शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यासंदर्भात बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनीही ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. लता मंगेशकर यांनी ट्वीट करून लिहिले की, शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. लता दीदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अयोध्येत भगवान श्री रामाच्या मंदिर बांधकाम कार्य सुरू आहे, ज्याबद्दल मला खूप आनंद आहे.
लता मंगेशकर यांनी या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “अनेक राजे, अनेक पिढ्यांचे आणि संपूर्ण जगाच्या रामभक्तांचे शतकानुशतके अपूर्ण राहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत भगवान श्री राम यांचे मंदिर पुन्हा उभारले जात आहे, शिलान्यास होत आहे. आदरणीय लालकृष्ण आडवाणी जी यांना मोठे श्रेय जाते, कारण त्यांनी या विषयावर रथयात्रा घेऊन भारतभर सार्वजनिक प्रबोधन केले होते. तसेच त्याचे श्रेय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनाही जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मान्यवर लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करताना लता मंगेशकर यांनी लिहिले की, “आज या शिलान्यासची एक मोठी घटना घडत आहे ज्यामध्ये आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत जी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी आणि रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी आणि अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित असणार आहेत.
कोरोनामुळे लाखो भाविक तेथे पोहोचू शकणार नाहीत, परंतु त्यांचे मन आणि लक्ष श्री रामांच्या चरणी नक्कीच असणार आहे. आदरणीय नरेंद्रभाईंच्या हस्ते हा आयोजित सोहळा पार पडणार आहे, याचा मला आनंद आहे. आज मी, माझे कुटुंब आणि संपूर्ण जग खूप आनंदी आहे आणि जणू हृदयाचा प्रत्येक ठोका, प्रत्येक श्वास जय श्री राम म्हणत आहे., असे ही त्यांनी आपल्या ट्विटमधून लिहीत लता दीदी व्यक्त झाल्या आहेत.