आणि नंतर अॅग्रीमेंटही. या दोन्ही कागदपत्रांचे साक्षीदार श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ट्रस्टी अनिल मिश्र आणि महापौर ऋषीकेश उपाध्याय आहेत."पांडे यांनी आरोप केलाय की राममंदिरासाठी जमीन खरेदी करण्याच्या बहाण्याने रामभक्तांची फसवणूक केली जातेय.
त्यांचा दावा आहे की हा सगळा प्रकार महापौर आणि ट्रस्टी यांना माहिती होता. पवन पांडेंनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी पत्रकार परिषदेत रजिस्ट्रीचे कागदपत्रं दाखवले आणि म्हणाले, "राम जन्मभूमीच्या जमिनीला लागून असणारी एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्चला संध्याकाळी सुल्तान अन्सारी आणि रवी मोहन यांना 2 कोटी रूपयांना विकली होती. तीच जमीन काही मिनीटातच चंपत राय यांनी रामजन्मभूमी ट्रस्टकडून विकत घेतली. मी म्हणतोय यात भ्रष्टाचार झाला आहे. असं काय घडलं की 10 मिनिटात जणू काही जमिनीतून सोनं उगवलं आणि तिची किंमत इतकी वाढली?"
इतर राजकीय पक्षांनीही केले आरोप
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की रामाच्या नावावर जी जमीन विकत घेतली जातेय त्यात भ्रष्टाचार होतोय. त्यांचं म्हणणं आहे की, "सेकंदाला 5.5 लाख अशा गतीने जमिनीची किंमत वाढलीये. जगातल्या कुठल्याही जमिनीची किंमत इतक्या वेगाने वाढली नसेल. या प्रकरणाची तात्काळ ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मी मागणी करतोय. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना अटक व्हायला हवी."
काँग्रेस पक्षाचे आमदार दीपक सिंह यांनीही या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याची सीबीआय चौकशी करावी असं म्हटलं आहे.
रामजन्मभूमी ट्रस्टचे सचिव यांनी मात्र हे आरोप खोडून काढले आहेत. त्यांनी म्हटलं की, "रामजन्मभूमी ट्रस्टने ज्या किमतीला जमीन खरेदी केली ती बाजारभावापेक्षा खूप कमी आहे. या जमिनीचं विक्रीखत मात्र अनेक वर्षांपूर्वी विक्रीकर्त्यांच्या जमिनीचं मुल्यांकन होतं त्या किंमतीला झालं आहे. त्यानंतर त्यांनी ती जमिनी ट्रस्टला विकली."
पण विश्व हिंदू परिषदेकडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते कागदपत्रांची पडताळणी करून खरं काय ते शोधतील.विश्व हिंदू परिषदेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की संघटनेने हे आरोप फारच गंभीरतेने घेतलेत आणि जर यात काही तथ्य आढळलं तर याविरोधात आंदोलन केलं जाईल.