गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (08:43 IST)

समस्त भारतीयांसाठी हा एक भावूक क्षण असेल : अडवाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराची कोनशिला रचली जाण्याचा क्षण केवळ माझ्यासाठीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी एक भावूक क्षण असेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली. तसेच राममंदिर आंदोलनात नियतीने माझ्याकडून महत्त्वपूर्ण भूमिका बजावून घेतली यासाठी मी ऋणी असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
 
“राम मंदिर उभं राहिल्यानं आपल्या देशाची प्रतिमा जगात उंचावेल, एक बलशाली देश, भरभराट करणारा शांतीप्रिय देश अशी आपली नवी ओळख निर्माण होईल असा विश्वास वाटतो” असंही आडवाणींनी म्हटलं आहे.
 
अयोध्येत बुधवारी प्रभू रामचंद्र मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळी साजरी केली जाते आहे. हे मंदिर घडतं आहे यामागे सर्वात मोठी प्रेरणा आहे ती लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेची. १९९० मध्ये त्यांनी रथयात्रा काढली तेव्हापासूनच या क्षणाची सगळेजण वाट बघत होते.
 
अयोध्या प्रकरण न्याय प्रविष्ट होतं. मागील वर्षी ९ नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल देत अयोध्येतली ही जागा हिंदूंचीच आहे त्या ठिकाणी मंदिर उभं रहावं असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. त्यासाठी एका ट्रस्टची स्थापना केली जावी असंही कोर्टाने म्हटलंय. त्यानुसार आता प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येत उभं राहणार आहे. या मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कृतकृत्य झाल्याची भावना आणि भरुन पावल्याची भावना लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.